Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४
ऑक्टोबर
२०२० सकाळी ७.१० मि.
****
मी त्याला धार्मिक म्हणतो जो इतरांच्या वेदना समजतो.
****
**
अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या
नसून आत्महत्या असल्याचा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा
अहवाल
** कोरोना
विषाणू संसर्ग काळातल्या कर्जफेड सवलतीत दोन
कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज व्याजावरच्या चक्रवाढ व्याजाला
सूट मिळणार
** राज्यात
उद्यापासून सुरू होणाऱ्या हॉटेलं आणि रेस्टॉरंटसाठी राज्य सरकारची नियमावली जारी
**
राज्यात आणखी १४ हजार ३४८ कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण, २७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
** मराठवाड्यात २८ बाधितांचा
मृत्यू तर ९३६ नवे
रुग्ण
** डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर
अभ्यासक्रमांच्या ९ ऑक्टोबर पासून परिक्षा
आणि
** ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक पुष्पा भावे यांचं निधन
****
सुशांत सिंग राजपूतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सनं
दिला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयला सुपूर्द
केलेल्या कायदेशीर वैद्यकीय अहवालात हे स्पष्ट करण्यात आलं आहे. सुशांतच्या अंगावर
कसल्याही जखमा नसल्याचं या अहवालात नमूद केलं आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा केंद्रीय
अन्वेषण विभागानं चौकशीचा अहवाल लवकर जाहीर करावा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
राज्य सरकार या चौकशी अहवालाची वाट पहात असल्याचं त्यांनी काल नागपूरमधे
पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणी केंद्र सरकारनं राज्याला बदनाम करण्याचा कट
रचला असून हा कट रचणाऱ्यांना अटक करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथक नियुक्त
करावं, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अहवालाच्या पार्श्र्वभूमीवर
काँग्रेस पक्षानं ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
****
सीमा भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर सरकारचा भर असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते
काल हिमाचल प्रदेशात रोहतांग इथं अटल बोगद्याचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
जगातल्या सर्वात लांब अशा या महामार्ग बोगद्यामुळे मनाली आणि लेहमधलं अंतर ४६
किलोमीटरनं कमी झालं असून नऊ किलोमीटर दोन
मीटर लांबीच्या या अटल बोगद्यामुळे पाच ते सहा तासांचा प्रवास वेळ वाचणार आहे. या भागात जास्त बर्फवृष्टी होत असल्यानं
वर्षातले सहा महिने बंद असणारा मनाली लाहौल-स्पिटी व्हॅली हा मार्ग आता वर्षभर
खुला राहायला मदत होणार आहे. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या
स्मरणार्थ रोहतांग बोगद्याचं नामकरण अटल बोगदा करण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या सहा महिन्यांसाठीच्या कर्जफेड सवलतीच्या कालावधीत
दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाला चक्रवाढ व्याजातून सूट देण्याचं केंद्र सरकारनं
सर्वोच्च न्यायालयात मान्य केलं आहे. या अनुदानासाठी संसदेची अधिकृत परवानगी
घेण्यात येईल, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे. वैयक्तिक
कर्जदार तसंच मध्यम आणि लघु उद्योजकांना यामुळे दिलासा
मिळेल. दोन कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेतलेल्यांना याचा लाभ मिळणार नाही, असंही केंद्र सरकारनं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या
शपथपत्रात नमूद केलं आहे.
****
मिशन बिगीन अगेन अंतर्गत उद्यापासून राज्यातली हॉटेलं आणि रेस्टॉरंट ५० टक्के
क्षमतेनं सुरु होणार आहेत. त्यासाठीची नियमावली राज्य सरकारनं काल जारी केली.
यानुसार ग्राहकांची तापमान आणि लक्षणं विषयक तपासणी केल्यानंतरच, हॉटेलमधे प्रवेश देता येणार आहे. याशिवाय
ग्राहकांना मास्क अनिवार्य असून, परस्परांपासून सुरक्षित
अंतर राखणं तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंटमधे ग्राहकांसाठी सॅनीटायझर उपलब्ध करून देणं
बंधनकारक करण्यात आलं आहे. संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा, रोख रक्कम
हाताळताना पुरेशी काळजी घ्यावी असंही या नियमावलीत म्हटलं आहे. प्रसाधनगृह तसंच
ग्राहकांद्वारे सातत्यानं वापरल्या जाणाऱ्या जागा, फर्नीचर
सतत स्वच्छ करावं. कॅश काऊंटरसह ग्राहकांशी सातत्यानं संपर्क येऊ शकतो अशा ठिकाणी
काचेच्या भिंतीसारख्या रोधकांचा वापर करावा असं या नियमावलीत म्हटलं आहे.
ग्राहकांना केवळ शिजवलेले खाद्य पदार्थ द्यावेत, कच्चे
पदार्थ देणं टाळावं असं या नियमावलीत सूचवलं आहे. हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधले सर्व
सीसीटीव्ही कार्यरत असतील याची खबरदारी घ्यावी, हॉटेलं आणि
रेस्टॉरंटमधे प्रवेश करण्यासाठी तसंच बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे ठेवावेत
असंही या नियमावलीत म्हटलं आहे.
****
राज्य शासनानं मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान
झालेल्या शेतकऱ्यांना फळबागांसाठी एकरी ५० हजार रुपये तर अन्य पिकांसाठी २५ हजार
रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते.
मराठवाड्यात प्रथमच सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्यानं खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला
आहे. त्यामुळे प्रशासनानं नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावे, नुकसान भरपाई रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही
दरेकर यांनी यावेळी दिला. जालना जिल्हा दौऱ्यावर असलेले दरेकर यांनी काल बदनापूर
तालुक्यातल्या रोषणगाव आणि धोपटेश्वर इथल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून
शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दरेकर यांनी काल, हिंगोली जिल्ह्याचाही दौरा केला. औंढा
नागनाथ तालुक्यात येहळेगाव सोळंके इथं नुकसान झालेल्या
पिकांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य
सरकारवर टीका केली.
****
स्वातंत्र सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती काल विधान भवनात साजरी
करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी विधानभवन
परिसरात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं.
****
काँग्रेस
नेते खासदार राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काल हाथरसमध्ये जाऊन मयत सामूहिक
बलात्कार पिडीतेच्या आई-वडिल आणि कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना
प्रियंका गांधी यांनी पिडितेला न्याय मिळेपर्यंत लढा दिला जाईल, असं सांगितलं. तर अन्यायग्रस्त
कुटुंबाचा आवाज कोणतीही शक्ती दाबू शकत नाही, असं राहूल गांधी म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारनं या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे
अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
****
आणि
आता ऐकू या ज्येष्ठ पत्रकार गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला गांधी
विचार
सत्य एकच आहे त्याच्याकडे जाणारे मार्ग अनेक आहेत. हे गांधीजींचं अतिशय सुप्रसिद्ध
असं वचन आहे. गांधीजी असं नेहमी म्हणायचे की माझा परमेश्वर म्हणजे सत्य “ Truth is
My God” मी सत्यरुपी परमेश्वराचाच पुजारी आहे. तो एकच सत्य आहे आणि बाकी सारे मिथ्य
आहे. गांधीजी असंही म्हणायचे त्याला जोडून सत्य हा परमेश्वर आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा
मार्ग अहिंसा हाच होय. गांधीजींनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या वाटचालीत जे काही कार्य
केलं.मग भारताची स्वातंत्र्य चळवळ असेल, दक्षिण अफ्रिकेमधील सत्याग्रहाचा लढा असेल.
या सर्व ठिकाणी त्यांनी सत्याग्रह नावाच्या त्यांच्या एका अहिंसापूर्ण साधनाचा वापर
केला. आणि म्हणून गांधीजी असं म्हणायचे की सत्य हा परमेश्वर आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा
मार्ग अहिंसा हाच होय.
***
केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांमुळे
शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची अडवणूक संपली असून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचं
स्वातंत्र्य मिळालं असल्याचं रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत
शेतकरी प्रतिनिधी आणि भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते
बोलत होते. काँग्रेससह विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू
असून मोदी सरकारनं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नव्या कायद्यांनी पर्याय उपलब्ध करून
दिला असल्याचंही ते म्हणाले. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाचीच या कायद्यांमुळे अंमलबजावणी
होणार असल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं.
****
केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीनं आवश्यक सर्व उपाय योजत
असल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी
दिली आहे. या संदर्भातल्या स्वामीनाथन आयोगाच्या जास्तीत जास्त शिफारसी सरकारनं
स्विकारल्या असल्याचंही त्यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा एक भाग म्हणून सरकारनं कृषी सुधारणा
विधेयकांचं कायद्यात रुपांतर केलं असल्याचं ते यावेळी म्हणाले. शेती क्षेत्राला नव
तंत्रज्ञानाची गरज म्हणून सरकारनं मृदा कार्ड, किसान
क्रेडीट कार्ड, पीक विमा पद्धतीमध्ये बदल, सूक्ष्म सिंचन आणि ई-मंडीची सुरुवात केली असून शेती क्षेत्राला बळ
देण्याचं काम सरकार गेल्या सहा वर्षांपासून करत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री
दानवे यावेळी म्हणाले.
****
राज्यात
काल आणखी १४ हजार ३४८ कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळले. यामुळे राज्यातली एकूण
रुग्ण संख्या १४ लाख ३० हजार ८६१ एवढी झाली आहे. दिवसभरात २७८ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यातली आतापर्यंतची मृतांची संख्या ३७ हजार ७५८ एवढी झाली आहे. आतापर्यंत
या आजारातून एकूण ११ लाख ३४ हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या दोन लाख ५८ हजार
१०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल २८ बाधितांचा
मृत्यू झाला तर ९३६ नवे
बाधित रुग्ण आढळले.
नांदेड जिल्ह्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा रूग्णांचा मृत्यू
झाला तर १४० नवीन रूग्णांची भर पडली.
लातूर जिल्ह्यात काल ६ रूग्णांचा मृत्यू झाला तर १७३ नवे बाधीत रूग्ण आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू
झाला तर १८३ नवे रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात काल चार रुग्णांचा मृत्यू झाला तर
१०३ नवीन रुग्णांची भर पडली. जालना आणि
उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन बाधित
रुग्णांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात ७५ तर उस्मानाबाद जिल्ह्यात १०७ तर हिंगोली जिल्ह्यात आठ नवीन रुग्ण आढळले.
बीड जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला
तर १४७ नवे रुग्ण आढळले.
****
मुंबई शहरात दोन हजार ४०२ नवे रुग्ण आढळले तर ४६ रुग्णांचा मृत्यू
झाला. पुणे शहरात एक हजार ७७ तर पिंपरी चिंचवडमध्ये ५९८ तर नाशिक शहरात ५४५ नवे रुग्ण
आढळले. सांगली जिल्ह्यात ३९३ नवीन रुग्ण आढळले तर १९ जणांचा मृत्यू
झाला. सातारा ४५०, रायगड ३६४, भंडारा १३६, अमरावती ९६, गडचिरोली
७४, गोंदिया ९६, सिंधुदुर्ग ८३,
धुळे ३८, भंडारा १३६, अहमदनगर १४६, सांगली १२१, अकोला १०८, आणि नागपूरमध्ये ६९८ नवे रुग्ण आढळले.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचं फेरवेळापत्रक निश्चित करण्यात आलं असून ९ ऑक्टोबर पासून परिक्षा सुरु होणार आहेत, अशी माहिती परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील यांनी काल दिली. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या
अध्यक्षतेखाली परिक्षा मंडळाची काल बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. नऊ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या या परिक्षा २९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत, अशी
माहिती पाटील यांनी दिली.
****
बीड जिल्ह्यातल्या केतुरा गावातील विवेक रहाडे या १८ वर्षीय विद्यार्थ्यानं
आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी बनावट
असल्याचं पोलीस तपासात निष्पण्ण झालं आहे. ३० सप्टेंबर रोजी विवेकनं आत्महत्या
केली होती. त्यावेळी हाती लागलेल्या चिठ्ठीमध्ये
मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळं आपल्याला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश
मिळणे शक्य नसल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद होतं. मात्र सदर विद्यार्थ्याचं नैसर्गिक हस्ताक्षर आणि आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीमधलं हस्ताक्षर
जुळत नसल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ही बनावट चिठ्ठी खोडसाळपणे
तयार करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं बीड
पोलिसांनी सांगितलं.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या आमदार निधीतून
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीतल्या नवजात शिशु विभागातील कोरोना विषाणूग्रस्त शिशुंसाठी दहा लाख रुपयांची
यंत्रसामुग्री भेट देण्यात आली. आमदार चव्हाण तसंच महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.
कानन येळीकर यांच्या उपस्थितीमधे ही यंत्रसामुग्री काल या
विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.
****
ऊसतोड कामगार प्रश्नांसह इतर सर्व आवश्यक गोष्टी कारखान्यास करण्यास भाग
पाडल्याशिवाय शांत बसणार नाही असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. स्वर्गीय गोपीनाथराव
मुंडे प्रतिष्ठानच्यावतीनं ऊसतोड कामगार आणि मुकादम यांच्या चर्चासत्राचं काल
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर आणि गंगाखेड इथं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. सहकार्याची अपेक्षा ठेवून
तुमच्यासोबत चर्चा करण्यास आलो असल्याचे मतही धस यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक पुष्पा भावे यांच्या पार्थिवावर काल मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभुमीतल्या
विद्युत दाहिनीत कोणत्याही धार्मिक विधींशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राध्यापक पुष्पा भावे यांचं परवा रात्री मुंबईत निधन झालं. त्या एक्क्याऐंशी
वर्षांच्या होत्या. विद्यार्थीदशेपासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी
चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा अनेक सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.
मुंबईतल्या रूईया महाविद्यालयात त्यांनी मराठी विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम
पाहिलं होतं.
****
जालना-अंबड मार्गावरील गोलापांगरी इथं शिवबा संघटनेच्यावतीनं काल मराठा आरक्षणाबाबत सरकानं स्पष्ट भूमिका मांडावी, तसंच
आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत कुठलीही नोकर भरती करू नये आदी
मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील
यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक दीडतास
ठप्प झाली होती.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जवळपास अडीच लाख कुटुंबातील ११ लाख २९ हजार
६७७ नागरिकांच ३० सप्टेंबर पर्यंत आरोग्य सर्वेक्षण करण्यात आलं आहे. जिल्ह्यात
१०० आरोग्य पथक कार्यरत आहेत. ही मोहीम सुरू झाल्यापासून
उस्मानाबाद जिल्हा या अभियानात राज्यात दुसरा क्रमांकवर राहिलेला आहे.
****
हाथरस इथं घडलेली घटना ही मानवजातीला काळीमा फासणारी असून पिडीतेला न्याय
मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास
दानवे यांनी म्हटलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथं
युवतीसेनेच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी दानवे बोलत होते. या आंदोलनात
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले
यांच्यासह शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या.
//************//
No comments:
Post a Comment