Tuesday, 27 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.10.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 October 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना विषाणू संसर्ग चाचण्यांच्या शुल्कात पुन्हा एकदा कपात.

·      राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या राज्यातल्या रस्त्यांची कामं करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १५ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्याचा प्रस्ताव.

·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, हिंगोलीत आमदार संतोष बांगर आणि नांदेडमध्ये गुरुद्वाराच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल. 

·      राज्यात आणखी तीन हजार ६४५ कोविड बाधितांची नोंद, ८४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात २१ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ३८१ रुग्णांची नोंद.

आणि

·      मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू; मराठवाड्यासह विदर्भ तसंच उत्तर-मध्य महाराष्ट्रातून पाऊस परतला.

****

राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना विषाणू संसर्ग चाचण्यांच्या शुल्कात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. नव्यानं निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, एक हजार चारशे आणि एक हजार आठशे असा तीन टप्प्यातला दर निश्चित करण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले –

आपण पूर्वीपासून टेस्टिंगला भर देण्यासाठी केंद्र शासनानेच ठरवलेले जे रेट्‌स आहेत, ते नेहमी खाली आणत–आणत चार हजार पाचशे वरून तो बावीसशे वर आणला बावीसशे वरून बाराशे वर आणला आणि आज आम्ही नऊशे ऐंशी वर टेस्टिंगचा रेट त्या ठिकाणी आणलेला आहे. जी टेस्टिंग लॅब फक्त प्रोसेसिंग करून रिपोर्ट देते त्यांना नऊशे ऐंशी रुपये, जे घरी जाऊन कलेक्शन करतात आणि तुम्हाला पूर्ण जाण्यायेण्याचा खर्च, पीपीई किटचा खर्च सगळाच खर्च ते करतात तिथे अठराशे रुपये आणि जे हॉस्पिटल्स इतर काही खर्च करतात आणि हे लोक जाऊन लॅबवाले फक्त जाऊन घेऊन येतात त्यांना आपण चौदाशे रुपये.

कोविड संसर्ग तपासणीचे हे सुधारित दर खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असून, यापेक्षा अधिक दर आकारणं अवैध ठरेल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यात प्रति दहा लाख लोकसंख्येमागे ७० हजार चाचण्या केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या राज्यातल्या रस्त्यांची कामं करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १५ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, दोन आठवड्यात तो मंत्रिमंडळासमोर येईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यातल्या ११९ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून एक हजार ९६ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याचं चव्हाण म्हणाले. वाटूर-जिंतूर, परळी बायपास, दौलताबाद-शिऊर, परळी-गंगाखेड, परळी-धर्मापुरी या रस्त्यांसह मांजरा नदीवरच्या पूल बांधकामाचा यात समावेश आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

दरम्यान चव्हाण यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळशी-अंजनडोह आणि हर्सुल-जटवाडा इथल्या अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त रस्त्यांची पाहणी केली, पळशी इथल्या शेतकऱ्याच्या शेतातल्या कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणीही चव्हाण त्यांनी केली.

****

कोविड-19 प्रतिबंधासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे.

****

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी बीड जिल्ह्यात सावरगाव इथल्या भगवान भक्तीगडावर घेतलेल्या दसरा मेळाव्यात गर्दी जमवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांनी मेळाव्याला ऑनलाईन संबोधित केलं, मात्र, त्यावेळी मेळाव्याला शेकडो लोकांची गर्दी झाल्याचा आरोप आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना कथित गर्दी जमवल्याच्या आरोपावरून मुंडे यांच्यासह खासदार डॉक्टर भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह ५० ते ६० जणांविरुद्ध दसरा मिरवणूक काढल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा नागनाथ येथील तलाठी विजय सोमठकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नसतानाही, औंढा नागनाथ इथं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक काढली होती.  धार्मिक कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी भेटीगाठी देत असतात, या गुन्ह्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलं.

****

नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्याच्या हल्लाबोल मिरवणुकीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुद्वाराच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान गर्दी करणं, कोविड प्रतिबंधाचे नियम न पाळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यातले ११ कोविड केअर सेंटर कालपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे अनेक कोविड सेंटरमध्ये सध्या रुग्ण नाहीत. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. तसंच या केंद्रांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपुष्टात आल्या आहेत.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी तीन हजार ६४५ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ४८ हजार ६६५ झाली आहे. राज्यभरात काल ८४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल नऊ हजार ९०५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १४ लाख ७० हजार ६६० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ३४ हजार १३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३८१ रुग्णांची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यात नऊ रुग्णांचा मृत्यू, तर नवे ३९ रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू, तर नवे ८४ रुग्ण आढळले. जालना, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी दोन बाधितांचा मृत्यू झाला, जालना जिल्ह्यात ७७, नांदेड जिल्ह्यात ४३, उस्मानाबाद जिल्ह्यात ३०, तर हिंगोली जिल्ह्यात नव्या पाच रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर ८० नवे रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात २३ रुग्णांची नोंद झाली. 

****

मुंबई काल आणखी ८०४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३७ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ३७२ नवे रुग्ण, तर तीन मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात आणखी ५६५ रुग्ण आढळले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. अहमदनगर १६४, रायगड १०९, पालघर ८९, जळगाव ६७, गडचिरोली ५८, गोंदिया ३८, धुळे २३, वाशिम २२, भंडारा २०, रत्नागिरी आठ, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या तीन रुग्णांची नोंद झाली. 

****

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ विषाणू परीक्षण संशोधन आणि निदान - आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचं ई-उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते काल झालं. या प्रयोगशाळेत दर दिवशी २०० ते ३०० रुग्णांच्या आरटी-पीसीआर चाचण्या होणार आहेत. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात खासदार राजीव सातव, आमदार संतोष बांगर, आमदार बिप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पवार यांना कोविडचा संसर्ग झाला आहे. आपली प्रकृती ठीक असल्याचं त्यांनी ट्वीटरवरून सांगितलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमधून वगळलेली आठ महसूल मंडळं अतिवृष्टीग्रस्त मंडळामध्ये समाविष्ट करावीत, अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी जिल्हाधिऱ्यांकडे केली आहे. त्यांनी या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. एकूण मंडळांपैकी जिंतूर तालुक्यातील पाच आणि सेलू तालुक्यातील तीन अशी एकूण आठ मंडळं अतिवृष्टी वगळण्यात आली आहेत. या आठही मंडळात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून या मंडळांचा अतिवृष्टीग्रस्तांमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

****

मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुंबईतल्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी काल ही माहिती दिली. विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागातून पाऊस परतला असून, परिस्थिती अनुकूल असल्याने, पुढच्या २४ तासांत मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास पूर्ण होईल, असं होसळीकर यांनी सांगितलं.

दरम्यान, उस्मानाबाद इथं काल दुपारनंतर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

“स्ट्रीट्स फॉर पीपल” या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत औरंगाबाद शहर सहभागी होत आहे. या अंतर्गत शहरातले तीन मुख्य रस्ते कॅनॉट सर्कल, क्रांती चौक ते उस्मानपुरा सर्कल आणि पैठणगेट ते गुलमंडी या रस्त्यांची निवड पथदर्शी प्रकल्प म्हणून करण्यात आली आहे. केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गत दि इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली आहे. शहरातले सिटीझन्स ग्रुप, वास्तु विशारद, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांना या प्रकल्पात सहकार्य करण्याचं आवाहन औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी केलं आहे.

****

राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते काल मांजरा धरण प्रकल्पातल्या पाणीसाठ्याचं जलपूजन करण्यात आलं. धरणातल्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केलं.

****

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी राज्य पात्रता -सेट परीक्षा २७ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ही माहिती देण्यात आली. परीक्षेची अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

****

अनंत भालेराव स्मृती पुरस्कार काल हिमरु नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना प्रदान करण्यात आला. औरंगाबाद इथं झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उद्योजक मधुकर अण्णा मुळे यांनी हा पुरस्कार प्रदान केला. ५० हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

नांदेड जिल्ह्यातले उद्योजक डी. बी. पाटील होटाळकर यांचं रविवारी मध्यरात्री पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं, ते ६६ वर्षांचे होते. पाटील हे राज्य कापूस खरेदी महामंडळाचे माजी संचालक होते. तसंच दत्त्त शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. त्यांनी नायगाव भागात कापूस जिनींग उद्योग यशस्वीपणे चालवला. पाटील यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून, सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याबाबत योग्य कारवाई करावी, अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचेही पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित विमा कंपनीला द्यावे, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ३४ वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा कारखान्याचे अध्यक्ष दिलीप देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते झाला. काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणाऱ्या ऊस जातीची लागवड करावी असं आवाहन दिलीप देशमुख यांनी यावेळी केलं.

****

लातूरच्या आस्था कौशल्य विकास केंद्रामार्फत रोजगार भारत आत्मनिर्भर भारत या अभियानाची सुरुवात काल माजी खासदार डॉ.सुनिल गायकवाड आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते झाली. शहरातल्या नवउद्योजकांना आणि नवयुवकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिका आणि आस्था कौशल्य विकास केंद्र संयुक्तरित्या काम करणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे.

****

जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात वाटूर इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा टाकणाऱ्या सहा संशयितांना पोलिसांनी काल अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत चोरट्यांनी पळवलेल्या तिजोरीसह रोख रक्कम, बँकेतले साहित्य, गुन्ह्यासाठी वापरलेली हत्यारं आणि तीन वाहने, असा एकूण १४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

****

No comments: