Tuesday, 27 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.10.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गातून रुग्ण बरे होण्याचा दर ९० पूर्णांक ६२ शतांश टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात गेल्या २४ तासात कोरोना विषाणू संसर्गाचे ३६ हजार ४६९ नवे रुग्ण आढळले त्यामुळे देशातल्या कोविडग्रस्त रुग्णांची संख्या ७९ लाख ४६ हजार झाली आहे. यापैकी ७२ लाखांवर रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ४८८ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून, देशातला मृतांचा आकडा एक लाख १९ हजार ५०२ वर पोहचला आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ६ लाख २५ हजार आहे.

दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरने काल एका दिवसात ९ लाख ५८ हजार ३०९ नमुन्यांची कोविड तपासणी केली. आतापर्यंत देशात दहा कोटी ४४ लाख चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचे ३७ हजार ५६५ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३५ हजार ४७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.‌ सध्या एक हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ५८ झाली आहे.

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ६ हजार ४२८ एवढी झाली आहे. त्यापैकी ५ हजार ९७१ रुग्ण बरे झाले असून २६२ रुग्णांचा आतापर्यंत या संसर्गाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मुंबईत गेल्या चोवीस तासात नव्या ८०४ कोविड रुग्णांची भर पडली असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत एकूण २ लाख बावन्न हजार ८७ रुग्णांची नोंद झाली असून १० हजार ९९ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या १९ हजार ३५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

सांगली जिल्ह्यातल्या राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या १०६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सांगली आगारातले ४२५ कर्मचारी मुंबईला बेस्ट उपक्रमात सेवा देण्यासाठी गेले होते. त्यात चालक, वाहक आदी कर्मचारी त्यांची दहा दिवसांची सेवा झाल्यानंतर ते सांगलीला परतले त्यापैकी १०६ कर्मचारी कोविड बाधित झाल्याचं आढळलं आहे.

****

बीड जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मानक कार्यप्रणाली तसंच मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.                                                                                   

****

विदर्भात नागपूर आणि परिसराला आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ३ पूर्णांक ३ दशांश एवढी तीव्रता असलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू मध्यप्रदेशातल्या सिवनी इथं असल्याचं सांगण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून, सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याबाबत योग्य कारवाई करावी, अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचेही पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित विमा कंपनीला द्यावे, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

****

ऊसाचा एफआरपी वाढीव रास्त आणि किफायतशीर दर आणि तसंच ऊस तोडणी, वाहतुकीचा दर साखर उद्योगाला परवडणारा नाही असं मत सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथल्या क्रांतीअग्रणी सहकारी कारखाण्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी व्यक्त केलं आहे. कारखान्याच्या १९ व्या गळित हंगामाचा प्रारंभ केल्यानंतर काल ते बोलत होते. साखरेचा दर किमान ३ हजार ३५० रुपये क्विंटल केल्याशिवाय अडचणी दूर होणार नाहीत असंही ते म्हणाले.

****

चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा आणि विरूर वनपरिक्षेत्रात आर.टी-१ वाघाने आतापर्यंत दहा जणांचा बळी घेतला. या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रशिक्षित श्वानपथकाची आणि ड्रोन'ची मदत घेणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. वनविभागाच्या या शोधमोहिमेत २०० वन कर्मचारी १६० कॅमेरे, डॉक्टर्स आणि बीआरटी पथक गस्त घालत आहेत. वाघ पकडण्यासाठी आतापर्यंत वनविभागानं केलेले वेगवेगळे प्रयोग अयशस्वी ठरले आहेत.

****

बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण ९९ पूर्णांक ५८ शतांश टक्के भरलं आहे.

****

No comments: