आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० ऑक्टोबर
२०२० सकाळी ११.००
वाजता
****
राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांसाठी ५० टक्के उपस्थितीचा शासकीय संकल्प जाहिर केला आहे. शिक्षक आणि अन्य
कर्मचाऱ्यांना ‘ऑन लाईन’ आणि ‘ऑफ लाईन’ शिक्षण किंवा दूरध्वनीद्वारे समुपदेशनासंबंधी
कार्य पूर्ण करता यावं, यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर नाशिक जिल्ह्यातल्या
बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आज सुरु झाले आहेत.
****
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात
सर्व सामर्थ्यानं लढा देत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या मुद्यावर
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा ते मुंबई असा ५८० किलो मीटर पायी प्रवास करून आलेल्या
मराठा तरुणांची भेट घेत आरक्षणासंदर्भात शासन करत असलेल्या कार्यवाहीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी
या तरुणांना दिली.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या काल दिवसभरात पाच हजार ९०२ रुग्णांची
नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ६६ हजार ६६८ झाली आहे. राज्यभरात
काल १५६ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
****
मराठवाड्यात काल १३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या
४७४ रुग्णांची नोंद झाली.
****
सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतीचं ३८ कोटी ३० लाख रुपयांचं
नुकसान झालं, असून ३४ हजार १९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे ६३ हजार ९४ शेतकऱ्यांच्या
शेतांचं नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनानं याचा अहवाल नुकताच राज्य सरकारला पाठवला
असून, शेतकऱ्यांना आता सरकारी मदत वाटपाची प्रतीक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या सोने तस्करी प्रकरणी राष्ट्रीय तपास
संस्थेनं सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात काल छापे टाकून जाधववाडी इथं संबंधितांची
चौकशी केली. दोन महिन्यांपूर्वी दिल्ली रेल्वे स्थानकावर ८३ किलो ६२१ ग्रॅम सोन्याची
अवैध वाहतुक करतांना महसूल गुप्तचर संचालनालयानं आरोपींना ताब्यात घेतलं होतं.
****
No comments:
Post a Comment