Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
असंघटीत क्षेत्रातल्या
कामगारांच्या नोंदणीबाबत राज्यांनी केलेल्या प्रयत्नांवर समाधानी नसल्याचं, सर्वोच्च
न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, देशात
स्थलांतरित कामगारांच्या नोंदणीची प्रक्रिया अंत्यंत संथ गतीने सुरु असून, या कामगारांना
सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर केली
पाहिजे, असं म्हटलं आहे. स्थलांतरीतांसह इतर लाभार्थ्यांपर्यंतही, विविध योजनांचा लाभ
पोहोचवण्याच्या प्रक्रियेचं मूल्यमापन केलं पाहिजे, स्थलांतरित कामगारांची ओळख पटवून
घेतल्यानंतरच, त्यांची नावं नोंदवून घेण्यात यावी, अशा सूचना न्यायालयानं केल्या आहेत.
****
देशभरात आतापर्यंत
कोविड प्रतिबंधक लसींच्या १९ कोटी ५० लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. १८ ते ४४ वयोगटातल्या
एक कोटी नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
काल दिवसभरात १६ लाख मात्रा देण्यात आल्या.
****
दरम्यान, देशात
काल नव्या दोन लाख २२ हजार ३१५ नव्या कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाली, तर चार हजार
४५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविडबाधितांची संख्या दोन
कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख तीन हजार ७२० रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. तर काल तीन लाख दोन हजार ३१५ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत दोन
कोटी ३७ लाख २८ हजार ११ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या २७
लाख २० हजार ७१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीनं आपल्या विनामुल्य ई-न्यायालय सेवा भ्रमणध्वनी ॲप साठी, मराठीसह चौदा भाषांमध्ये नियमावली जारी केली आहे. या ॲपची सेवा ही नागरिक, अर्जदार, कायदेविषयक
सल्लागार आस्थापना, पोलीस तसचं इतर
सरकारी आणि बिगरसरकारी संस्थांसाठी उपयुक्त असेल, अशी माहिती
विधी आणि न्याय विभागानं दिली आहे. हे ॲप सर्वोच्च
न्यायालयाच्या ई समितीच्या अधिकृत संकेत स्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
विद्युत विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या फळीचे कर्मचारी म्हणून घोषित करुन,
त्यांचं लसीकरण करावं, अशी मागणी भाजपचे राज्य महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली
आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. जे वीज कर्मचारी
कोविड काळात मृत्यूमुखी पडले, त्यांना ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मागणीही त्यांनी
या पत्रात केली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळवलं असून, तिसरी लाटही थोपवून, या संसर्गावर निश्चितच विजय मिळवू, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक - कोरोना
प्रतिबंधक कृती दलाचे सदस्य, डॉक्टर
तात्याराव लहाने यांनी नमूद केलं आहे. ते काल मुंबईतल्या बोरिवली इथं, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते. मास्क हा आपल्या कपड्यांप्रमाणे
एक अविभाज्य भाग आहे, असं आवर्जून त्यांनी नमूद केलं. आरोग्याच्या दृष्टीनं हलगर्जीपणा
योग्य नसून लोकांनी हक्कांबरोबर कर्तव्याचीही जाणीव ठेवावी, असं लहाने यांनी सांगितलं.
****
देशात हवेशीर पी.पी.ई. किटची पहिली खेप तयार असून, ३० ते ४० युनिट्स हे देशातले
डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांना लवकरच देण्यात येणार आहेत. मुंबईचा निहालसिंग आदर्श
या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानं, हे पी.पी.ई. कीट बनवले आहेत. आणखी शंभर किटचं
उत्पादन सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. निहालसिंग याने तयार केलेल्या
या पी.पी.ई. कीटला, पट्ट्याच्या स्वरुपात जोडता येणाऱ्या एका उपकरणाद्वारे हवा खेळती
राहिल्यानं, अस्वस्थता जाणवत नाही, त्यासोबतच विविध बुरशी आणि अन्य संसर्गापासून ही
बचाव होतो.
****
आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेला दुबई इथं प्रारंभ झाला असून, काल पहिल्याच दिवशी
भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. महिला खेळाडूंनी या स्पर्धेत आपली
सात पदकं निश्चित केली आहेत. मेरी कोम, पूजारानी, अनुपमा, लवलीना बोरोहीम, लालबुआत
सैही आणि मोनिका यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मोहंमद हसमुद्दिन, शिव थापा आणि
सुमित संगवान आज आपल्या खेळाला सुरुवात करतील. अमित पंघल, वरीन्द्र सिंह, विकास कृष्ण,
आशिष कुमार, संजीत आणि नरेंद्र यांच्यासह सहा भारतीय मुष्टियोद्धे खेळाडू उपउपांत्य
फेरीत पोहोचले आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या ८८९ गावं कोरोना विषाणू मुक्त झाली आहेत. यात पेठ तालुक्यातल्या
सर्वाधिक ११७ गावांचा समावेश आहे. गेल्या १२ दिवसांपासून जिल्ह्यात कडक टाळेबंदी सुरू
असल्यानं, तसंच काही ठिकाणी जनता संचारबंदी पुकारण्यात आल्यानं ग्रामीण भागातली रुग्णसंख्या
वेगानं कमी होत आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथं पोलिसांनी तीन लाख ९६ हजार रुपये
किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला. यावेळी एका आरोपीला पकडण्यात आलं, तर दोन आरोपी
फरार झाले.
******
No comments:
Post a Comment