Tuesday, 16 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी आवश्यक ४८१ धावांचा पाठलाग करतांना इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवरच संपुष्टात आला. भारताकडून अक्षर पटेलनं पाच, रविचंद्रन अश्विननं तीन तर कुलदीप यादवनं दोन गडी बाद केले. इंग्लंडकडून मोईन अलीनं सर्वाधिक ४३ तर कर्णधार जो रूटनं ३३ धावा केल्या. या विजयाबरोबरचं चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं इंग्लंडशी एक - एक अशी बरोबरी केली आहे. मालिकेतला तिसरा सामना येत्या २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे.

****

वसंत पंचमी आणि सरस्‍वती पूजेनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्‍ट्रपती एम. व्यंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सुभेच्छा दिल्या आहेत. राष्‍ट्रपतींनी वसंतच्या आगमनबरोबर देशवासियांसाठी एका ट्वीटद्वारे शुभचिंतन केले आहे. देवी सरस्वती सर्वांना विद्या, बुद्धी, आनंद आणि शांती प्रदान करो अशी कामना उपराष्‍ट्रपतींनी केली आहे.

****

दूरसंचार ग्राहकांना विनाकारण फोन करुन त्रास देणाऱ्या व्यक्ती किंवा टेलिमार्केटिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले आहेत. डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हावेत यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्ये बोलतांना त्यांनी डू नॉट डिस्टर्ब नोंदणीकृत ग्राहकांना एसएमएस किंवा कॉल करणाऱ्या टेलिमार्केटर किंवा संबंधित टेलिकॉम कंपन्यांना दंड आकारण्याचे आदेश मंत्री प्रसाद यांनी दिले. डू नॉट डिस्टर्ब नोंदणीकृत ग्राहकांसाठी असलेले नियम आणि कार्यपद्धतीची पूर्तता करावी आणि कोणतेही उल्लंघन झाल्यास आर्थिक दंड आकारला जावा असे ते म्हणाले.

****

ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्स्फर्डच्या कोविड-19 प्रतिबंधक लसींना जागतिक आरोग्य संघटनेनं काल तातडीच्या वापरासाठी मान्यता दिली. त्यामुळे ही लस जगभर वापरता येणार आहे. ऍस्ट्राझेनेका, कोरिया प्रजासत्ताक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे या लसीचं उत्पादन केलं जात आहे. कोविडची साथ नियंत्रणात आणण्याबाबत आणखी एक पाऊल पुढं पडल्याचं संघटनेचे महासंचालक तेद्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी नमूद केलं. ज्या देशांत आतापर्यंत लसीकरण सुरू झालेलं नाही तिथं आता आरोग्य सेवकांना आणि जोखीम असलेल्या व्यक्तींना लसीकरण करता येऊ शकेल, असं संघटनेच्या औषध विभागाचे सहायक महासंचालक डॉक्टर मारियांगेला सिमाओ यांनी सांगितलं.

****

गेल्या सात दिवसात देशाच्या १८८ जिल्ह्यामंध्ये तर गेल्या २८ दिवसात ७६ जिल्ह्यांमध्ये कोविड संक्रमणाचा एकही रूग्ण आढळून आला नसल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. सध्या देशात विविध १८ लसींवर संशोधन सुरू असून लवकरच त्यांच्या वापराला सुरूवात होणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, पुढील महिन्यापासून ५० वर्ष वयावरील लोकांना कोरोना विषाणूच्या लसीकरणाला सुरूवात होणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलतांना नमूद केलं.

****

देशात आतापर्यंत ८७ लाख २० हजार ८२२ लोकांना कोविड-१९ ची लस देण्यात आली आहे. दरम्यान, कोविड-१९ च्या संसर्गातून रूग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत देशात नऊ हजार १२१ नव्या कोविड बाधितांची नोंद झाली तर ११ हजार ८०५ रूग्ण या आजाराच्या संसर्गातून मुक्त झाले. सध्या देशात एक लाख ३६ हजार ८७२ सक्रीय रूग्ण उपचाराधीन आहेता.

****

अकोला जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत. १ ते १५ फेब्रुवारी या पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ९३९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

****

अर्थ मंत्रालयानं वस्तू आणि सेवा कर-जीएसटी अंतर्गत नुकसान भरपाईची पूर्तता म्हणून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पाच हजार कोटी रूपयांच्या १६ वा हप्ता काल जारी केला. यातले चार हजार ५९७ कोटी रूपये २३ राज्यांना देण्यात आले आहेत.

****

मुंबई - पुणे दृतगती मार्गावर आज पहाटे मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने चार वाहनांना धडक दिली. ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रेलर पुढील चार वाहनांवर जाऊन आदळला. या अपघातात पाच जण ठार आणि पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ३ जणांचा समावेश आहे. अपघातातील दोन जखमींना पनवेलला तर तिघांना वाशीच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

****

रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे, अस उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. जगातलं अशा तऱ्हेचं हे पहिलंच संशोधन केंद्र असेल, असंही ते म्हणाले. नागपूरच्या कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची राज्यात चार केंद्रं सुरू करण्याचा निर्णय झाला असून त्यापैकी पहिलं केंद्र रत्नागिरीत सुरू होणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं. या केंद्रात सर्व भाषांवर संशोधन केलं जाणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 28 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...