Saturday, 24 October 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 October 2020 Time 18.00 to 18.10

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 October 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००

****

** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेतकऱ्यांना ’प्रत्येक थेंबाला जास्त पीक या मंत्राचा अवलंब करण्याचं आवाहन

** चक्रवाढ व्याज आणि सामान्य व्याजाच्या रकमेतील फरक देण्यासाठीच्या योजनेला केंद्राची मान्यता

** भाजपचे अनेक आमदार संपर्कात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास इच्छूक - एकनाथ खडसे

आणि

** औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार कोविड बाधितांचा आज उपचारादम्यान मृत्यू

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्ऱ्यांना सु्क्ष्म सिंचनाचा वापर करत ’प्रत्येक थेंबाला जास्त पीक या मंत्राचा अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज गुजरातमधे दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून किसान सूर्योदय योजनेचं उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून अहमदाबादमधे देशातले सर्वात मोठं हृदयरोगाचे रुग्णालय आणि जुनागड जिल्ह्यातल्या गिरनार पर्वतावरील रोपवे प्रकल्पाचही उद्घाटन केलं. सूर्योदय योजना ही सुरुवातीला गिर - सोमनाथ, पाटन आणि दाहोड या तीन जिल्ह्यातल्या १०५५ गावांमधे राबवण्यात येणार असून नंतर तीन वर्षांत संपूर्ण राज्याचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. तसंच आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्व खेड्यांपर्यंत चांगल्या आरोग्य सोयी पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

                                    *****

कोविड १९ च्या परिणामांच्या झळा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं चक्रवाढ व्याज आणि सामान्य व्याजाच्या रकमेमधली फरकाची रक्कम देण्यासाठी एका योजनेला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या वित्तसेवा विभागानं ही माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत एक मार्च ते ३१ ऑगस्ट या सहा महिन्यांच्या काळात दोन कोटी रुपयांपर्यंतचे सु्क्ष्म आणि मध्यम उद्योगांचे कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, क्रेडीट कार्डच्या थकीत रक्कमेवरील चक्रवाढ व्याज आणि सामान्य व्याजामधली फरकाची रक्कम देण्यात येणार आहे. मात्र, ज्या कर्जधारकांची बँकेकडील एकूण कर्जाची रक्कम ही दोन कोटींपेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचं वित्तसेवा विभागानं म्हटलं आहे.

                              ****

भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची इच्छा आहे. मात्र, केवळ पक्षांतर कायद्यामुळे त्यांच्या प्रवेशास अडचणी येत असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचं आज नाशिकच्या शासकीय विश्रामगृह इथं त्यांच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. गेल्या चार वर्षांपासून भीतीच्या छायेखाली होतो. मात्र, आता तणावमुक्त झालो असल्याचं ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीमधे साधा कार्यकर्ता म्हणून काम करायला मला आवडेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसा भरपाईसाठी जाहीर केलेल्या दहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचं वस्तुनिष्ठ पंचनामे करून वाटप केलं जाईल असं कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. ते सांगली इथं प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. या पॅकेजमध्ये कृषी क्षेत्रातील नुकसानीवर अधिक भर देण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. याबरोबरचं वीज, पाटबंधारे, पाणीपुरवठा, रस्ते वाहतूक या क्षेत्रातही नुकसान झालं असून त्यासाठीही मदत दिली जाईल असंही कदम यावेळी म्हणाले.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

****

उद्या अश्विन शुद्ध विजयादशमी म्हणजेच दसरा सण साजरा होत आहे. यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सत्प्रवृत्तीच्या विजयाचं प्रतीक असून सत्याचा नेहमीच विजय होत असल्याचं हा सण दर्शक असल्याचं ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा सण सुरक्षितपणे साजरा करण्याचं आवाहनही राज्यापालांनी जनतेला केलं आहे.

****

विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना विषाणू बाधित झाले आहेत. त्यांचा कोविड अहवाल बाधित आला असल्याचं त्यांनी आज दुपारी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. स्वत:ला विलगीकरणात ठेवलं असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना विषाणू चाचणी करण्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.

****

देशात आतापर्यंत कोविड १९ विषाणूंच्या संसर्गातून ७० लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहे. तर गेल्या चोविस तासांत देशात सुमारे ६७ हजार रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. त्यामुळे देशांतर्गत एकूण रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक ७८ शतांश टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण हे केवळ आठ पूर्णांक ७१ शतांश टक्के एवढ असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांत ५३ हजार ३७० रुग्ण समोर आले असून देशात कोविड १९ च्या संसर्गानं ६५० रुग्ण दगावले आहेत.

****

भारत-तिबेट सीमेवर अधिक पाळत ठेवण्यासाठी सरकारनं अधिकच्या ४७ तपासनाके स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी ही घोषणा केली. ते इंडो तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या ५९ व्या स्थापना दिनानिमित्त आज नोलत होते. आय टी बी पी सीमा सुरक्षेबरोबरच जम्मू आणि काश्मीरमधे दहशतवादाचा मुकाबला करत असून छत्तीसगडमध्ये नक्षलवादाचा सामना करत शांती प्रस्थापित करण्यासाठी मोठं योगदान देत असल्याचं रेड्डी यावेळी म्हणाले.                           

****

येत्या २८ ऑक्टोबर रोजी बिहार विधानसभेच्या पहिल्या फेरीतल्या ७१ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत असल्यानं प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे स्टार प्रचारकांच्या अनेक सभा घेत मतदारांना प्रभावित करण्याचे प्रयत्न करत आहेत. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी लखीसराई आणि बिहारशरिफमधे प्रत्येकी एक तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पटना आणि बरौलीमधे सभा होणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या देखील आज चार प्रचारसभा होणार आहे. तर राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी आज अनेक प्रचारसभांना संबाोधित केलं.

****

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विनायक पाटील यांच्या पार्थिवावर आज नाशिक इथं अमरधाम स्मशानभूमीत शासकीय इतमातात अंतसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल नाशिक इथं निधन झालं होतं. ते ७७ वर्षांचे होते. विनायक पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

****

केंद्रीय ग्राहक सरंक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव मधे विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. केंद्राच्या विविध योजनांचा निधी शहराला उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असून सोयगावच्या विकासाला प्राधान्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तालुक्यातल्या विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. तसंच प्रगतीपथावर असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, रस्ते विकास, पाणी पुरवठा, आदिवासी विकास आदी विविध योजनांचा आढावाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला.

*****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार कोविड बाधितांचा आज उपचारादम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या विषाणू संसर्गानं मृत झालेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार ५२ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३७ हजार २२५ झाली असून एक हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

****

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १३ हजार २४६ झाली आहे. यापैकी १२ हजार ४९३ रुग्ण या संसर्गातून बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३७४ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

//***************//

 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...