Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.
****
** सरदार वल्लभभाई पटेल यांच्या
जयंती निमित्त देशभरात
सर्वत्र एकता
दौडचं आयोजन
** सार्वजनिक
क्षेत्रातल्या बँकांच्या बचत खात्यातून पैसे काढणं आणि जमा करण्यासाठी शुल्क
आकारलं जाण्याच्या वृत्ताचं केंद्र सरकारकडून
खंडन
** नाशिक
जिल्ह्यात लासलगावसह प्रमुख कृषी
उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव
पूर्ववत सुरु
** राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्याला प्राधान्य- परिवहन
मंत्री अनिल परब
** राज्यात
आणखी सहा हजार १९० कोविड बाधितांची नोंद, १२७ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू
** मराठवाड्यात
१७ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ४८१ रुग्णांची नोंद
आणि
** औरंगाबाद
शहरात पाच नोव्हेंबरपासून स्मार्ट सिटी बस सेवा सुरु होणार
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५ वी जयंती आज देशभरात
राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त सर्वत्र एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या नर्मदा
जिल्ह्यातल्या केवाडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं यानिमित्त
काढण्यात येणाऱ्या एकता दौडमध्ये
सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान कालपासून दोन दिवसीय गुजरातच्या
दौऱ्यावर असून, त्यांनी काल केवाडिया
मध्ये जंगल सफारी प्रकल्प, आरोग्य वन, एकता
मॉल आणि बाल पोषण उद्यानाचं उद्घाटन केलं. आरोग्य वनात जवळपास १५ एकर परिसरात
औषधीयुक्त वनस्पतींचं रोपण करण्यात आलं आहे. यात ३८० प्रजातींची पाच लाख रोपं
आहेत. योग आणि आयुर्वेद लक्षात घेता, याचं निर्माण करण्यात
आलं आहे. एकता मॉलमध्ये हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांचं प्रदर्शन भरवण्यात आलं
आहे. हा मॉल ३५ हजार चौरस फुटात पसरलेला असून, ११० दिवसांत
तयार करण्यात आला आहे. सी प्लेनचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या
हस्ते होणार आहे.
****
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस समिती
आज राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन करणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी
प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आज वर्धा मधल्या सेवाग्राम आश्रमसमोर होणाऱ्या सत्याग्रहात काँग्रेसच्या
प्रदेश अध्यक्षांसह राज्यातले अनेक मंत्री सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारचा नवीन
कृषी कायदा अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारा आणि शेतकरी विरोधी आहे, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडून बचत खात्यातून पैसे काढणं आणि जमा
करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार असल्याच्या वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे.
बँकांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं
आहे. बँकेतल्या जनधन खात्यातून नगदी रक्कम काढल्यास शंभर रुपये शुल्क आकारलं जातं, हे वृत्तही खोटं असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसह प्रमुख कृषी उत्पन्न बाजार
समित्यांमध्ये कालपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरु झाले. काल लासलगाव इथं सरासरी
पाच हजार शंभर रुपये प्रतीक्विंटल तर विंचुर इथं पाच हजार तिनशे रुपये
प्रतीक्विंटल भाव मिळाला. केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर
मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले
होते. काल सकाळीच लासलगाव बाजार समितीमध्ये सहाशे मेट्रिक टन कांद्याची आवक
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा राज्याचा भाग कर्नाटकमध्ये गेल्यानं एक नोव्हेंबर
हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर
राज्याचे सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी सीमा भागातल्या
जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि एकमेकातल्या सुरक्षित आंतर राखण्याचं आवाहन औरंगाबाद इथल्या क्रांतीगुरु
लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे संचालक डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी आवाहन केलं आहे.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्याला
सध्या प्राधान्य देण्यात आलं असून, प्रसंगी महामंडळाला यासाठी कर्ज काढावं लागलं
तरी चालेल, असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष
अनिल परब यांनी म्हटलं आहे. महामंडळानं राज्य शासनाकडे
कर्मचाऱ्यांचे पगार सोबतच एसटीच्या दैनंदिन खर्चासाठी एकूण तीन हजार ६०० कोटी
रुपयांची मागणी केली आहे, मात्र कोविड काळात शासनाचं देखील
उत्पन्न घटल्यामुळे केवळ शासनावर अवलंबून न राहता इतर पर्यायांची चाचपणी महामंडळ
करत असल्याचं परब म्हणाले. या परिस्थितीत महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी नियमित
कामकाजासोबत मालवाहतूक, टायर रिमोल्डिंग, एसटी पेट्रोल पंपावर इतर वाहनांना इंधन विक्री सारखे उपक्रम राबवत
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
प्रवास भत्ता सवलत- एलटीसी व्हाउचर योजनेअंतर्गत केंद्रीय
कर्मचाऱ्यांना दिली गेलेली प्राप्तिकरातली सवलत राज्य सरकारी
कर्मचारी तसंच सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग, आणि आस्थापना
तसंच खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनाही देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला
आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि सावर्जनिक क्षेत्रातील संस्था, बँका तसंच खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एलटिसी
योजना लागू असेल, तर ते कर्मचारी त्यांना मिळालेल्या प्रवास
भत्त्यातून केंद्रीय योजनेप्रमाणे खरेदी करू शकतात.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी सहा हजार १९० कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ७२ हजार ८५८ झाली आहे.
राज्यभरात काल १२७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत
४३ हजार ८३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल आठ हजार २४१ रुग्ण बरे झाल्यानं
त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख तीन हजार ५० रुग्ण कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख २५ हजार ४१८ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४८१ रुग्णांची नोंद झाली.
जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार बाधितांचा मृत्यू झाला. जालना
जिल्ह्यात ११३, तर लातूर जिल्ह्यात आणखी ५५ रुग्ण आढळले.
नांदेड जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४३
रुग्णांची नोंद झाली. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा
मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात ७८, तर
उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या ४१ रुग्णांची भर पडली. औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात
प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात १२७,
तर परभणी जिल्ह्यात आणखी १४ रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात नव्या
दहा रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी एक हजार १४५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात २५२ नवे रुग्ण, तर १४ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक
जिल्ह्यात ३४४ रुग्ण आढळले, तर चार जणांचा मृत्यू झाला.
अहमदनगर जिल्ह्यात २५१, सातारा २६०, सोलापूर
१७८, रायगड १५२, गडचिरोली ११५, बुलडाणा ६६, जळगाव ५३,धुळे २८,
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी १२, तर वाशिम जिल्ह्यात नव्या आठ रुग्णांची नोंद झाली.
****
औरंगाबाद शहरात पाच नोव्हेंबरपासून स्मार्ट सिटी बस सेवा सुरु होणार आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल ही माहिती दिली. औरंगाबाद इथं महानगरपालिकेच्या
आढावा बैठकीत ते काल बोलत होते. औरंगाबाद शहरास स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टीने
नागरिकांना रस्ते, पाणी, शिक्षण,
वाहतूक आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्याचं ते
यावेळी म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात महानगरपालिकेनं सुरु ठेवलेल्या
उपाययोजना यापुढेही सुरु ठेवाव्यात, असं त्यांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, जंगल सफारी यासह क्रांती चौक
इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी
यावेळी आढावा घेतला.
****
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीनं तडाखा बसलेल्या रस्त्यांसह पुलांच्या
दुरूस्तीसाठी ५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री
अशोक चव्हाण यांनी दिली. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या दोन
ते तीन महिन्यात या कामांच्या मंजुरीबरोबरचं
निविदांची प्रक्रियासुध्दा सुरू केली जाईल, अशी ग्वाही
त्यांनी दिली. या कामांकरिता आणखीन निधी हवा असेल तर तोही उपलब्ध केला जाईल,
असं चव्हाण यावेळी म्हणाले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
यावर्षी एम. फील. अभ्यासक्रमासाठी
प्रवेश सुरु ठेवण्यात येणार आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या विविध विभागप्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठात एम.
