Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५
ऑक्टोबर
२०२० सकाळी ७.१० मि.
****
बातमीपत्राच्या सुरूवातीला या गांधी वचन –
अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे. ही मनुष्यानं तयार केलेल्या अतिशय
संहारक शस्त्रापेक्षा अधिक शक्तीशाली आहे.
****
·
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीचे जुलैपर्यंत ५० कोटी डोस तयार होणार; पहिल्या
टप्यात २५ कोटी लोकांचं लसीकरण करणार - केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन.
·
कृषी सुधारणा कायदे देशातल्या कृषी क्षेत्राचं भविष्य पालटतील केंद्रीय मंत्री
प्रकाश जावडेकर यांचं मत तर केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास शेतकरी विरोधी सर्व
कायदे रद्द करण्याची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची घोषणा.
·
मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गातूनच आरक्षण देण्याचा
न्यायिक परिषदेत ठराव.
·
राज्यात आणखी १३ हजार ७०२ कोविडबाधित रुग्ण, ३२६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·
मराठवाड्यात ३० रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ९७० रुग्णांची नोंद.
आणि
·
आजपासून हॅाटेल्स, रेस्टॉरंट, उपाहारगृह तसंच बिअर बार सुरु होणार.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लस जुलै २०२१ पर्यंत उपलब्ध होईल, अशी आशा केंद्रीय
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. या लसीचे जवळपास ५० कोटी डोस तयार
होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साप्ताहिक संवाद कार्यक्रमात त्यांनी काल कोविड
उपचारासंदर्भातल्या भावी उपाय योजनांची माहिती दिली. यावेळी बोलतांना, पहिल्या टप्यात
२५ कोटी लोकांचं लसीकरण केलं जाणार असून, यात वृद्ध, बालकं, आजारी व्यक्ती आणि संक्रमीत
व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा प्राधान्यानं समावेश असेल, असं त्यांनी
सांगितलं. कोरोना विषाणूवरची लस उपलब्ध होण्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित करण्यासाठी,
केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समित्यांची स्थापना केली असल्याचं ते म्हणाले. देशात कोविड
लसीचं परीक्षण तिसऱ्या टप्य्यात असून, लस तयार झाल्यावर पुरवठा आणि साठा पर्याप्त
प्रमाणात उपलब्ध व्हावा, यासाठी सरकार लस तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा करत असल्याचं,
ते म्हणाले.
****
तीन कृषी सुधारणा कायदे देशातल्या कृषी क्षेत्राचं भविष्य पालटतील, असं प्रतिपादन,
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. पणजी इथं ‘शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’
या विषयावरील पत्रकार परिषदेला संबोधित करताना, ते काल बोलत होते. नवीन कायदे कृषी
क्षेत्राला ग्रासून टाकणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करतील, असा विश्वासही त्यांनी
व्यक्त केला. या कायद्यांमुळे बरीच वर्षे वंचित राहिलेला शेतकरी, आता आपल्या कृषी मालाचे
मूल्य ठरवण्यास सक्षम होईल, नवीन कृषी सुधारणा कायदे, ‘एक राष्ट्र, एक बाजारपेठ’, या
शासनाच्या दूरदृष्टीच्या धोरणांशी सुसंगत असल्याचंही ते म्हणाले.
****
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकार
प्रयत्न करत असल्याचं, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रावसाहेब दानवे
यांनी म्हटलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे
खासदार भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते. केंद्र
सरकारनं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली असून, कृषी सुधारणा
कायद्यामुळे शेतमालाला मिळणारे हमीभाव बंद होणार नाहीत, तसंच कृषी उत्पन्न बाजार समित्याही
ही बंद होणार नाहीत, असं दानवे यांनी स्पष्ट केलं.
लातूरमध्येही राज्यमंत्री दानवे यांची काल या विधेयकांबाबत माहिती देण्यासाठी
पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलतांना त्यांनी, शेतकऱ्यांचा माल खरेदी-विक्री करण्यासाठी
बाजार समितीत जाण्याची गरज नसल्याचं सांगत, देशात जवळपास दहा हजार कृषी उत्पादन कंपन्या
स्थापन होत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
सरकारने आपली यंत्रणा जनतेसाठी उभी केली आहे. १० हजार फार्मर प्रोड्युसर कंपन्या
स्थापन करण्याचं सरकारचं धोरण आहे. त्या कंपन्यांच्या infrastructure साठी सरकार निधीसुध्दा
देऊ लागलं. त्यांना व्याजात सवलत देवू लागलं. त्यांना गोडाऊन बांधण्यासाठी पैशाची तरतूद
करण्यात आली ह्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या पुढच्या काळामधे खरेदी करतील तर त्या हमी
भावानंच खरेदी करतील.
****
केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास शेतकरी विरोधी सर्व कायदे रद्द करण्याची
घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल केली. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेस
पक्षानं काल पंजाबमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढली होती.
बादनी कल्याण इथं सभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचं सरकार काही
कंपन्यांसाठी शेतकऱ्यांना नष्ट करण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
****
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सनं
दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, मुंबई
शहराला बदनाम करणाऱ्यांचं पितळ उघडं पडलं असल्याचं म्हटलं आहे. ‘सुशांत सिंह हत्या
कि आत्महत्या’ असं प्रश्नचिन्ह, महाराष्ट्र - मुंबई महानगरपालिका - मुंबई पोलीस यंत्रणा
यांच्याबाबत निर्माण केलं गेलं होतं. ज्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याच
षडयंत्र केलं होतं, त्यांचं पितळ उघडं पडलं असून त्यांना ही मोठी चपराक असल्याचं पेडणेकर
यांनी म्हटलं आहे.
****
विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी राज्यात ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर
सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल अमरावतीमध्ये
दिली. कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार
आहे, असं ते म्हणाले.
या शाळा सुरु करत असताना सरकारच्या वतीने एक चांगलं धोरण आखण्यात येणार असून,
या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोना विषाणूने बाधित न होता व्यवस्थित शिक्षण देण्याची
सरकारची भूमिका असेल, असंही ते म्हणाले.
****
उत्तर प्रदेशातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी
सत्याग्रह करणार असल्याचं राज्य प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब
थोरात यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयी हा सत्याग्रह केला जाणार
असून आपण स्वतः मुंबईत सत्याग्रहात सहभागी होणार आहोत असं थोरात म्हणाले.
****
आणि आता ऐकू या ज्येष्ठ पत्रकार, गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला
गांधी विचार –
गांधीजी म्हणत असत की जर तुम्हाला जगामधे काही बदल हवा असेल तर हा बदल करण्यासाठी
स्वतःपासून बदलायला सुरुवात केली पाहिजे. Be change which you see in the world. जगामधे
तुम्हाला जे परिवर्तन हवंय, जो बदल हवाय त्याची सुरवात घरापासून, तुमच्या स्वतःपासून
केली पाहिजे असं गांधी नेहमी सांगायचे. मला असं वाटतं की गांधीजींचा हा जो विचार आहे
हा विचार व्यापक अर्थाने प्रत्येक व्यक्तीला जो बदल करायचाय, प्रत्येक व्यक्तीला जो
एक स्वतःचा नवा एक अशा स्वरूपाचा चेहरा मोहरा समोर आणायचा आहे, त्या दृष्टीने फार महत्वाचं
वचन आहे. आणि गांधीजी नेहमीच असं मानत होते माणूस हा बदलू शकतो. कोणताही माणूस हा परिवर्तनशील
आहे ही गांधीजींची भूमिका होती. आणि गांधीजी त्यानुसार या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहत
होते असं मला वाटतं. आणि म्हणून जो बदल तुम्हाला जगात करायचाय त्या बदलाची सुरवात तुम्ही
स्वतःपासून करा असं गांधीजी सांगतात.
****
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आरक्षण न देता, सामाजिक आणि शैक्षणिक
मागासवर्गीय प्रवर्गातूनच आरक्षण देण्याचा द्यावं, असा ठराव मराठा समाजातर्फे काल कोल्हापूर
इथं झालेल्या न्यायिक परिषदेत मंजूर झाला. आरक्षणाला असलेली स्थगिती खटल्याच्या गुणवत्तेच्या
जोरावर निश्चितपणे उठेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा, काल देशाच्या ७२ शहरातल्या दोन हजार,
५६९ केंद्रांवर घेण्यात आली. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचं
काटेकोर पालन करत आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी परीक्षा केंद्रांवर करण्यात आली.
या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या गुणवंतांची मुख्य परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये घेतली
जाईल.
****
राज्यात काल आणखी १३ हजार ७०२ कोविडबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण
रुग्णसंख्या १४ लाख ४३ हजार ४०९ झाली आहे. काल दिवसभरात ३२६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३८ हजार ८४ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. तर काल १५ हजार ४८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत
११ लाख ११ हजार ५१९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ५५ हजार २८१
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ९७०
रुग्णांची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात ११ बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी १५३ रुग्ण आढळून आले. औरंगाबाद
आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी सहा जणांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात १९३ तर
नांदेड जिल्ह्यात नव्या १२२ रुग्णांची भर पडली. उस्मानाबाद जिल्ह्यात चार बाधितांचा
मृत्यू झाला, तर आणखी १८९ रुग्ण आढळले. परभणी, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी
एका रुग्णाचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात ६८, जालना जिल्ह्यात ४८, तर हिंगोली जिल्ह्यात
आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात आणखी १८८ रुग्ण आढळून आले.
****
मुंबईत काल आणखी दोन हजार १०९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
४८ जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला तर ९९३ नवे रुग्ण आढळले.
नाशिक जिल्ह्यात ८६६ नवे रुग्ण आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक
हजार ४३०, नागपूर ६१७, रायगड ३०८, सोलापूर ३००, सांगली २९९, सातारा २७७, बुलडाणा १३८,
भंडारा १२६, गोंदिया १२०, चंद्रपूर १०५, गडचिरोली १११, वाशिम ६८, रत्नागिरी ३८, तर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी २२ रुग्ण आढळले.
****
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. २४ सप्टेंबरला त्यांची कोविड चाचणी बाधित आली होती. रुग्णालयात १० दिवस उपचार
घेतल्यावर ते कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना काल सुटी देण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे
****
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या
औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या सहा ३३ केव्ही उपकेंद्रातून १८ सौर कृषी
वाहिन्यातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी दोन ऑक्टोबर
पासून करण्यात आली आहे. विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातल्या कृषी पंपांना
दिवसा आठ तास आणि रात्री दहा तास आठवड्यात चक्राकार पध्दतीनं वीज पुरवठा सध्या उपलब्ध
करून देण्यात येत आहे. मात्र रात्रीच्या वेळेस कृषी पंपाना देण्यात येणाऱ्या विद्युत
पुरवठ्यामुळे येणाऱ्या अडचणी, तसंच शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना विचारात
घेऊन सरकारनं दिवसा वीज पुरवठा देण्याचं नियोजन केलं आहे.
****
पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं रेल रोको आंदोलन सुरु असल्यामुळे नांदेड - अमृतसर सचखंड
एक्स्प्रेस अंशत: रद्द करण्यात आली आहे. ही गाडी नांदेड ते न्यू दिल्ली आणि न्यू दिल्ली
तर नांदेड अशी धावत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती
दिली.
****
अतिवृष्टीनं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानाचे सरसकट पंचनामे करून सर्वसामान्य
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण
दरेकर यांनी यांनी केली आहे. दरेकर यांनी काल परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या
नावकी तसंचं मानवत तालुक्यातल्या देवलगाव अवचार शिवारातल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
करून, शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिकांची, फळबागांची मोठी हानी लक्षात घेऊन राज्य सरकारनं
ओला दुष्काळ जाहीर करावा, बागायतदारांना हेक्टरी ५० हजार रुपये आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना
हेक्टरी २५ हजार रुपये तत्काळ मदत देण्याची मागणी दरेकर यांनी केली. पीकविमा संदर्भातही
त्वरीत निर्णय घ्यावेत, असं नमूद करत दरेकर यांनी, आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी
भारतीय जनता पक्ष भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं.
****
टाळेबंदी उठवण्याच्या पाचव्या टप्प्याअंतर्गत राज्यात आजपासून हॅाटेल्स, रेस्टॉरंट,
उपाहारगृह, बिअर बार सुरु होत आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं, तसंच
प्रत्येक कर्मचाऱ्याला आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक असल्याचं औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सुनिल चव्हाण यांनी सांगितलं आहे.
****
राज्य शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयं सुरू व्हावीत यासाठी आपण
प्रयत्न करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. बीड
इथल्या सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित वेबिनारमध्ये ते काल
बोलत होते. कोविड महामारीच्या काळात होमिओपॅथी देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावत
आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी ही अहिंसक आणि सर्वांना परवडेल
अशी उपचार पद्धती असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या
पिकांची, पालकमंत्री राजेश टोपे यांनी काल पाहणी केली. मंठा तालुक्यातल्या हातवन तसंच
निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करून,
टोपे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार
सक्षम आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच
प्रशासनाला दिले आहे. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत केली
जाईल, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
इंडियन प्रिमिअर लीग - आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल शारजाह इथं मुंबई
इंडियन्स संघानं सनराइजर्स हैदराबादच्या संघावर ३४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी
करत मुंबई इंडियन्सनं पाच बाद २०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनराइजर्स हैदराबादच्या संघाला वीस षटकांत सात गडी
बाद १७४ धावाच करता आल्या.
दुबईत झालेल्या दुसऱ्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्ज संघानं किंग्ज इलेवन पंजाब
संघाचा दहा गडी राखून पराभव केला.
****
No comments:
Post a Comment