Wednesday, 17 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूतल्या इंधन आणि वायू क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रकल्पाची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करणार आहेत. पंतप्रधान यावेळी रामनाथपुरम - थुथूकुडी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा नैसर्गीक वायू पाईपलाईन आणि गॅसोलाईन डिसल्फरायझेशन युनिट राष्ट्राला अर्पण करतील. तसंच नागपट्टीनम कावेरी बेसिन रिफायनरी प्रकल्पाची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पांमुळे सामाजिक आर्थिक लाभ होतील आणि देशाची उर्जा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुकर होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औरंगाबाद इथल्या विभागीय केंद्राचं काम गतिमानतेनं येत्या अठरा महिन्यात पूर्ण करावं, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी इथं काल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास केल्यानंतर ते बोलत होते. या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी संशोधन, प्रशिक्षण कार्यक्रम, विविध चर्चासत्र, कार्यशाळा यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्याच्या दृष्टीने नियोजन ठेवावं, असं ते म्हणाले.

****

शेतकऱ्यानं पिकवलेला शेतमाल कुठंही कोणत्याही दरानं विकण्याचा जन्मसिध्द अधिकार हा शेतकऱ्यांचा आहे, तोच अधिकार त्यांना देण्याचं ऐतिहासिक काम मोदी सरकारनं तीन कृषी कायदे तयार करुन केलं असल्याचं, खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे. ते काल धुळ्यात साक्री रोड इथं एका खासगी कांदा बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कायद्यांमुळे ना हमी भाव जाईल, ना बाजार समित्या बंद होतील, हे शेतकऱ्यांनी तसंच त्यांची दिशाभूल करणाऱ्यांनी समजून घ्यावं, असं भामरे म्हणाले.

****

नाशिक शहरातल्या सातपूर इथं तीन पोलिस कर्मचाऱ्यांना १३ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं. अपघातातल्या दुचाकीस्वाराची अटक टाळण्याकरता या पोलिस कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती.

****

मराठवाड्यात काल जालना जिल्ह्यात एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २७१ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात १२०, जालना ५५, नांदेड २१, लातूर आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी १९, परभणी १५, उस्मानाबाद १२, तर हिंगोली जिल्ह्यात दहा नवे रुग्ण आढळून आले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...