Wednesday, 28 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.10.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 October 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      मराठा आरक्षणावरची सुनावणी लांबणीवर; राज्य सरकारला घटनापीठाकडे जाण्यासाठी चार आठवड्यांची मुदत.

·      ऊसतोड कामगारांना सरासरी १४ टक्के दरवाढ देण्याचा निर्णय, कामगार संघटनांचा संप मागे.

·      साठवणुकीच्या मर्यादेमुळे नाशिक जिल्ह्यात निर्माण झालेला कांदा लिलावाबाबतचा तिढा कायम.

·      प्रतिबंधित क्षेत्रात ३० नोव्हेंबरपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

·      राज्यात आणखी पाच हजार ३३६ कोविड बाधितांची नोंद, ११५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात १५ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ४३० रुग्णांची नोंद.

आणि

·      भील्ल, पारधी, लमाण, वडार, वैदू या आदिवासीं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात डोणगाव इथं ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरु.

****

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि कपिल सिब्बल यांनी, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी व्हावी, अशी भूमिका मांडली. ही मागणी मान्य करत न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठानं ही सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली. आता यापुढची सुनावणी घटनापीठासमोर होणार आहे. याप्रकरणी सुनावणी काल सकाळी ११ वाजता सुरु झाली त्यावेळी राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी तांत्रिक अडचणींमुळे सुनावणीसाठी जोडू शकले नाही, त्यामुळे काही काळ सुनावणी थांबवण्यात येऊन दुपारी एक वाजता घेण्यात आली.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं घटनापीठाचे गठन करून या आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील तात्पुरती स्थगिती रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणी करावी, अशी विनंती राज्य सरकारनं यापूर्वीच केलेली आहे. कालच्या सुनावणीनंतर हीच विनंती पुन्हा एकदा आणि ताबडतोब केली जाणार असल्याचे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नसून, या प्रकरणापासून पळ काढत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. शैक्षणिक तसंच नोकऱ्यांच्या क्षेत्रात गोंधळ तसंच अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाल्यानं, राज्य सरकारचा निषेध करत असल्याचं पाटील म्हणाले. सरकारी वकिलांनी न्यायालयात वेळेवर हजर न राहणं, दोन वकिलांमध्ये दुमत असणं, पुरेशी तयारी न करणं, याबाबींमुळे या प्रकरणाबाबत चिंता वाटत असल्याचं ते म्हणाले. अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा घेणं, ही फक्त खानापूर्ती केली असल्याची टीकाही पाटील यांनी केली.

****

सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील मराठा आरक्षणाच्या सुनावणीला उपस्थित राहत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमावरून त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ही पुराव्यानिशी भक्कम पणे मांडणं गरजेचं असल्याचं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं.

****

दरम्यान, सरकारी वकील सुनावणीवेळी अनुपस्थित राहील्याच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल परभणी इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं केली. मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार हे फारसे गंभीर नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. 

****

ऊसतोड कामगारांना सरासरी १४ टक्के दरवाढ देण्याच्या प्रस्तावावर साखर कारखानदार आणि ऊस तोडणी कामगारांच्या संघटनेत एकमत झाल्यानं, ऊस तोडणी कामगारांनी कोयता बंद आंदोलन मागे घेत असल्याचं काल जाहीर केलं. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात वसंतदादा साखर संस्थेत काल बैठक झाली. या बैठकीत कामगारांना १४ टक्के वाढीचा निर्णय झाला असून, तीन वर्षांसाठी हा करार झाल्याचं, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितलं.

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबवण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी या बैठकीनंतर दिली.

ऊसतोड कामगारांना सरासरी १४ टक्के वाढ मिळाली असली तरी आणखी दराची अपेक्षा होती, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मागील कराराच्या फरकाचे पैसे मिळण्यासाठी साखर संघाला निवेदन देण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सरकारनं व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी मर्यादा घालून दिलेली आहे, त्यामुळे त्यापेक्षा अधिकचा कांदा घेऊन नियमाचे उल्लंघन करता येणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावाबाबत तिढा कायम आहे. काल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समितीचे संचालक आणि कांदा व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली, त्यात सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. कांदा साठवणुकीच्या मर्यादेच्या नियमामुळे बाजारपेठेत लिलाव होत नसल्यामुळे केंद्र शासनानं यासंदर्भात फेरविचार करावा अशी मागणी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केली आहे. केंद्र सरकारनं काळाबाजार रोखण्यासाठी निर्यातबंदी बरोबरच आता साठवणीवरही मर्यादा घातली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत.

****

निर्यात बंदी तसंच कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडला असतानाच आयकर विभाग धाडी टाकून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करत असल्याचा आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. कांदा प्रश्नी केंद्राचा निर्णय राज्यातल्या तसंच इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना अडचणीचा ठरत असून केंद्र सरकार नेमकं कुणासाठी काम करतंय असा सवाल त्यांनी केला.

****

टाळेबंदी उठवण्याच्या पुढच्या टप्प्यात ३० सप्टेंबर रोजी जारी केलेले दिशानिर्देश केंद्र सरकारनं ३० नोव्हेंबर पर्यंत कायम ठेवले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदी कायम राहणार असून, त्याबाहेरचे सर्व व्यवहार सुरु राहणार असल्याचं गृह मंत्रालयानं काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन लातूरचे प्रसिद्ध प्लॉस्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी केलं आहे.

****

देशभरात कालपासून राष्ट्रीय दक्षता सप्ताह सुरु झाला. ‘दक्ष भारत, समृद्ध भारत’ ही यावर्षीची संकल्पना आहे. नवी दिल्लीतल्या केंद्रीय दक्षता आयुक्तालयात, केंद्रीय दक्षता आयुक्त संजय कोठारी यांनी यानिमित्त दक्षतेची शपथ दिली. आपण प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे, सचोटीनं आणि विश्वासार्हतेनं करावं असं कोठारी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत वल्लभभाई पटेल यांचा ३१ ऑक्टोबर हा जयंती दिवस येत असलेला आठवडा, दरवर्षी देशभर ‘राष्ट्रीय दक्षता सप्ताह’ म्हणून पाळला जातो.

राज्यातला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करत आहे. राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना अथवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा असं आवाहन मुंबईचे अपर पोलीस आयुक्त लख्मी गौतम यांनी केलं आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत हा सप्ताह पाळला जाणार आहे.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी पाच हजार ३३६ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ५४ हजार २८ झाली आहे. राज्यभरात काल ११५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सात हजार ८३६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ३१ हजार ५४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४३० रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू, तर नवे ९९ रुग्ण, लातूर जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे ७१ रुग्ण आढळले. बीड, नांदेड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात ९३, नांदेड जिल्ह्यात ६६ आणि जालना जिल्ह्यात आणखी ३४ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या ४५ रुग्णांची भर पडली. परभणी जिल्ह्यात १७, तर हिंगोली जिल्ह्यात पाच नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

मुंबईत काल आणखी ८०१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर २३ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ५७७ नवे रुग्ण, तर २२ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात १७१ नवे रुग्ण आढळले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात ६९३, अहमदनगर २२१, रायगड १२६, गोंदिया १००, बुलडाणा ९८, गडचिरोली ८७, सिंधुदुर्ग २६, रत्नागिरी २२, तर वाशिम जिल्ह्यात नव्या २० रुग्णांची नोंद झाली. 

****

केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी काल औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या डोणगाव इथं ‘सेंटर ऑफ एक्सलन्स – उत्कृष्टता केंद्रा’चं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं. या अंतर्गत भील्ल, पारधी, लमाण, वडार, वैदू आदी जमाती असलेली दहा गावं दत्तक घेऊन, पुढील ३६ महिन्यांत दहा हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आदिवासी भागात रासायनिक शेतीचा अविश्वसनीय प्रवेश रोखणं, पारंपारिक पर्यावरणीय ज्ञानावर आधारित शाश्वत शेती तंत्राचा उपयोग करणं, गौ-आधारीत शेतीसाठी प्रभाव कौशल्य वाढवणं, स्वदेशी वारसा बियाणे आणि डायनामिक बियाणे बँकांची स्थापना आणि त्यांचे जतन करणं, आदी कामं या केंद्रामार्फत केली जाणार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग क्षेत्र आणि शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या विजेच्या प्रश्नांवर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत काल मुंबईत बैठक झाली. उद्योग आणि शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा होण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या सहसंचालकांनी संयुक्तपणे उपाययोजना करून कार्य अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या.

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावा या मागणीसाठी काल काळ्या फिती लावून काम केलं. या मागणीचं निवेदन कुलगुरु अशोक ढवण यांना देण्यात आलं. मागणी मान्य न झाल्यास येत्या दोन ते पाच नोव्हेंबर दरम्यान लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 

****

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या वालूर महसूल मंडळासह अन्य मंडळातल्या शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीच्या नुकसानापोटी सरसकट मदत मिळावी, या मागणीसाठी काल शेतकऱ्यांनी सेलू इथं निदर्शनं केली. तालुक्यातल्या सर्वच मंडळात अतिवृष्टी झाल्यानं खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शासनानं सरसकट मदत करावी अशा मागणीचं निवेदन आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना दिलं.

****

कोविड-19 प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ किशोर सुरवसे यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातलं मांजरा धरण पूर्ण भरलं आहे. धरणात सध्या एकूण पाणी साठा २२४ दशलक्ष घनमीटर एवढा असून, त्यापैकी १७६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठा आहे. पाऊस आणि पाण्याची आवक कायम राहिली तर आज किंवा उद्या धरणाचे अथवा कालव्याचे दरवाजे उघडण्यात येतील, अशी माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या उमरीचे साहित्यिक, कथा लेखक प्राचार्य ग. पि. मनूरकर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. मनूरकर यांनी साठ वर्ष शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. मनूरकर यांनी कथा, कविता, वैचारिक, शैक्षणिक असं विपूल लेखन केलं आहे

****

अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी करत शेतकरी संघर्ष समितीनं काल परभणी इथं ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान, नवा मोंढा पोलिसांनी आंदोनकर्त्यांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या परभणी शाखेनं केली आहे.

****

No comments: