आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आसाममधल्या महाबाहु-ब्रह्मपुत्रा
जलमार्गाचा प्रारंभ करणार आहेत. धुब्री-फुलबारी पुलाची पायाभरणी तसंच माजुली पुलाचं
भूमीपूजन करून या पुलाच्या बांधकामाचाही प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या
पूर्व भागातली दळणवळण सुविधा अधिक सोयीस्कर व्हावी तसंच ब्रह्मपुत्रा आणि बरक या नद्यांच्या
आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा विकास व्हावा हा महाबाहु-ब्रह्मपुत्रा जलमार्ग
प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
केरळमधल्या
प्रमुख ऊर्जा प्रकल्प आणि शहरी क्षेत्रातील मुख्य विकास योजनांचं कोनशिला अनावरण आणि
उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
औरंगाबाद
महानगरपालिकेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौकातल्या स्मारकाचं काम पूर्ण
केलं नसल्यानं शिवप्रेमींचा हिरमोड झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या स्मारकाचं
काम संथगतीनं सुरू आहे. क्रांती चौकात पूर्वी असलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा
उद्या शिवजयंतीनिमित्त तात्पुरता पुन्हा चबूतऱ्यावर बसवावा, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्याकडे करण्यात
आली होती. मात्र महापालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे यंदा शिवप्रेमींना
शिवरायांना अभिवादन करता यावं यासाठी चौकात एका बाजूस व्यासपीठ उभारून छत्रपती शिवाजी
महाराजांचा पुतळा ठेवण्यात येणार आहे. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या शिष्टमंडळानं
काल या कामाची पाहणी केली.
****
हिंगोली
जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे समाजमाध्यमावर पसरलेला संचारबंदीचा आदेश बनवाट
असून, नागरिकांनी त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी
केलं आहे. जिल्ह्यात असा कोणताही आदेश लागू केला नसल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे कळवलं
आहे.
****
लातूर
इथं क्राय संस्थेद्वारे १८ वर्षापर्यंत विशेषता मुलींसाठी ‘शिक्षणाचं सार्वत्रीकरण
- स्थिती, आवाहन आणि भूमिका’ या विषयावरची कार्यशाळा घेण्यात आली. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये
१८ वर्षांपर्यंतच्या मुलीच्या शिक्षणाचा वैश्विक विचार करणं महत्वाचं असल्याचं मत,
क्राय इंडियाचे विभागाचे महाव्यवस्थापक कुमार निलेंदू यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
No comments:
Post a Comment