Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18
February 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
भारतानं
२५ देशांमध्ये कोविड लसींचा पुरवठा केला असून, आणखी ४९ देशांमध्येही हा पुरवठा केला
जाणार आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा
परिषदेच्या कोविडसंदर्भातल्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आयोजित मुक्त चर्चासत्रात,
ते बोलत होते. संयुक्त राष्ट्र शांतीदूतांना लसींच्या दोन लाख मात्रा भेट म्हणून देण्यात
येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लसीकरण मोहीम सातत्यपूर्ण पद्धतीनं राबवणं, जनुकीय
माहितीसंदर्भात आदानप्रदान करणं, लसीचे फायदे जनतेला समजावून सांगणं आणि आरोग्यविषयक
पायाभूत सुविधांमध्ये सुधारणं करणं, या गोष्टींची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद
केलं. लस राष्ट्रवाद संपला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीयीकरणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे,
असं मतही जयशंकर यांनी व्यक्त केलं.
****
कोविड-19
प्रतिबंधक लसीच्या मात्रांचं अत्यंत विषम प्रमाणात आणि अयोग्य पद्धतीनं वितरण होत असल्याबद्दल,
संयुक्त राष्ट्रांचे सहसचिव अन्तेनिओ गुटेरस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व देशांमधल्या
सर्व नागरिकांना लवकरात लवकर लस मिळावी, यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज
असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. जगातल्या दहा बलशाली देशांनी, सध्या उत्पादित होणाऱ्या
कोविड प्रतिबंधक लसीपैकी ७५ टक्के लस खरेदी केली आहे, मात्र १३० देशांना अद्याप एक
मात्राही मिळालेली नाही. जगातल्या संपूर्ण लोकसंख्येला लस पुरवणं, ही बाब म्हणजे सर्व
देशांपुढे असलेलं सर्वात मोठं आणि कठीण असं नैतिक आव्हान असल्याचं गुटेरस यांनी नमूद
केलं.
****
देशात
काल १२ हजार ८८१ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०१ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी नऊ लाख ३७
हजार ३२० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५६ हजार १४ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. तर काल ११ हजार ९८७ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ५६ हजार
८४५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ३७ हजार ३४२ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत. दरम्यान, देशभरात आतापर्यंत ९४ लाख २२ हजार २२८ नागरिकांचं कोविड लसीकरण
करण्यात आलं.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोना विषाणूची लागण
झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात
आलेल्यांनाही कोरोना चाचणी करण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचंही
सांगितलं आहे.
****
शिवजयंती
उद्या साजरी होत आहे. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शिवजयंती साधेपणानं साजरी
करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित
करण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान,
शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगड आज आणि उद्या शिवभक्तांसाठी ४८ तास खुला राहणार असून,
यासाठी शिवभक्तांना कोणतंही प्रवेश शुल्क आकारलं जाणार नाही. केंद्रीय पुरातत्व विभागानं
ही मान्यता दिली आहे.
****
कृषी
कायद्याविरोधातल्या आंदोलनात आज ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन केलं जात आहे. अखिल भारतीय
किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या गंगापूर शाखेतर्फे औरंगाबाद नजीक लासुर
स्टेशन इथं सचखंड एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कॉम्रेड राम बाहेती आणि
कैलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात बालविवाहचं प्रमाण कमी करण्यासाठी विविध शासकीय विभागांनी करावयाच्या कामांचा
कृती आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली
आहे. बालविवाह निर्मुलनासाठीच्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते.
शिक्षक हा यातील महत्वाचा घटक असून, त्यांनाही या कामात सहभागी करण्यात यावं, शाळांमधून
शिक्षकांनी मूल्य शिक्षण आणि इतर विषयाच्या अनुषंगानं मुला-मुलीमध्ये जागृती करण्याचं
काम करावं, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
मराठवाडा
आणि विदर्भाच्या समतोल विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास मंडळांच्या
मुदतवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची सूचना राज्य सरकारला करावी, अशी मागणी मागणी
भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे
केली आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात विदर्भ-मराठवाड्यासाठी लोकसंख्येनुसार विकास
निधीची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वैधानिक विकास मंडळांच्या मुदतवाढीचा
निर्णय घेण्यात चालढकल करण्याचे प्रयत्न होत असून, या प्रयत्नांविरोधात विदर्भ - मराठवाड्यातल्या
लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून एकत्र आलं पाहिजे, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं
आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे समाजमाध्यमावर पसरलेला संचारबंदीचा आदेश बनवाट
असून, नागरिकांनी त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी
केलं आहे. जिल्ह्यात असा कोणताही आदेश लागू केला नसल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे कळवलं
आहे.
****
No comments:
Post a Comment