फील, पीएच. डी. संशोधनासाठी राज्यभरातून अनेक विद्यार्थी येतात, विद्यार्थ्यांची
मागणी आणि फेलोशीपचं प्रमाण पाहता, यंदा प्रवेश सुरु
ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एम.फिल. अभ्यासक्रम प्रवेशासाठी `ऑनलाईन` सामायिक प्रवेश परीक्षा येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या
पदवी आणि पदव्यूत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या ते २९ ऑक्टोबर या काळात झालेल्या
परिक्षा तांत्रिक अडचणीमुळे देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची आज आणि उद्या
फेरपरिक्षा होणार आहे.
****
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी आणि गटसचिवांना दिवाळी बोनस
म्हणून एका महिन्याचा जादा पगार देण्यात येणार आहे. बँकेचे मार्गदर्शक दिलीप
देशमुख यांनी काल बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली.
****
कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक
अंतर राखण्याचं आवाहन परभणीचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ श्रीराम मसलेकर यांनी केलं
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर
तालुक्यातल्या विरगाव पोलिस ठाण्याचा हवालदार खंडू महादेव मोरे याला दोन हजार
रुपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली. मद्याचं अवैध दुकान सुरू ठेवण्यासाठी
त्यानं तक्रारदाराकडून मासिक हप्ता दोन हजार रुपयांची मागणी केली होती.
****
भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी त्यांच्या
आमदार निधीतून तीन रुग्णवाहिकांकरता ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
लातूर तालुक्यातल्या मुरुड इथं ग्रामीण रुग्णालय, जवळा
इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच रेणापूर तालुक्यातल्या पोहरेगाव इथल्या प्राथमिक
आरोग्य केंद्रासाठी या रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत.
****
राज्यात काल ईद-ए -मिलाद-उन-नबी साधेपणानं साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे
अंतिम प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद-ए-मिलाद-उन-नबी म्हणून साजरा
केला जातो. या दिवशी ठीकठिकाणी जुलूस काढला जातो. तसंच मशिदींमधून विविध
कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर जुलूस तसंच जाहीर कार्यक्रम न करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी
घेतला होता. उस्मानाबाद इथं ईद ए मिलाद उन्नबी` निमित्त
काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी साठ जणांनी रक्तदान केलं.
औरंगाबाद शहरातही चार ठिकाणी रक्तदान शिबिरं घेण्यात आली. शहरात जुलूस न काढता
मुस्लिम बांधवांनी घरातच दरुद शरीफचं पठण करत साधेपणानं ईद साजरी केली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील जेष्ठ नेते तथा नांदेड नगर पालिकेचे
माजी नगराध्यक्ष मोहनराव गोडबोले यांच काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. नांदेड
जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते माजी अध्यक्ष होते.
****
लातूर शहरात कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात
नसल्याबद्दल भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शहरात
ओला आणि सुका कचरा एकाच ठिकाणी टाकला जातो, त्यामुळे
दुर्गंधी पसरते परिणामी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं
युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंग कव्हेकर यांनी म्हटलं आहे. लातूर
महानगरपालिका कचरा व्यवस्थापनाचं सोंग करत असून, याबाबत
योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परताना मिळवून देण्याचं अमिष
दाखवून बनावट वेबसाईटच्या आधारे अनेकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य
टोळीतल्या पाच संशयितांना जालना पोलिसांनी काल मध्य प्रदेशातून अटक केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी ही माहिती दिली. जालन्यातल्या एका
शिक्षकाने शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाल्याबाबत तालुका ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याच्या तपासात तालुका जालना पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या या टोळीचा
पर्दाफाश केल्याचं त्यांनी सांगितलं.
//*************//
No comments:
Post a Comment