Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र राज्य
स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन आज उत्साहात पण कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून साजरा
होत आहे.
राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी राजभवनात ध्वजारोहण केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात
ध्वजारोहण केलं, त्यानंतर त्यांनी हुतात्मा स्मारकास भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन
केलं.
औरंगाबाद इथं विभागीय
आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
झालं. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार
पांडेय, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी
राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. कुलगुरु
डॉ.येवले यांनी महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बीड इथं जिल्हाधिकारी
कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पालकमंत्री
मुंडे यांना पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
उस्मानाबाद इथं
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी
हुतात्मा स्मृतिस्तंभला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
परभणी इथं पालकमंत्री
नवाब मलिक यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते
ध्वजारोहण झालं.
नांदेड इथं पालकमंत्री
अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केलं. यावेळी जिल्हाधिकारी
डॉ.विपीन ईटनकर यांच्यासह मोजके अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
लातूर इथं पालकमंत्री
अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केलं. यावेळी पोलीस
दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली. देशमुख यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार
दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या, कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी एकजुटीने
लढा देण्याचं आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केलं.
जालना इथं जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
करण्यात आलं. कोविड नियमांचं काटोकोरपणे पालन करुन ध्वजारोहणाचा कार्यक्रम साधेपणानं,
मोजक्याच्या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
शासनानं घालून दिलेल्या निर्बंधाचं सर्व नागरिकांनी तंतोतत पालन करावं, प्रत्येकाने
मास्क तसंच सॅनिटायजरचा योग्य वापर करावा, सामाजिक अंतराचं पालन करावं आणि विनाकारण
रस्त्यावर न फिरता घरातच राहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन
टोपे यांनी केलं आहे.
****
सध्याच्या संकट
काळामध्ये राज्यातल्या जनतेनं कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून सुरक्षित व्हावं, असं आवाहन,
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांनी आज
राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. कोविड काळात राज्य सरकारनं राबवलेल्या विविध योजना
आणि कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांविषयी,
राज्यपालांनी यावेळी माहिती दिली. कोविड-19 च्या संकटावर मात करताना राज्याची अर्थव्यवस्था
सांभाळत, वंचित, उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देताना, राज्याच्या प्रगतीचा आलेख
उंचावला जाईल, यासाठी शासन काम करत असल्याचं, राज्यपाल म्हणाले. कित्येक वर्षांपासून
प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर, राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची
माहिती देताना, त्यांनी सरकारचं कौतुक केलं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी,
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात राज्याची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी, राज्य
शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं, राज्यपालांनी नमूद केलं.
****
देशभरात कोरोना
विषाणूच्या दुसऱ्या लाटेचं संकट तीव्र झालेलं असतानाच, दहा वर्षांखालील लहान मुलांमध्येही
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन, तज्ज्ञांच्या
सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंती, शिवसेना खासदार राहुल शेवाळे
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान
आणि मुख्यमंत्र्यांना याविषयी लिहिलेल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी, विविध राज्यांतल्या
लहान मुलांच्या कोरोना संसर्गाची आकडेवारी देऊन, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधलं आहे.
****
नांदेड इथल्या स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त समारंभ येत्या चार मे रोजी होणार
आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे
सकाळी ११ वाजता होणाऱ्या या सभारंभाचं, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर थेट प्रसारण होणार
आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांनी दीक्षान्त समारंभात घरी बसून सहभागी होण्याचं
आवाहन, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment