Wednesday, 17 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      कोरोना विषाणू संसर्ग विषयक नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश; संसर्ग वाढल्यास पुन्हा टाळेबंदी लावण्याचे संकेत.

·      राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर.

·      वेरूळच्या ऐतिहासिक मालोजी राजे भोसले गढीच्या दुरूस्ती आणि संवर्धनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी.

·      राज्यात तीन हजार ६६३ नव्या कोविड रुग्णांची नोंद, जालना जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू.

·      परभणी जिल्ह्यातल्या पालम शहरासाठी १७ कोटी २८ लाख रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबवणार - पालकमंत्री नवाब मलिक.

आणि

·      चेन्नईच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय.

****

कोरोना विषाणू संसर्ग विषयक सर्वत्र दाखवल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच, या संसर्गावर नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये या संसर्गाच्या रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांची काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार तसंच कृती दलाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. जनतेनं मास्क वापरावा, गर्दी टाळावी अन्यथा पुन्हा एकदा टाळेबंदीला सामोरं जावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादीत ठेवतानाच, मास्क वापरणं बंधनकारक आहे, जे नियमांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश, त्यांनी यावेळी दिले. गेल्या काही महिन्यांमध्ये या संसर्गाच्या रुग्णसंख्येत घट आल्यानं नागरिकांमध्ये बेफिकिरी आली, त्यामुळे प्रतिबंधासाठीच्या सूचनांचं पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली, तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका, नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणुशी संबंधित नियमांचं पालन होताना दिसत नसल्यामुळे, आंदोलनं, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये, विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचं पालन केलं जातं का, याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे, तसंच ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे, तिथं प्रतिबंधित क्षेत्रं करायची तयारी ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली. राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून, त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

****

राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातलं दूध संकलन वाढवून, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, सुनिल केदार यांनी दिल्या आहेत. ते काल मुंबईत या संदर्भात आयोजित एका बैठकीत बोलत होते. ‘मदर डेअरी’नं नागपूर इथं पाच लाख लिटर दूध संकलन करून त्याद्वारे दुधाची विविध उत्पादनं तयार करावीत आणि यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं, केदार यांनी यावेळी सांगितलं.

****

गाव विकासासाठी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून मोठा निधी मिळत असून, त्याचा उपयोग पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर विकास कामांसाठी करावा, असं आवाहन, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. अहमदनगर इथं आर. आर. पाटील सुंदर ग्राम योजनेअंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते काल बोलत होते. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना, चाळीस लाख रुपये, तर तालुका स्तरावर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना, दहा लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जातं.

****

राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी जमातीतल्या विद्यार्थ्यांसाठी, राज्य सरकारनं हडपसर इथं शासकीय वसतीगृह उभारण्याचा निर्णय घेतला असून, या नियोजित वसतीगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकाला, काल प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या इमारतीच्या बांधकामासाठी ४४ कोटी ८५ लाख रुपयांचं अंदाजपत्रक आणि आराखडा सादर करण्यात आला होता. वसतीगृहाची इमारत नऊ मजली असेल आणि याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, तसंच यात इयत्ता आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान, तर दहावीची परिक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षानं ख्यातनाम व्यक्तींवर दबाव आणून शेतकरी आंदोलनाविरोधात सामाजिक संपर्क माध्यमांत व्यक्त होण्यास भाग पाडलं हा काँग्रेसचा आरोप सत्य होता हे सिद्ध झालं असल्याचं, काँग्रेसचे प्रदेश सचिव, प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत भारतीय जनता पक्षाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि बारा व्यक्तींचा यात समावेश होता हे समोर आल्याचं त्यांनी काल मुंबईत सांगितलं. भारतीय जनता पक्षानं देशविरोधी केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला असून, या पक्षाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि बारा जणांविरुद्ध तात्काळ कारवाई करा, अशी मागणी सावंत यांनी यावेळी केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध वेरूळ इथल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मालोजी राजे भोसले गढीच्या दुरूस्ती आणि संवर्धनासाठी, पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचं, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. देशमुख यांनी काल वेरुळ इथं मालोजी राजे भोसले गढीला भेट दिली आणि शहाजी राजे भोसले स्मारकाची पाहणी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या प्राचीन मंदिरांचं संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी एक महत्वपूर्ण योजना राज्य शासन राबवणार असल्याचं ते म्हणाले. यामध्ये औरंगाबादनजीक सातारा इथलं खंडोबा मंदीर, बीड इथलं कंकालेश्वर मंदीर, तुळजापूर इथलं तुळजाभवानी मातेचं मंदीर, नांदेड जिल्ह्यात नायगाव इथलं नृसिंह मंदीर आणि माहूर इथल्या रेणुका माता मंदीराचा समावेश असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

****

राज्यात काल तीन हजार ६६३ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ७१ हजार ३०६ झाली आहे. काल ३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ५९१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ७०० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ८१ हजार ४०८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ६६ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल जालना जिल्ह्यात एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २७१ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात १२० रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ५५, नांदेड २१, लातूर आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी १९, परभणी १५, उस्मानाबाद १२ तर हिंगोली जिल्ह्यात दहा नवे रुग्ण आढळून आले.

****

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाली आहे. शिंगणे यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली. आपली प्रकृती उत्तम असून, संसर्गावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची निकड लक्षात घेता परभणी जिल्ह्यातल्या पालम शहरात, १७ कोटी २८ लाख रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबवली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पालम शहर पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन समारंभात ते काल बोलत होते. पालम तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपला भर असल्याचं ते म्हणाले.

****

हिंगोली जिल्हा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे २०२१ या वर्षासाठीचे, शिवछत्रपती गौरव पुरस्कार काल जाहीर झाले. राज्य पातळीवरील क्रिकेटपटू संदीप पंडित, कृषी क्षेत्रात आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते मधुकर पानपट्टे, सामाजिक कार्यकर्ते शेख सुभान अली आणि शैक्षणिक क्षेत्रातले कार्यकर्ते शिवाजी कोटकर यांना हे पुरस्कार घोषित झाले आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूचं प्रमाण चिंताजनक असून, याबाबत लोकांनी अधिक जागरुकता बाळगून तपासणीसाठी विश्वासानं पुढ येण्याची आवश्यकता असल्याचं मत, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केलं आहे. काल यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही चिंतेची बाबत असून, आरोग्य विभागानंही कोरोना विषाणूशी संबंधित तपासणीचा वेग अधिकाधिक कसा वाढेल याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

चेन्नई इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर, काल चौथ्या दिवशीच ३१७ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघानं इंग्लंडविरुद्ध आजवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. विजयासाठी आवश्यक ४८१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव, १६४ धावांवरच संपुष्टात आला. भारताकडून अक्षर पटेलनं पाच, रविचंद्रन अश्विननं तीन तर कुलदीप यादवनं दोन गडी बाद केले. इंग्लंडकडून मोईन अलीनं सर्वाधिक ४३ तर कर्णधार जो रूटनं ३३ धावा केल्या. अष्टपैलू कामगिरी बजावणारा आर. अश्र्विन समानावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरचं चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतानं इंग्लंडशी एक - एक अशी बरोबरी केली आहे. मालिकेतला तिसरा सामना येत्या २४ फेब्रुवारीपासून अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लोक संपर्क कार्यालयातर्फे काल जालना इथं, कोरोना विषाणू संसर्ग लसीकरणाबाबत लोककला पथकांच्या माध्यमातून, फिरत्या रथातून जनजागृती अभियानाची सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या योजनेचा प्रारंभ झाला. हे पथक पुढील दहा दिवस जिल्ह्यात अभियान राबवणार आहे.

****

परभणी महानगरपालिकेसह अन्य शासकीय यंत्रणा दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात सातत्यानं उदासीनतेचं धोरण अवलंबत असल्याच्या निषेधार्थ, संतप्त दिव्यांगानी काल सकाळपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. या संदर्भात कृती होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

****

नांदेड शहरात सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या वतीनं सुरु असलेल्या शिख बांधवांच्या शैक्षणिक विकासासाठीच्या संस्थांना राज्य सरकारनं अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचा दर्जा बहाल केला आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल ही माहिती दिली.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्याच्या २१ गावांना अद्यापपर्यंत अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्यामुळे, उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. तालुक्यातल्या पाच महसुल मंडळांपैकी चार मंडळांतल्या शेतीचं अतिवृष्टीनं नुकसान झालं आहे. तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी निवेदनं देऊनही प्रशासनानं कार्यवाही केली नसल्यामुळे, हे आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

****

मुंबई - पुणे दृतगती मार्गावर काल पहाटे मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरनं चार वाहनांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले तर पाच जखमी झाले आहेत. ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाला.

****

केंद्र शासनानं दिव्यांगांसह गरजू गोरगरीब तळागाळातील माणसाच्या वेदना लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी विविध योजना सुरू करून प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळवून दिला असल्याचं, भारतीय जनता पक्षाचे आमदार रमेश कराड यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं, केंद्रीय सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप करताना, ते काल बोलत होते.

****

मागील पंधरा दिवसांपासून अकोला जिल्ह्यात झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कालपासून २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

****

गोंदिया पोलिसांतर्फे नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील देवरी तालुक्यात कालपासून तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून पहिल्याच दिवशी पाचशेवर बेरोजगार तरुणांनी यात सहभाग घेतला. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात अनेकांना नोकरीला मुकावं लागल्यामुळं त्यांना पुन्हा रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागपूर, पुणे, मुबई, अमरावती आदी ठिकाणांहून चाळीसहून अधिक कंपन्यांचा यात सहभाग आहे. याद्वारे एक हजारपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं गोंदिया पोलिसांनी सांगितलं.

****

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ काल यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस आणि नेर येथे बंजारा समाज समन्वय समितीनं मोर्चा काढला. विरोधक राठोड यांची नाहक बदनामी करत असल्याचं सांगत मोर्चेकऱ्यांनी विरोधकांचा यावेळी निषेध केला.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री राठोड हे येत्या गुरुवारी १८ फेब्रुवारीला पोहरादेवी गडावरुन आपली भूमिका मांडणार असल्याचं बंजारा समाजाचे गुरू सुनील महाराज यांनी काल सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...