Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.
****
· राज्यातल्या १६७ धरणांच्या पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पाला
केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
· इथेनॉल खरेदीचे आता वेगवेगळे दर, नव्या दरांमुळे शेतकऱ्यांना
चांगला भाव मिळण्याची आणि तेल आयात घटण्याची सरकारला आशा.
· औरंगाबादमधील ऑरिक सिटीमध्ये वैद्यकीय उपकरण पार्कला विशेष
प्रोत्साहन देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
· मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर
नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आजपासून सुरु.
· राज्यात आणखी पाच हजार ९०२ कोविड बाधितांची नोंद, १५६ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
· मराठवाड्यात १३ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ४७४ रुग्णांची
नोंद.
आणि
· ‘लव्ह औरंगाबाद मिशन’ला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या
हस्ते प्रारंभ.
****
धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं
मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरातल्या ७३६ धरणांचा समावेश असून, त्यात राज्यातल्या
१६७ धरणांचा समावेश आहे. यासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट
बँक आर्थिक मदत करणार आहे. या प्रकल्पातंर्गत निवड झालेल्या धरणांची सुरक्षा आणि कार्यक्षमता
सुधारणं, शाश्वत विकास करणं, धरणांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्यामंध्ये संस्थात्मक
व्यवस्था मजबूत करणं, धरणांशी संबंधित विभागांचं मजबुतीकरण करणं, धरणांच्या माध्यमांतून
महसूल मिळवण्याची शक्यता तपासणं, यासह प्रकल्प व्यवस्थापन करणं या घटकांचा यात समावेश
असेल.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांमार्फत इथेनॉल खरेदीबाबतच्या
व्यवस्थेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पूर्वी इथेनॉलचा एकच दर असे,
मात्र आता वेगवेगळे दर असतील. साखरेपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर ६२ रूपये ६५ पैसे
प्रतिलिटर असेल तर साखरेचं प्रमाण अधिक असलेल्या ऊस चिपाडाच्या बी दर्जाच्या अवजड मळीपासून
तयार केलेल्या इथेनॉलचा दर ५७ रूपये ६१ पैसे आणि संपूर्ण साखर काढून घेतल्यानंतर उरलेल्या
चिपाडाच्या सी दर्जाच्या अवजड मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर ४५ रूपये ६९ पैसे
प्रतिलिटर असेल. नव्या दरांमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी चांगला भाव मिळेल आणि
तेल आयात कमी होण्यासही मदत होईल, अशी आशा सरकारनं व्यक्त केली आहे.
****
औरंगाबादमधील ऑरिक सिटीमध्ये वैद्यकीय उपकरण पार्क आणि
रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्कसाठी विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. यामुळे
राज्यामध्ये वैद्यकीय उपकरण तसंच औषधी उत्पादनास मोठा वाव मिळणार आहे. राज्याची बल्क
ड्रग पार्क आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क याची प्रकल्प किंमत दोन हजार ४४२ कोटी
रुपये इतकी तर वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्कची प्रकल्प किंमत ४२४ कोटी रुपये इतकी
आहे. ही विशेष प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर नजिकच्या काळामध्ये निवडणुका न
झालेल्या १२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी
सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश
लवकरच जारी करण्यात येणार आहे. मे आणि जून २०२० मध्ये मुदत संपलेल्या तीन महानगरपालिका,
आठ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया कोविडमुळे स्थगित करण्यात
आली आहे. यामध्ये औरंगाबाद महानगरपालिकेचाही समावेश आहे.
शिवभोजन थाळीचा दर पाच रुपये करण्याचा निर्णयही काल घेण्यात
आला. ३१ मार्च २०२१ पर्यंत हा दर लागू राहणार आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर
नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आजपासून सुरु होत आहेत.
केंद्र सरकारने छोट्या व्यापाऱ्यांसाठी दोन मेट्रिक टन तर मोठ्या पदांसाठी २५ मेट्रिक
टन कांदा साठवणुकीची मर्यादा घातली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना नवीन कांदा घेऊन त्याची
साठवणूक करण्यात अडचणी येत असल्यानं व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कांदा निलाव
बंद केले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
होत आहे त्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने काल कांदा उत्पादक
शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी
साठवण मर्यादा वाढवून द्यावी यासाठी राज्य शासन पाठपुरावा करेल, असं आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी,
कांदा लिलाव सुरु करण्याचं आवाहन या बैठकीत केलं होतं.
दरम्यान, केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक
सीताराम मीना यांनी काल कांदा साठवणुकीबाबत सुधारित आदेश जारी केले असून, त्यात व्यापाऱ्यांना
थोडा दिलासा दिला आहे. कांदा साठवणुकीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली नसली तरी व्यापाऱ्यांकडे
असलेला कांदा पॅकिंग करून तो अन्यत्र पाठवण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला
आहे. त्यामुळे शासनाने घातलेल्या मर्यादेपूर्वी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा त्यांना
आता विकता येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन कांदा खरेदी करता येणार असल्यामुळे अडचण येणार
नाही.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं,
वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन जेष्ठ साहित्यिक, नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु, माजी खासदार डॉक्टर जनार्दन
वाघमारे यांनी केलं आहे.
****
केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनंही प्रतिबंधित क्षेत्रात
३० नोव्हेंबरपर्यंत टाळेबंदी कायम ठेवली आहे. राज्य सरकारनं काल याबाबतचा आदेश जारी
केला. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरचे सर्व व्यवहार कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून सुरु
राहणार आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या
सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालयातल्या ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना
कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचं परिपत्रक शालेय शिक्षण विभागानं काल
जारी केलं. शाळा जेव्हा सुरु होतील, तेव्हा पालकांची लेखी हमी घेण्यात यावी, त्यानंतरच
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद उन नबी
आज साजरी होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या
आहेत. हा दिवस प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण
करुन देतो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत
केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर रद्द
करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये
राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं प्रवास करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल
परब यांनी दिली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या
नेतृत्त्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट
घेतली. वाढीव विज देयकं, तसंच दूध दर वाढ, मंदिर प्रवेश, अकरावी प्रवेश आदी सर्वसामान्यांचे
प्रश्र्न तातडीनं सोडवले जावेत, यासाठी ही भेट घेतल्याची माहिती राज ठाकरे यांनी वार्ताहरांशी
बोलताना सांगितलं. या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी पाच हजार ९०२ कोविड बाधितांची
नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ६६ हजार ६६८ झाली आहे. राज्यभरात
काल १५६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार
७१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सात हजार ८८३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी
सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले
असून, सध्या एक लाख २७ हजार ६०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला, तर नव्या ४७४ रुग्णांची नोंद झाली.
जालना जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू, तर नवे ६० रुग्ण,
बीड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू, तर नवे ७० रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यात तीन रुग्णांचा
मृत्यू, तर नवे १३३ रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात ७१, उस्मानाबाद जिल्ह्यात ५६,
लातूर जिल्ह्यात ५०, परभणी जिल्ह्यात २५ आणि हिंगोली जिल्ह्यात नव्या नऊ रुग्णांची
नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी एक हजार १२० रुग्ण आढळले, तर ३३ जणांचा
मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ७०२ नवे रुग्ण, तर २१ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात
३१३ रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात २६५, सातारा १८६,
सोलापूर १५७, सांगली १३३, रायगड १२५, गडचिरोली ११८, बुलडाणा ८४, यवतमाळ ४४, सिंधुदुर्ग
४३, वाशिम २९, धुळे २२, तर रत्नागिरी जिल्ह्यात नव्या १२ रुग्णांची नोंद झाली.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
ऊन्हाळी परीक्षांचे निकाल उद्या ३१ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. कुलगुरु डॉ.उद्धव भोसले
यांनी काल ही माहिती दिली. पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा
आज संपणार आहेत. एक दोन तांत्रिक अडचणी वगळता सर्व परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असल्याचा
दावा कुलगुरुंनी केला आहे.
****
औरंगाबाद स्मार्ट सिटी विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून
सुरु करण्यात आलेल्या लव्ह औरंगाबाद मिशनला काल पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते
सुरुवात झाली. शहराचे मुलभूत प्रश्न मार्गी लागत असताना नागरिकांना शहराबद्दल प्रेम
वाटावं, आपुलकी निर्माण व्हावी, त्यांनी शहराबद्दलचे सकारात्मक विचार समाजात मांडावे,
या उद्देशानं महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी हा उपक्रम सुरु केला आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं काल राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी
महामार्ग योजनांची आढावा बैठकही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. औरंगाबाद -
वैजापूर, औरंगाबाद- सिल्लोड- अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातल्या सर्व रस्त्यांच्या
दुरुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करत कालमर्यादा पाळण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित
अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यांतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, शहरातले प्रमुख रस्ते
यासह समृद्धी महामार्गाच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन, सर्व संबंधित यंत्रणांना सोपवलेली
कामं दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
परभणी जिल्ह्यातल्या सर्व ५१ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा
निकष लावावा, संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतीवृष्टीची मदत सर्वच शेतकऱ्यांना
देण्यात यावी, या आणि इतर मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास दोन नोव्हेंबरपासून उपोषण
करण्याचा इशारा आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी काल जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांना निवेदन दिलं.
परभणी जिल्ह्यातल्या जांब महसूल मंडळाचा अतिवृष्टीच्या
यादीत समावेश करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्यासह ग्रामस्थांनी
काल परभणी शहरात धरणे आंदोलन केलं. यासंबधीचं निवेदन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना
देण्यात आलं.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांच्या
आमदार निधीतून घेतलेली वैद्यकीय यंत्रसामुग्री काल लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय
वैद्यकीय विज्ञान संस्थेस सुपुर्द केली. कोरोना विषाणूग्रस्त रूग्णांकरता वैद्यकीय
यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदीसाठी चव्हाण यांनी मे २०२० मध्ये दहा लाख ४८ हजार रुपये
इतका निधी दिला होता, त्यातून हे साहित्य खरेदी करण्यात आलं.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं,
वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन जेष्ठ साहित्यिक छाया
महाजन यांनी केलं आहे.
****
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२०-२१ च्या ३५ व्या
गळीत हंगामाचा शुभारंभ काल कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर यांच्या हस्ते झाला. अंबाजोगाई
साखर कारखाना बीड जिल्ह्यातल्या इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाला भाव देईल, शेतकऱ्यांनी
आपला ऊस कारखान्याला द्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या भाऊराव चव्हाण
सहकारी साखर कारखान्याच्या पंचवीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार आणि कृषी राज्यमंत्री
विश्वजित कदम यांच्या हस्ते काल झाला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
****
बीड जिल्हा परिषदेतले शाखा अभियंता वशिष्ट तावरे यास २५
हजार रूपयांची लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली. रस्ता मजबुतीकरण केलेल्या कामाची
मोजमाप पुस्तिका सही करून बांधकाम विभागास पाठवून त्याचे बील मंजूर करण्यासाठी त्यानं
ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यातले कवी देविदास फुलारी यांना नारायण सुर्वे
कला अकादमीचा कुसुमाग्रज काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानचिन्ह, ग्रंथ
आणि दोन हजार पाचशे रूपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
No comments:
Post a Comment