Sunday, 25 October 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25 OCTOBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 October 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००

****

** देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० टक्के

** कोरोना विषाणू संसर्गाचे नांदेडमध्ये १०१ तर जालन्यामध्ये ६९ नवे रुग्ण

** अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी आणखी उदारता दाखवावी - पंकजा मुंडे यांची मागणी

आणि

** कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर विजयादशमीचा सण तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिन साधेपणानं साजरा

****

देशातला कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के झाला आहे. देशात एकूण रुग्णसंख्येच्या ८ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण सध्या उपचार घेत असून ही संख्या ६ लाख ६८ हजार आहे.आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सुमारे ६२ हजार रुग्ण कोरोना विषाणू संसर्गमुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून ५० हजार रुग्णांची वाढ झाली आहे. देशभरात आता पर्यंत ७८ लाख ६४ हजार ८११ कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले असून  ७० लाख ७८ हजारांहून अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात  १०१ कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण आढळून आले. जिल्ह्यातली रुग्णसंख़्या आता १८ हजार ७५३  झाली आहे. कोरोनाविषाणू संसर्ग बाधेमुळे आज एका रूग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातली मृतांची संख्या आता ५०० झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातले एकूण १७ हजार २१९ रुग्ण बरे झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात सध्या ९०५ रूग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे ६९ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातली एकूण  रुग्णसंख्या आता दहा हजार ३६५ झाली आहे.  यातले आठ हजार ७७८ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असून संसर्गमुक्त झालेल्या १७९ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. जालना जिल्ह्यात सध्या १ हजार ३१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन माजी मंत्री आणि राळेगावचे आमदार प्राचार्य अशोक उईके यांनी केलं आहे. 

****

अतीवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी दिलेलं दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज पुरेसं नसल्यानं त्यांनी आणखी उदारता दाखवावी, असं भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यात त्या आज बोलत होत्या. उसतोड कामगारांच्या समस्या कायम आहेत असं नमुद करताना उसतोड कामगार महामंडळ कधी होणार, असा प्रश्र्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या संकटाचा उल्लेख करताना या संसर्गामुळे जनसंपत्ती कमी होऊ नये, हेच आपलं देवाकडे मागणं असल्याचं मुंडे यावेळी म्हणाल्या.

****

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज बीड जिल्ह्यात भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतला. ऊसतोड कामगारांची मोठी अडचण होत असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दबावगट निर्माण होणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यात शिवारांमध्ये शिवारांमधे अजूनही पाणी साचलेलं असल्याची माहिती देताना कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात गंभीर परिस्थीती निर्माण झाली असल्याचं आंबेडकर यावेळी म्हणाले.   

****

राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी केंद्रसरकारनं भरीव मदत द्यावी, अशी मागणी केंद्रीय

राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधानांकडे  पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात लवकरच केंद्रीय अर्थमंत्री आणि कृषीमंत्र्यांचीही आपण भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी  आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा यावर्षी दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात होणार असल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साडेसहा वाजता  शिवाजी पार्क इथल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करतील. त्यानंतर सात वाजता त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल. मोजकेच नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असून उर्वरित शिवसेना कार्यकर्ते `ऑनलाईन` सहभागी होतील, असंही राऊत यांनी सांगितलं.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात येत असल्याच्या पार्श्र्वभूमीवर सरकारनं राज्यातल्या व्यायामशाळा सुरू करायला परवानगी दिली असून आजपासून या संदर्भातल्या नियम आणि अटी पाळून अनेक व्यायामशाळा सुरू झाल्या. नांदेडचे जिल्ह्याधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी या संदर्भातले आदेश जारी केले असून जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या भागातल्या व्यायामशाळा सुरु करता येणार नाहीत, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचं सावट कायम असतानाच शासनानं मंदिर उघडायला परवानगी दिली नसल्यामुळे भाविकांतर्फे सर्वत्र विजयादशमीचा सण आज  साधेपणानं साजरा करण्यात येत आहे. उत्साह कायम असला तरी सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यात आले आहेत. परभणी शहरातल्या बालाजी मंदिरात यंदा दरवर्षी प्रमाणे गर्दी नव्हती. नाशिकमधे दसऱ्याला सीमोल्लंघनासाठी वणी इथली सप्तश्रृंगी देवी तसंच चांदवड इथं रेणुका देवी आणि नाशिक शहरात श्री कालिका देवी मंदिरात नागरिक आपट्याची पानं अर्पण करून नागरिक सीमोल्लंघनाची परंपरा आहे. मात्र यंदा या परंपरेला फाटा देण्यात आला. दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी बाजारात मात्र गर्दी असून घर खरेदीच्या नोंदणीसाठी दुय्यम नोंदणी कार्यालयं सुरू ठेवण्यात आली होती.

****

नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साधेपणानं साजरा करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून धम्म अनुयायांना आपल्या घरीच राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांना मानवंदना  अर्पण  करण्याचं आवाहन केलं होतं. आज सकाळी  दीक्षाभूमीच्या परिसरातल्या तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसंच मध्यवर्ती स्तुपातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला माल्यार्पण स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

****

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव कधी संपेल हे सांगता येत नाही त्यामुळे आता सर्वांनी त्याच्यासोबतचं जगणं शिकावं लागणार आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते आज, नागपूरमध्ये रेशीमबाग परिसरात डॉ. हेडगेवार स्मृति मंदिर परिसरात विजयादशमी आणि शस्त्रपूजनाच्या निमित्तानं आयोजित उत्सवात ऑनलाईन बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या अडचणींवर भर दिला. स्थलांतरामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकांना नवीन रोजगार मिळवायचा आहे, मात्र त्यांना प्रशिक्षण नाही. त्यामुळे रोजगारांचे निर्माण आणि प्रशिक्षण यावर विशेष भर द्यावा लागेल, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या बालानगर ते ढोरकीन रस्त्यावर सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि वाहतूक करण्यात येणारं वाहन असा एकूण सुमारे ३ लाख रुपयाचा मुद्देमाल औरंगाबाद ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकानं ताब्यात घेतला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास पोलीसांनी ही कारवाई केली.

****

नांदेड शहरातल्या श्रीनगर भागात भूकंपाचे २ सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर ० पूर्णांक ६ आणि ० पूर्णांक ८ अशी नोंदवण्यात आली.

****

 

No comments: