Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 24 May 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०२१ सायंकाळी
६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात
येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी,
आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन
घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला
मास्क लावावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर नोंदणी
तसंच समूह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
** भारत बायोटेकच्या कोविड बूस्टर डोसचं परीक्षण सुरू; पॅनेसिया बायोटेक कंपनी स्पुतनिक लसीचं उत्पादन करणार
** बीड जिल्ह्यात उद्या रात्रीपासून ३१ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत
कडक निर्बंध लागू होणार
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं स्वखर्चातून उभारलं सुसज्ज कोविड सुश्रुषा केंद्र
****
१८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर नोंदणीची तसंच समूह नोंदणीची
सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक पातळीवरील
परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा, लसीच्या
मात्रा वाया जाऊ नयेत, आणि
नागरिकांचं लसीकरण व्हावं, हाच
या मागचा उद्देश आहे. फक्त
शासकीय लसीकरण केंद्रांवरच ही सुविधा उपलब्ध असेल. खासगी लसीकरण केंद्रांना मात्र लसीकरण कार्यक्रम जाहीर करून, ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. कोविन ॲपवर सध्या एका मोबाईलवरून चार जणांची नोंदणी करता येते, मात्र ज्या नागरिकांना मोबाईल किंवा इंटरनेट वापराला मर्यादा
आहेत, त्यांना या ॲपवरून समूह नोंदणी
करून लसीकरणाची वेळ घेता येणार आहे. लसीकरण
केंद्रावर नोंदणीचा निर्णय घेताना, केंद्रांवर
गर्दी होणार नाही, यासाठी
नियोजन करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत बायोटेक कंपनीने कोविड लसीच्या बूस्टर डोसचं परीक्षण सुरू केलं आहे. औषध महानियंत्रकांनी बूस्टर डोसचं परीक्षण करण्याची परवानगी
दिल्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था -
एम्सच्या दिल्ली तसंच पाटणा इथल्या रुग्णालयात हे परीक्षण केलं
जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या परीक्षणात सहभागी नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीची दुसरी मात्रा घेतल्याच्या सहा
महिन्यांनंतर बुस्टर डोस दिला जाणार आहे.
दरम्यान, पॅनेसिया बायोटेक ही भारतीय
जैव तंत्रज्ञान कंपनी रशियाच्या स्पुतनिक या कोविड लसीचं उत्पादन करणार आहे. स्पुतनिक व्ही या लसीच्या दरवर्षी दहा कोटी मात्रांचं उत्पादन
करण्याची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेश जैन यांनी केली आहे.
****
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसीच्या २१
कोटी ८० लाख ५१ हजार ८९० मात्रा दिल्या आहेत. यापैकी २० कोटी ८ हजार ८७५ मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही एक कोटी ८० लाख ४३
हजार मात्रांचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय, ४८ लाखाहून अधिक मात्रा सध्या पुरवठा प्रक्रियेत असून, येत्या ३ दिवसांत त्या राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध
होतील, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
नागपूर जिल्ह्यात कोविडमुळे कुटूंबातल्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेला असल्यास अशा मुलांचं पालकत्व जिल्ह्यातली
श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट घेणार आहे. या मुलांचं शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, कौशल्य विकासाची संपूर्ण जबाबदारी ट्रस्टनं स्वीकारली असल्याची माहिती माजी महापौर संदीप
जोशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय, पालक गमावलेल्या उपवर मुलींचा विवाह लावून देण्याचा या संस्थेचा प्रयत्न आहे. क्रीडा प्रशिक्षक, कलाकारांना
किट्सचं वाटप करण्यात येणार
अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिली.
****
नाशिक जिल्ह्यात १२ दिवसांचे कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर आज बाजार, उद्योग सुरू झाले. गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू झाल्यानं
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत आज लिलाव सुरू होताच
कांद्याला प्रतिक्विंटल किमान सातशे तर जास्तीत जास्त १ हजार ४८१ रुपये दर मिळाला.
****
सातारा जिल्ह्यात आज रात्री १२ वाजेपासून १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत
कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. या
काळात राज्य परिवहन मंडळाच्या सेवा तसंच सर्व सहकारी बँक, पतसंस्था बंद राहणार आहेत. भाजी, किराणा तसंच इतर सर्व बाजारपेठा देखील बंद राहणार असून दूध वितरणासाठी
सकाळी ७ते ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात उद्या २५ तारखेच्या रात्री १२ वाजेपासून ३१ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत
कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज यासंदर्भातले आदेश जारी केले. औषधी दुकानं, आरोग्यसेवा, तसंच इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापनं या काळात
बंद राहणार आहेत. भाजीपाला
विक्री सकाळी ७ ते ९ या वेळेत तर दूधविक्री सकाळी ७ ते १० या वेळेत सुरू असेल. स्वस्त धान्य दुकानं आणि कृषी निविष्ठा सकाळी ७ ते दुपारी १
वाजेपर्यंत सुरु राहतील. ज्या
नागरिकांना लसीकरणाबाबत मोबाईलवर संदेश आलेला आहे, अशांना या काळात लस घेण्यासाठी परवानगी असणार आहे.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज १४ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ रुग्णांचा समावेश असून अहमदनगर
जिल्ह्यातल्या तीन आणि नाशिक, जळगाव
इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या पाच हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पाच लाख ५१ हजार ३४२ जणांनी कोविडचे दोन्ही डोस घेतल्याचं जिल्हाधिकारी
कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
बीड
जिल्ह्यात आज ८२४ नवे
कोविड बाधित रुग्ण आढळले.
यामध्ये बीड २०१, आष्टी
१८२, केज ७८, पाटोदा
६५, अंबाजोगाई ५७,
गेवराई ५४, माजलगाव ५१,
शिरुर ४९, धारुर ४४,
वडवणी २२ आणि परळी इथल्या २१
रुग्णांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद
शहरानजिक असणाऱ्या आदर्श
पाटोदा ग्रामपंचायतनं स्वखर्चातून
गावातील जिल्हा परिषद
शाळेत सर्व सुविधांनी युक्त
कोविड केअर सेंटर स्थापन
केलं आहे. सरपंच
जयश्री दिवेकर, उपसरपंच
कपिंद्र पेरे आणि ग्राम
विकास अधिकारी पुंडलिक
पाटील यांच्या संकल्पनेतून
गावात हे कोविड केअर
सेंटर सुरू करण्यात आलं
आहे. गावातील ४५
वर्षांवरील सर्व व्यक्तींचे १००
टक्के लसीकरण पूर्ण
झाल्याचं ग्राम विकास अधिकारी
पुंडलिक पाटील यांनी सांगितलं.
ते म्हणाले….
प्राथमिक सर्व आरोग्याच्या ज्या सुविधा लागतील त्या आम्ही इथं ठेवलेल्या आहेत. खाजगी डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे, आणि त्याचं पेमेंट ग्रामपंचायत करते.होम आयासोलेशनचा ज्यांना सल्ला दिला जातो. तर इथे त्यांना ॲडमिट करुन त्यांची देखरेख
या डॉक्टरांच्या अधिपत्याखाली करुन आणि मग त्याची ट्रीटमेंट करण्याची सुविधा आम्ही
इथं केली .त्याच्या मागचं कारण असं आहे की, तो जर गावात पेशंट राहिला तर त्याचं मनोधैर्य मजबूत होतं आणि तो लवकर कव्हर होण्याच्या
दृष्टीकोनातून म्हणून हे क्वारांटाईन सेंटर स्थापन करण्याची आमची संकल्पना होती. असंच जर इतर ग्रामपंचायतीनं केलं तर जो सरकारी
यंत्रणेवर ताण येतो आहे. तो कमी होवून पेशंटची संख्या कमी होईल व कोरोना हा लवकरात लवकर हा हद्दपार होवू
शकतो. एव्हढं
आवाहन मी पाटोदा ग्रामपंचायतच्या वतीनं करतो.
****
टाळेबंदीच्या
काळात परभणी जिल्ह्यातल्या ऑटो
रिक्षा मालकांकडून बँका
किंवा फायनान्स कंपन्या
करत असलेली कर्जाची
हप्ते वसुली तत्काळ थांबवावी
अशी मागणी प्रहार जनशक्ती
पक्षानं केली आहे. जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांना
आज याबाबत एक
निवेदन सादर करण्यात आलं.
राज्य शासनानं चालू
वर्षी दीड हजार रुपये
मदत केली, मात्र
ती तुटपुंजी आहे.
या वर्गाची आर्थिक
स्थिती सध्या नाजुक असल्यामुळे
सक्तीची हफ्ते वसुली तत्काळ
थांबवावी अशी मागणी संघटनेनं
केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात
कोरोना संसर्गाचं प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणं
आवश्यक असल्याचं अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी म्हटलं
आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना
आढावा बैठकीत बोलत होत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६२
शतांश टक्क्यांवर आला आहे, कोविडच्या संभाव्य
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपचारांच्या नियोजनसह प्रशासन सज्ज असल्याचं
गव्हाणे यांनी सांगितलं.
//*********//
No comments:
Post a Comment