Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.
****
· राज्यात जून ते ऑक्टोबर अखेरपर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या
नुकसानासाठी १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर; मदत फसवी असल्याची विरोधकांची टीका.
· माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात
प्रवेश;
· खडसे यांच्या प्रवेशामुळे राज्य मंत्रिमंडळात बदलाच्या
बातम्या निराधार - खासदार शरद पवार.
· महापारेषण वीज कंपनीतली साडेआठ हजार रिक्त पदं भरण्याचा
राज्य सरकारचा निर्णय.
· राज्यात काल दिवसभरात आणखी सात हजार ३४७ कोविड बाधितांची
नोंद.
आणि
· मराठवाड्यात काल १६ कोविड बाधितांचा मृत्यू तर नवे ५३६
रुग्ण.
****
राज्यात जून ते ऑक्टोबर अखेरपर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या
नुकसानीसाठी भरपाई म्हणून राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. याविषयी
अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले –
शेतकऱ्याला
जिरायत व बागायत या क्षेत्रासाठी केंद्राच्या निकषाप्रमाणे सहा हजार आठशे रुपये प्रति
हेक्टर त्या निकषामधे आहे. आम्ही सहा हजार आठशेच्या ऐवजी दहा हजार प्रति हेक्टर दोन
हेक्टरपर्यंत देण्याचं ह्याच्यात मंजूर केलेलं आहे. फळपिकांसाठी जी मर्यादा १८ हजार
रुपये पर हेक्टर त्यांनी म्हटलेलं होतं, ती २५ हजार प्रति हेक्टर अशी आम्ही आज जाहीर
करतो आहोत. कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना हे जे काही नैसर्गिक संकट येतं आहे, या
कठीण परिस्थितीत देखील सगळीकडे ओढाताण होताना सुद्धा सरकार म्हणून आम्ही हे आपल्यासाठी
नम्रपणाने जाहीर करत आहोत, कृपा करून याचा स्वीकार करावा.
त्याचबरोबर या पॅकेजमध्ये नुकसानग्रस्त भागातल्या रस्ते-
पूल दुरुस्तीसाठी दोन हजार ६३५ कोटी, नगर विकास ३०० कोटी, महावितरण ऊर्जा २३९ कोटी,
जलसंपदा १०२ कोटी, ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठ्यासाठी एक हजार कोटी तर कृषी-शेती-घरांसाठी
साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी
दिली. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे मागितलेले एक हजार ६५ कोटी
रुपये तसंच पूर्व विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे मागितलेले
८०० कोटी रुपये, अद्यापही मिळालेले नाहीत, केंद्र सरकारकडून सध्या ३८ हजार कोटी येणं
बाकी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकार हे संपूर्ण देशाचे पालक
आहे, कोणताही दुजाभाव न करता त्यांनी मदत करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचं
आश्वासन दिलं असून, आवश्यकता भासल्यास पंतप्रधानांची भेट घेण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दर्शवली. दिवाळीच्या आधी सर्व नुकसानग्रस्तांना ही मदत पोहोचवावी असे निर्देशही
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
****
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर
केलेली ही मदत फसवी आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवला, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान प्रचंड
असतानाही, त्यांनी तोकडी मदत जाहीर केली, मदत द्यायची नाही म्हणून, ते केंद्र सरकारवर
जबाबदारी ढकलायचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी ट्विटरवरून
दिली आहे.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील, यांनीही सरकारनं तुटपुंजी मदत दिल्याची टीका केली आहे.
माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही राज्य सरकारनं
ही मदत घोषित करुन शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचं म्हटलं आहे. वास्तविक शेतातली नुकसानग्रस्त
पिकं बाहेर काढायची म्हटलं तरी त्यालाच एकरी सहा ते आठ हजार रुपये खर्च येणार आहे,
नवीन पेरा करायचा असेल तर एकरी १० हजार रुपये लागणार आहेत. मात्र सरकारनं कमी मदत देत,
शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचं निलंगेकर म्हणाले.
****
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षात प्रवेश केला. मुंबईत पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांचं पक्षात स्वागत केलं. खडसे यांनी यावेळी
व्यक्त केलेल्या मनोगतात, भारतीय जनता पक्षात ४० वर्ष काम केल्यानंतरही झालेल्या अन्यायाबद्दल
खंत व्यक्त केली. भारतीय जनता पक्षात संधी मिळेल याची अपेक्षा नव्हती, म्हणून दिल्लीतल्या
वरिष्ठांनी सांगितल्यानुसार निरपेक्ष भावनेनं राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करत असल्याचं
खडसे यांनी सांगितलं. भाजपचं काम ज्या निष्ठेनं केलं त्याच निष्ठेनं आणि दुप्पट वेगानं
राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करेन, असं खडसे म्हणाले.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात, खडसे
यांच्या पक्षप्रवेशानं खानदेशात पक्षकार्याला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना, कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही,
असं पवार यांनी सांगितलं. खडसे यांच्या प्रवेशामुळे राज्य मंत्रिमंडळात बदल होईल, या
बातम्या निराधार असून मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही असं पवार यांनी यावेळी स्पष्ट
केलं.
खडसे यांच्या सोबत त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, खडसे यांच्या पत्नी जळगाव जिल्हा दूध महासंघाच्या
अध्यक्ष मंदाताई खडसे, नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, बोदवडचे कृषी उत्पन्न
बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, किशोर गायकवाड, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद
जंगले, भुसावळच्या सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास
सूर्यवंशी, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, तसंच औरंगाबादचे माजी महापौर
सुदाम सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
****
पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक वाहन निर्मिती क्षेत्रातली अमेरिकेतल्या
आघाडीच्या टेस्ला कंपनीनं महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करावा, यासाठी शासन सकारात्मक
असून महाविकास आघाडी सरकारनं त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात कंपनीच्या
प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
यांनी वेबिनारद्वारे चर्चा केली. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांना
उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. याच अनुषंगाने टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात
आपला प्रकल्प सुरू करावा, असं राज्य शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं.
****
केंद्र सरकारनं राज्याला आर्थिक अडचणीत आणण्याचे धोरण अवलंबल्याचा
आरोप परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सेलू आणि मानवत तालुक्यात
अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाच्या पाहणीनंतर मलिक यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात
पत्रकार परिषद घेत, परभणी जिल्ह्यात एक लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे.
त्याप्रमाणे १०८ कोटी १५ लाख रुपये एवढी नुकसान भरपाई अपेक्षित असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेल्या पॅकेजच्या निकषानुसारच मदत केली जाईल. कोणीही
मदतीविना राहणार नाही, असा दिलासा मलिक यांनी दिला.
****
ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत तांत्रिक श्रेणीतली
जवळपास साडेआठ हजार रिक्त पदं भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ऊर्जामंत्री
डॉ राऊत यांनी काल या संदर्भातला आदेश जारी केला. यात तांत्रिक संवर्गातल्या सहा हजार
७५० आणि अभियंता संवर्गातल्या एक हजार ७६२ पदांचा समावेश आहे. ही पद भरती लवकरात लवकर
पूर्ण करण्याचे आदेश राऊत यांनी दिले आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गावर उपाय म्हणून विकसित होत असलेल्या
स्वदेशी लसीच्या वैद्यकीय परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. भारतीय
आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं भारत बायोटेक कंपनी, ही लस विकसित करत आहे.
लस परीक्षणाचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु
होईल. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २८ हजारांहून अधिक लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात
येणार असून, दहा राज्यातल्या १८ ठिकाणी हे परीक्षण होईल. मुंबईचाही त्यात समावेश आहे.
कोवॅक्सिन असं या लसीचं नाव असून या व्यतिरिक्त जायड्स कॅडिला लिमिटेड कंपनीकडून तयार
होत असलेल्या अन्य एका स्वदेशी लसीचं परीक्षण दुसऱ्या टप्प्यात आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’
या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या
टप्प्यातला हा सतरावा भाग असेल. सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून
या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल, त्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून पंतप्रधानांच्या
संबोधनाचा अनुवाद प्रसारित केला जाईल. या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुन:प्रसारण केलं
जाणार आहे
****
राज्यात काल दिवसभरात आणखी सात हजार ३४७ कोविड बाधितांची
नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ३२ हजार ५४४ झाली आहे. राज्यभरात
काल १८४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार
१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १३ हजार २४७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी
सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १४ लाख ४५ हजार १०३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले
असून, सध्या एक लाख ४३ हजार ९२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत काल आणखी एक हजार ४७० कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळले, तर ४६ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ७२१ नवे रुग्ण, तर ३९ मृत्यूंची नोंद
झाली. नाशिक जिल्ह्यात ४१९ नवे रुग्ण आढळले, तर चार जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात
१२७, पालघर १४५, गोंदिया ९५, बुलडाणा ८२, सिंधुदुर्ग ३४, धुळे ३२, तर वाशिम जिल्ह्यात
नव्या १४ रुग्णांची नोंद झाली.
****
मराठवाड्यात काल १६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला, तर नव्या ५३६ रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला,
तर ८२ नवे रुग्ण आढळले. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू
झाला, नांदेड जिल्ह्यात आणखी ८९, तर परभणी जिल्ह्यात नवे १८ रुग्ण आढळले. लातूर आणि
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, लातूर जिल्ह्यात नव्या
७४, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४० रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात
प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात नवे १२१, तर जालना जिल्ह्यात
नवे ९६ रुग्ण आढळून आले. हिंगोली जिल्ह्यात काल नव्या १६ रुग्णांची नोंद झाली.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विनायक पाटील यांचं
काल नाशिक इथं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. विनायक पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळात
उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि युवक कल्याण या विभागांचं मंत्रिपद भूषवलं होतं.
****
मिरज मार्गे धावणाऱ्या चार प्रवासी गाड्यांचे रुपांतर जलद
रेल्वेमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर - पुणे, मिरज - हुबळी, मिरज - परळी
आणि मिरज कॅसलरॉक या प्रवासी रेल्वेचा समावेश आहे. या गाड्यांचे थांबे देखील कमी करण्यात
येणार आहेत. प्रवासी रेल्वे गाड्यांना निश्चित ठिकाणी पोहोचण्यास विलंब लागत होता.
या गाड्यांना प्रवासातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे
या गाड्या जलद करण्यात येत आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या
शारदीय नवरात्रोत्सवात काल भवानी तलवार अलंकार पूजा बांधण्यात आली. छत्रपती शिवाजी
महाराजांना माता तुळजाभवानी तलवार प्रदान करते, अशा स्वरुपात ही पूजा बांधण्यात येते.
****
नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारा मंडळाला दसऱ्याच्या हल्लाबोल
मिरवणुकीला मुंबई उच्च न्यायालयानं अटी आणि शर्तींवर परवानगी दिली आहे. उद्या रविवारी
सायंकाळी पावणे दोन किलोमीटर अंतराची मिरवणूक काढण्यासाठी दीड तासाचा वेळ न्यायालयानं
मंजूर केला आहे. मर्यादित सदस्यांच्या सहभागात वाहनातून ही मिरवणूक काढली जाणार आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगांव राजा इथला बालाजी महाराज
वार्षिक उत्सव यावर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात
आला आहे. जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक
कार्यक्रम आणि इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात
आलेली आहे.
****
परभणी जिल्ह्यात नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी
सर्वतोपरी उपाययोजना राबवल्या जात असून आतापर्यंत २९४ जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई
करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलानं एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
दर रविवारी लावण्यात आलेली जनता संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानं
परिपत्रक जारी करुन काल ही माहिती दिली.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अजून टळला नसून यावर मास्क
हेच सध्या प्रभावी औषध असल्याचं औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटलं
आहे. जमीयत उल उलमाए हिंदच्या वतीनं काल औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविलयात
कोरोना योद्ध्यांचा सत्कार जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत
होते. सुमारे ३०० जणांना यावेळी कोविड योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,
प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
कोविड-19 प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन उस्मानाबादचे
पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या शासकीय अभ्यासिका सुरु कराव्यात, या मागणीसाठी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या अभ्यासिकेसमोर आंदोलन केलं. या आंदोलना दरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांना
पोलिसांनी ताब्यात घेतलं.
भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनंही वसतीगृह
आणि ग्रंथालय पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी प्र - कुलगुरु प्रवीण वक्ते यांना
काल निवेदन देण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील
सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. उस्मानाबादचे
जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment