Monday, 15 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** नागरिकांनी कोविड संदर्भातले नियम न पाळल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कठोर निर्णय घेण्याचा इशारा

** राज्य शासनाच्या आगामी अर्थसंकल्पात वैद्यकीय शिक्षणासाठी सहा ते सात टक्के तरतूद करावी -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची मागणी

** प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोच्या आत्मनिर्भर भारत आणि COVID-19 लसीकरण जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन

आणि

** चेन्नई इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीवर भारताची पकड मजबूत

****

नागरिकांनी कोविड संदर्भातले नियम न पाळल्यास, कठोर निर्णय घेण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्या होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले...

 

एका कार्यक्रमाच्याकरता फुलंब्रीला गेलो होतो. जातांना बघितलं ग्रामस्थ नागरिक मास्क वापरायचा आजिबात विचार करत नाहीयेत. हे अतिशय घातक आहे. आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल, अशी परिस्थिती आहे. आम्ही आता रात्री उशीरा मुंबईला जाणार आहे. उद्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही सगळे चर्चा करू, त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील.

दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद इथं मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांच्या आगामी वित्त वर्षासाठी नियोजनाच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठका झाल्या. उस्मानाबाद जिल्हा नियोजन आणि विकास आराखड्यासाठी २८५ कोटी रुपये, बीड जिल्ह्यासाठी ३४० कोटी तर नांदेड जिल्ह्यासाठी ३५५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे

 ****

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्याची गरज असून राज्य शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात सहा ते सात टक्के भरीव तरतूद, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणासाठी झाली पाहिजे. अशी मागणी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतल्या क्ष-किरणशास्त्र विभागाला श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं देण्यात आलेल्या थ्री टी एम आर आय यंत्राचं लोकार्पण देशमुख यांच्या हस्ते आज झालं. त्यानंतर कोविड योद्धांचा सन्मान देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कोविड वर मात करण्यासाठी सरकारनं दमदार पावलं उचलली आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसीचं संशोधन पुण्यामध्ये होणं ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

बीड इथल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्येची नियमानुसार चौकशी केली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप, गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला. याप्रकरणात राज्य सरकारमधले मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडलं जात आहे, त्यांचीही नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशी अहवालातून सत्य समोर येईल, त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

शेतकरी आंदोलनासंदर्भात देशाच्या समर्थनात ट्वीट केल्याप्रकरणी लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर त्यांच्या चौकशीची भाषा आपण कधीही केली नव्हती. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असं आपल्या म्हणण्याचा उद्देश होता, असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या साष्टपिंपळगाव इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्याची विनंती, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी आज साष्टपिंपळगाव इथं आंदोलकांची भेट घेऊन, चर्चा केली. मराठा आरक्षणाची लढाई आता न्यायालयात सुरू झाली आहे. मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन पाठपुरावा करण्याचं आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिलं. परंतु, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकांनी चव्हाण यांच्याशी बोलताना व्यक्त केला.

****

निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. न्यायदानाच्या क्षेत्रातील आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील न्यायमूर्ती सावंत यांचं कार्य सदैव स्मरणात राहील, असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावंत यांना श्रद्धांजली अर्पण करताना, पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली. सावंत यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते.

****

जळगाव जिल्ह्यात भीषण अपघातात दगावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. यावल तालुक्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झाला, यामध्ये सहा महिला तर ९ पुरुषांचा समावेश आहे. अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

****

कोरोना विरुद्धच्या लढाईत लोककला पथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती महत्त्वाची ठरणार असल्याचं, औरंगाबादचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी म्हटलं आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोच्या आत्मनिर्भर भारत आणि COVID-19 लसीकरण जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन गव्हाणे यांच्याहस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्यात पुढचे दहा दिवस या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

धुळे जिल्ह्यातही व्यापक जनजागृती मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते आज करण्यात आला.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात २२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १४ हजार १३२ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ३३ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १३ हजार ५८१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या १७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात आज नवे ७ कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर ३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या आता ३ हजार ८१८ झाली असून, यापैकी हजार ७१७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ४७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज कोविडचे १६ नवे रुग्ण आढळले, यामध्ये सर्वाधिक आठ रुग्ण बीड तालुक्यातले असून, अंबाजोगाई ४, पाटोदा २, आष्टी आणि गेवराई तालुक्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा यात समावेश आहे.

****

यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबध्द दस्तऐवज असल्याचं, खासदार डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे, ते आज परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यात डिझेल, पेट्रोलचा एकही डेपो नसल्यानं, इंडियन ऑईल कंपनीच्या व्यवस्थापकांनी नुकतीच औरंगाबाद, बीड किंवा परभणी यापैकी एका ठिकाणी नवीन डेपो उभारण्यासंदर्भात पाहणी केली असल्याची माहिती खासदार कराड यांनी दिली. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्‍नांवर सर्वच पक्षातील खासदार, आमदारांनी एकत्र येणाची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या पूर्ववत सुरु ठेवण्याची मागणी खासदार राजीव सातव यांनी ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांच्याकडे केली आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रबी हंगामातील गहू, हरभरा, भूईमुगाची पेरणी केली आहे. यावेळी वीज जोडण्या खंडीत केल्यास, शेतकऱ्यांचे रबी हंगामाचं नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता, वीज जोडण्या सुरु ठेवण्याची मागणी सातव यांनी केली आहे.

****

चेन्नई इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीवर भारतानं पकड मजबुत केली आहे. कसोटीत आज तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. रविचंद्रन अश्विनने १०६ धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहली ६२ धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरवात अडखळत झाली, आजच्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा इंग्लंडच्या तीन बाद ५३ धावा झाल्या होत्या. सामन्यात भारत ४२८ धावांनी आघाडीवर आहे.

****

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ परभणी शहरात जिल्हा युवक कॉंग्रेसच्यावतीनं आज सायकल रिक्षा चालवून आंदोलन करण्यात आलं. युवक जिल्हाध्यक्ष अकबर जागीरदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

//***********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 26 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...