Saturday, 24 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.10.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधे दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटन केलं. तसंच त्यांनी यावेळी गुजरातमधल्या शेतकऱ्यांसाठी ’किसान सूर्योदय योजनेचे’ देखील उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमधे बाल हृदय रुग्णालयांचा देखील समावेश आहे. या रुग्णालयात युएन मेहता हृदयरोगशास्र संशोधन संस्थेमधून दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित देखील केले.

****

देशात आतापर्यंत कोविड-१९ विषाणू संसर्गातून ७० लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहे. तर गेल्या चोवीस तासांत देशात सुमारे ६७ हजार रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. देशात समोर येत असलेल्या रुग्णांमधे दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतले सुमारे ८१ टक्के रुग्ण आहेत. यामधे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश आहे. यासह देशांतर्गत एकूण रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक ७८ शतांश टक्क्यांपर्यंत पोहचलं आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांचं प्रमाण हे केवळ आठ पूर्णांक ७१ शतांश टक्के एवढं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या चोवीस तासांत ५३ हजार ३७० रुग्ण समोर आले आहेत. तर रुग्ण दगावण्याचं प्रमाण हे केवळ एक पूर्णांक ५१ शतांश टक्के एवढं आहे. गेल्या चोवीस तासांत देशात कोविड-१९ च्या संसर्गाने ६५० रुग्ण दगावले आहेत.

****

कोविड-१९ आजाराविरोधात लढाईसाठी येणारे तीन महिने अतिशय महत्त्वपूर्ण आणि निर्णायक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृष्यसंवाद प्रणालीचा माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. जर येत्या उत्सवाच्या काळात आणि हिवाळा ऋतूमधे या आजाराविरोधात पुरेशी खबरदारी आणि उपाययोजना केल्या तर आपण या लढाईत चांगल्या स्थितीमधे असू असा विश्वासही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. तपासणी, पाठपुरावा आणि उपचार या प्रणालीचा सातत्याने उपयोग करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. तसंच अगदी साध्या खबरदारीच्या उपायांवर अधिक भर दिल्यास या आजाराविरोधातल्या लढाईला मोठं बळ मिळतं असंही डॉ.हर्षवर्धन यावेळी म्हणाले.

****

कांद्याच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातली आहे. कांद्याचे वाढते भाव सौम्य करण्यासाठी आणि बाजारात माल उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं हा उपाय योजला असल्याचं ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव लीला नंदन यांनी म्हटलं आहे. या मर्यादेनुसार घाऊक व्यापारी २५ मेट्रीक टन तर किरकोळ व्यापारी केवळ दोन मेट्रीक टन कांद्याची साठवणूक करू शकतात. देशांतर्गत खरीपाचा कांदा उपलब्ध होईपर्यंत सरकारनं कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर गेल्या १४ सप्टेंबरपासून बंदी घातलेली असल्याचंही नंदन यांनी यावेळी सांगितलं. यामुळे कांद्याच्या दरात सौम्य घट झालेली असली तरी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश अणि मध्यप्रदेश या कांदा उत्पादक राज्यांच्या काही जिल्ह्यांमधे झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली असल्याचंही त्या म्हणाल्या. तसंच हवामानामधे होत असलेल्या बदलामुळेही कांद्याच्या दरात वाढ झाली असल्याचं नंदन यावेळी सांगितलं. कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी एक लाख मेट्रीक टन कांद्याचा साठा गेल्या सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळूहळू बाजारात आणण्यात येत असल्याचंही त्या म्हणाल्या.

****

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे शिवणी इथं उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा चलित गोदामाचं उद्घाटन तथा लोकार्पण केंद्रीय मंत्री संजय धोत्रे आणि राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं. या प्रकल्पामुळे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण तसंच प्रमाणित बियाण्यांची साठवणूक करता येणार आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी यावेळी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या सहा महिन्यात वक्फ मंडळाचे सर्व दस्तावेज डिजिटल पद्धतीने जतन करण्यात येणार असून महाराष्ट्र वक्फ मंडळाचे कार्यालय मुंबईला हलवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकार जनतेला कोविडची लस मोफत देणार असल्याचं ते म्हणाले. नमस्ते ट्रप मुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केंद्र सरकावर केला.

****

No comments: