Tuesday, 2 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** तीन कृषी कायद्यांविरोधातल्या गोंधळामुळं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर लोकसभेचं सायंकाळी सात वाजेपर्यंत तहकूब

** कोविड संसर्ग रोखण्यात सहकार्य करण्यासाठी राज्यात केंद्र सरकारचा उच्चस्तरीय गट दाखल

** ७२ लाख जोडण्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर येत्या पाच तारखेला राज्यभर आंदोलन करण्याचा भारतीय जनता पक्षाचा इशारा

** केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईचं दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर   

आणि

** यवतमाळमधील बालकांना पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर पाजल्या प्रकरणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस तर दोघे जण बडतर्फ

****

तीन कृषी कायद्यांविरोधात विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळं आज राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर लोकसभेचं कामकाज सायंकाळी पाच आणि त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यामुळं सात वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. आज दुपारनंतर लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, डाव्या पक्ष, समाजवादी पार्टी, शिवसेना आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाच्या समोर येऊन सरकारविरोधी घोषणा देण्यास सुरूवात केली. अध्यक्ष ओम बिरला यांनी विरोधकांना या मुद्यावर चर्चेला वेळ मिळेल असं सांगितलं. मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती, परिणामी सदनाच कामकाज स्थगित करण्यात आलं. तत्पूर्वी राज्यसभेतही या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विरोधक सदनाच्या मध्यभागी आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चेची मागणी केली. त्याआधी सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना उद्या या मुद्यावर चर्चा घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र विरोधकांनी सभापतींना कार्य स्थगितीचा प्रस्ताव देवून तात्काळ चर्चेची मागणी केली. दरम्यान, सभापतींनी ही मागणी फेटाळल्यामुळं विरोधकांनी सभात्याग केला.

****

कोविड संसर्ग प्रतिबंधाच्या कार्यात सहकार्य करण्यासाठी दोन उच्चस्तरीय गट महाराष्ट्र आणि केरळमध्ये केंद्र सरकारनं पाठवले आहे. देशात जवळपास ७० टक्के कोविडचे रुग्ण या दोन राज्यांमध्ये असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात आलेल्या गटात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या तज्ज्ञांचा समावेश आहे. हे गट राज्यातल्या आरोग्य विभागासोबत मिळून काम करतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील. कोविडवर प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना देखील हे गट सुचवतील.

****

कोविड लसीच्या आतापर्यंत एक कोटी ८५ लाख मात्रा खरेदी करण्यात आल्याचं आज सरकारकडून सांगण्यात आलं. या लसींच्या खरेदीसाठी सरकारनं तीन अब्ज ५० कोटी रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज राज्यसभेत दिली. दरम्यान, कोविड लसीकरणाअंतर्गत आतापर्यंत ३९ लाख ५० हजाराहून लोकांना लस देण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. सर्वात जास्त लसीकरण उत्तर प्रदेश राज्यात झालं असून त्यानंतर राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे.

****

कोविड -१९ संक्रमणातून रूग्ण बरे होण्याचा देशातला दर ९७ टक्के झाला आहे. आतापर्यंत एक कोटी ४८ हजार ४०६ जण या संक्रमणातून बरे झाले आहेत. सध्या देशात एक लाख ६३ हजार ३५३ सक्रीय रूग्ण असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईनं इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक आज जाहीर केलं. या दोन्ही परीक्षा ४ मे ते ११ जून या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं मंडळानं सांगितलं आहे.

****

येत्या ८ मार्चला महिला दिनी देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्कारासाठी नोंदणी करण्याची तारीख सरकारनं आता ६ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीनं महिला सक्षमीकरणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महिला दिनी हे पुरस्कार प्रदान केले जातात.

****

सरकारनं नूतनशील उर्जेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचं नवीन आणि नूतनशील उर्जा मंत्री आर के सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देतांना सांगितलं.

****

राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं त्वरीत मागे घ्यावा अन्यथा येत्या पाच तारखेला भारतीय जनता पक्ष राज्यभरातील  महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील, असा इशारा माजी ऊर्जामंत्री  आणि भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला. मुंबई  इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. टाळेबंदीत जनतेला शंभर युनिट पर्यंतचं वीज बिल माफीचं आश्वासन देणारं हे सरकार आता सक्तीनं वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत असुन हे बिल भरण्याची क्षमता सामान्य जनतेत नसल्याचं ते म्हणाले.

****

दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस, तसंच लष्करी आणि निमलष्करी जवानांच्या पाल्यांना, तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्राधान्य द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. राज्य पोलीस दलातल्या, तसंच राज्याचा रहिवासी असलेल्या लष्करी किंवा निमलष्करी शहीद जवानांच्या पाल्यांना प्रत्येक अभ्यासक्रमात जास्तीत जास्त एका जागेवर प्राधान्यानं प्रवेश दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे आणि गदिमा प्रतिष्ठान यांच्या वतीनं दिला जाणारा गदिमा काव्य प्रतिभा पुरस्कार ज्येष्ठ कवी डॉ जगदीश कदम यांना आज त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. सांगली जिल्ह्यात माडगुळे या ग.दि.माडगूळकरांच्या जन्मगावी झालेल्या गदिमा महोत्सवात कवी कदम सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे आज महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम

सदाफुले यांच्या हस्ते त्यांना त्यांच्या निवासस्थानी हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कामगार साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष कवी राजेंद्र वाघ आणि रानकवी श्रीनिवास मस्के उपस्थित होते.

****

यवतमाळ इथं पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याप्रकरणी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम आणि वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

तर बाल आरोग्य अधिकारी अमोल गावंडे तसंच आशा वर्कर संगीता मसराम यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. कोपरी कापसी इथल्या अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांच्याविरुद्ध देखील कारवाईचा प्रस्ताव असून तो महिला आणि बालकल्याण विभागाकडे पाठण्यात आला आहे. चौकशीअंती दोषी आढळल्यास या सर्वांविरुद्ध  पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हरी पवार यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १२ बालकांना कसलाही त्रास नसल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या कंधार ग्रामीण रुग्णालयात आजपासून कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब शिंदे हे उपस्थित होते. कंधार तालुक्यात ६५० आरोग्य कर्मचाऱ्यांना सहा दिवसात लस देण्यात येणार आहे.

****

ऑनलाईन नोंदणी करूनही ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणलेला नाही अशा शेतकऱ्यांनी येत्या शुक्रवारपर्यंत तो आणावा असं आवाहन परभणी जिल्ह्यातल्या पालम बाजार समितीचे सचिव आत्माराम जाधव यांनी केलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ५ ते १० टक्केच शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी हे आवाहन केलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात  इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू झाल्यापासून ९ कर्मचारी आणि ६५ शिक्षकांना कोरोना विषाणू संसर्गाची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. जिल्ह्यात एक हजार ५९५ शाळांपैकी एक हजार ४४८ शाळा सुरू झाल्या आहेत. अजुनही १४४ शाळा बंद असून ३२ ह्जार ३५३ विद्यार्थी गैरहजर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकानं मुंबई आणि परिसरातील अनेक ठिकाणी धाडी टाकून आठ खाद्यतेल रिपॅकर्स आणि घाऊक विक्रेते यांच्याविरुद्ध कारवाई केली.  या कारवाईत जवळपास साडे चार कोटी रूपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला.

****

जळगाव जिल्ह्याती हुतात्मा जवान सागर धनगर यांच्या पार्थिवावार, आज चाळीसगाव तालुक्यात तांबोळे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सागर धनगर हे २०१७ मध्ये भारतीय लष्करात भरती झाले होते. मणिपूर इथं कर्तव्यावर असताना, गोळी लागल्यानं त्यांना वीरमरण आलं होतं.

****

धुळे जिल्ह्यात आज पाच कोरोना विषाणू मुक्त रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. आता जिल्ह्यातल्या कोरोना विषाणूनं बरे होणाऱ्यांची संख्या १४ हजार ३४९ झाली आहे. आज ११ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले त्यामुळं एकूण बाधितांची संख्या आता १४ हजार ८३७ वर पोहोचली आहे. सध्या सक्रीय रुग्णांची संख्या ९७ आहे.

***///***

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...