Saturday, 1 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.05.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक०१ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

आमच्या सर्व श्रोत्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साधेपणानं साजरा करण्याची सूचना.

·      १८ वर्षावरील नागरिकांना आजपासून कोविड लस; तरुणांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये - मुख्यमंत्र्यांचं आवाहन.

·      राज्यात ६२ हजार ९१९ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात १५५ कोविडग्रस्तांचा मृत्यू तर नव्या सात हजार १९७ रुग्णांची नोंद.

·      माजी महाधिवक्ता सोली सोराबजी, ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं कोविड संसर्गानं निधन.

·      राज्यातल्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आजपासून उन्हाळी सुटी.

·      जालना इथं काल स्वच्छतागृहाची टाकी साफ करणाऱ्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू.

आणि

·      कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बीड जिल्हा पोलीस दलातल्या चौघांना पोलीस महासंचालक पदक जाहीर.

****

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यंदा महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारोह कोरोना विषाणू संसर्गामुळे, गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणानं आयोजित करण्याच्या सूचना, सामान्य प्रशासन विभागानं केल्या आहेत. या संबंधी कार्यक्रमात सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.  

औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण विभागीय आयुक्त कार्यालयात, सकाळी आठ वाजता होणार आहे. सध्याची कोविडची परिस्थिती पाहता ध्वजारोहण प्रसंगी माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नसल्याचं, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

१८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांसाठी आजपासून कोविड लसीकरण सुरू होत आहे. राज्यात आज प्रतिकात्मक स्वरूपात छोट्या प्रमाणावर लसीकरण केलं जाईल, केंद्र सरकारकडून कोविड लसींच्या जास्तीत जास्त मात्रा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरळीत होईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, ते काल मुंबईत बोलत होते. लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना दुसरी मात्रा घेणं आवश्यक असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. सध्या लसींचा तुटवडा असल्यानं खाजगी लसीकरण केंद्रांवर लस दिली जाणार नाही, असंही टोपे यांनी नमूद केलं.

****

दरम्यान, १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना आज कोविड लसीची पहिली मात्रा दिली जाणार आहे, अखेरची नाही, त्यामुळे नागरिकांनी विशेषत: तरुणांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून नागरिकांशी बोलत होते. कोविड लसीचा पुरवठा ज्या प्रमाणे होईल, त्यानुसार लसीकरण केलं जाणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या सहा कोटी नागरिकांसाठी, लसीच्या बारा कोटी मात्रा खरेदी करण्याची, आणि लसीकरणाची राज्य सरकारची तयारी आहे. केंद्र सरकारनं पुरेशा मात्रांचा पुरवठा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. प्रत्येक राज्याला लसीकरण नोंदणीसाठी स्वतंत्र ॲप तयार करून, ते मुख्य ॲपशी जोडावं, अशी मागणी केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम राखून, नोंदणी करावी. सध्या मर्यादित क्षमतेत लसीकरण सुरू असून, जुन जुलैपासून लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

****

औरंगाबाद शहरातली तीन आरोग्य केंद्रं आणि जिल्ह्यातल्या काही आरोग्य केंद्रांवर, या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरवात होत आहे. मुकुंदवाडी इथल्या आरोग्य केंद्रावर आज मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता, लसीकरणाचं उद्घाटन होईल. यासाठी लाभार्थ्यांनी कोविन ॲप वर नोंदणी करणं आवश्यक आहे. प्रत्येक केंद्रांवर दररोज नोंदणी केलेल्या १०० जणांचं लसीकरण करण्यात येणार आहे. इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असं महापालिकेनं सांगितलं आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज दुपारी दोन ते सहा यावेळेत लसीकरण होणार आहे. उद्या रविवारी हे लसीकरण बंद राहणार असून, ज्या केंद्रांवर ४५ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण चालू होतं, ती केंद्रं सध्या लसीअभावी बंद राहणार असल्याचं, महापालिकेच्या आरोग्य विभागानं कळवलं आहे.

****

परभणी महानगरपालिकेच्यावतीनं शहरातल्या जायकवाडी आरोग्य केंद्र, खानापूर, इनायत नगर तसंच खंडोबा बाजार इथल्या आरोग्य केंद्रात, आजपासून १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण होणार आहे. इतर आरोग्य केंद्रात लसीकरण होणार नसल्याचं, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी सांगितलं.

****

लातूर इथं आज दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत फक्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्था या एकाच केंद्रावर १८ वर्षावरील २०० नागरिकांना लस दिली जाईल. ज्या नागरिकांनी या केंद्रावर लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे, अशाच नागरिकांना इथं लस दिली जाईल. उर्वरित लसीकरण केंद्र, लस उपलब्ध नसल्यानं, आज बंद राहतील, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या सोमवारपासून पाच ठिकाणी १८ वर्षांवरील नागरिकांचं कोविड लसीकरण केलं जाणार आहे. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय, तसंच तुळजापूर, उमरगा, कळंब आणि परांडा, इथल्या उपजिल्हा रुग्णालयात, परवा सोमवारपासून दररोज प्रत्येकी दोनशे नागरिकांचं, लसीकरण करता येणार आहे.

****

राज्यात काल ६२ हजार ९१९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४६ लाख दोन हजार ४७२ झाली आहे. काल ८२८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ६८ हजार ८१३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. काल ६९ हजार ७१० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३८ लाख ६८ हजार ९७६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८४ पूर्णांक सहा दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल सात हजार १९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५५ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २८, लातूर ३०, बीड २५, नांदेड २१, उस्मानाबाद १९, परभणी १७, जालना दहा, तर हिंगोली जिल्ह्यातल्या पाच रुग्णांचा समावेश आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार २६६ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात एक हजार ५२०, लातूर ९५८, परभणी ९२८, उस्मानाबाद ९००, जालना ६८३, नांदेड ६६५, तर हिंगोली जिल्ह्यात २७७ नवे रुग्ण आढळून आले.

****

देशाचे माजी महाधिवक्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं काल कोविड संसर्गानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. सोराबजी यांनी अनेक प्रतिष्ठीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं होतं. १९९७ साली सोराबजी यांची नायजेरियासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००२ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 

****

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं काल हृदय विकाराच्या झटक्यानं दिल्ली इथं निधन झालं, ते ४२ वर्षांचे होते. गेल्या २४ तारखेपासून ते कोविड संसर्गानं आजारी होते. सरदाना यांना पत्रकारितेतल्या मानाच्या ‘गणेश शंकर विद्यार्थी’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

सोराबजी, तसंच सरदाना यांच्या निधनाबद्दल, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

मिस्टर इंडिया किताब पटकावलेले शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड यांचं, काल बडोद्यात कोविड संसर्गानं निधन झालं, ते ३४ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथले रहिवासी असलेले जगदीश लाड, हे नुकतेच नवी मुंबईतून बडोदा इथं स्थायिक झाले होते.

****

उस्मानाबाद इथले ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार तिलोकचंद बेदमुथा यांचं हैदराबाद इथं निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. कोविडची लागण झाल्यानं त्यांच्यावर हैद्राबाद इथं उपचार सुरू होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.

****

कोविडची सौम्य लक्षणं असल्यास घरीच योग्य खबरदारी घेऊन संसर्गावर मात करणं सहज शक्य असल्याचं, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या शास्त्रीय सल्लागार कार्यालयाकडून, कोविड व्यवस्थापनाबाबत उपाय योजना जारी केल्या आहेत, त्यात सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणासाठी, या कार्यालयानं आवश्यक उपाय सांगितले आहेत. कोविडची प्राथमिक लक्षणं आढळताच, रुग्णांनी विलगीकरण करून घ्यावं, आराम करावा, पेय पदार्थांचं सेवन करत राहावं, खोलीमध्ये हवा खेळती ठेवावी, रक्तातलं प्राणवायूचं प्रमाण, तसंच शरीराचं तापमान सतत तपासत राहावं, मात्र प्राणवायूचं प्रमाण ९२ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास, किंवा ताप उतरत नसल्यास, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं यात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आजपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १४ जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याचं, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी सांगितलं. जून मधली कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती बघून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं जगताप म्हणाले

****

जालना इथं काल स्वच्छतागृहाची टाकी साफ करणाऱ्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. काल सायंकाळी ही दुर्घटना घडली. लुकस गायकवाड, प्रकाश घोडके, बाबा सय्यद बेग अशी मृत कामगारांची नावं आहेत. सोनल नगरातल्या चार खासगी इमारतींसाठी एकच असलेली स्वच्छतागृहाची टाकी साफ करण्यासाठी हे कामगार टाकीत उतरल्यावर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचं, पोलिसांकडून सांगण्यात आलं.

****

कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बीड जिल्हा पोलीस दलातल्या चौघांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालं आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक राजीव तळेकर, पोलीस कर्मचारी शेख सलीम शेख हबीब, मीरा रेडेकर आणि मनोज वाघ यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक आर. रामास्वामी यांनी या सर्वांचं अभिनंदन केलं आहे.

****

बीड जिल्हा वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यासंदर्भात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असल्याचं, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी म्हटलं आहे. बीड जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात, प्राणवायू प्रकल्प सुरू झाले आहेत, जिल्ह्यात तालुकास्तरावरील अन्य प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती, जिल्हाधिकारी जगताप यांनी दिली. ते म्हणाले –

त्याच्या साथीला दोन नवे ऑक्सिजन प्लांट घेतोय. १७५ जम्बो पर डे ऑक्सिजनची क्षमता असेल. त्यानंतर लोखंडी सावरगावचे ठिकाणी, वुमन्स हॉस्पिटल आपण प्रत्येकी एक १७५ जम्बो पर डे या कॅपिसिटीचे दोन घेतोय. आणि प्रत्येक सब डिस्ट्रीक हॉस्पिटलला तालुक्याच्या पाच ठिकाणी आपण त्याच प्रकारचा एक प्लांट उभारतोय. म्हणजे आज जी आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय ती भविष्यात आपल्याला जाणवणारी नाही. आणि स्वयंपूर्णतेकडे जिल्ह्याला वाटचाल करता येईल असं प्लानिंग आता केलेलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोविड उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस, दोन कोटी रुपये मदत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये, तर राज्यातले सर्व विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्यांचं एक महिन्याचं वेतन, असे एकूण दोन कोटी रुपये मदत देत असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध असल्याचं, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

लातूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन, काँग्रेस पक्षाकडे सुपूर्द केलं आहे. या निधीतून, शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले कोविड बाधीत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना, भोजन पुरवण्यात येणार आहे. लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विधीज्ञ किरण जाधव यांनी ही माहिती दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं, आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकारातून, सुसज्ज असं कोविड रुग्णालय उभारण्यात आलं आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, काल सकाळी ऑनलाईन पद्धतीनं या रुग्णालयाचं उदघाटन झालं. स्वतंत्र प्राणवायू प्रकल्प असलेल्या या रुग्णालयात, २० अतिदक्षता सेवेच्या रुग्णखाटा, तर ८० प्राणवायू सुविधा असलेल्या रुग्णखाटा उपलब्ध आहेत.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथल्या सवंगडी कट्टा या समूहातल्या तरुणांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत औषधं दिली आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –

विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तरुणांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, वेपोरायझर आदी चाळीस हजार रुपयांची औषधे दिली. या संदर्भात सवंगडी कट्ट्याचे रमेश औसेकर म्हणाले, “गेल्या सात वर्षापासून आमचा २५ ते ३० तरुणांचा ग्रुप सवंगडी कट्ट्याच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभाग घेतो. कोरोना सेंटरवर औषधी नसल्याचे समजल्यावरून तिथे सुमारे चाळीस हजारांची औषधे देण्यात आली. त्यातून आम्हा तरुणांना वेगळा आनंद मिळतो.” सवंगडी कट्ट्याच्या तरुणांचे कार्य अन्य तरुणांसाठी दिशादर्शक होय.

आकाशवाणी बातम्यांसाठी, परभणीहून विनोद कापसीकर

****

लातूर इथल्या सिद्धेश्वर देवस्थानाच्या सभागृहात उभारण्यात आलेलं जंबो कोविड सुश्रुषा केंद्र आजपासून कार्यान्वित होत आहे. याठिकाणी प्राणवायू सुविधेसह १०० रुग्णखाटा, रुग्णांना दोन वेळा भोजन, नाष्टा यासह अन्य सुविधा पूर्णरित्या मोफत असतील. पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल या केंद्राला भेट सर्व सुविधांचा आढावा घेतला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, उस्मानाबाद शहरात एक हजार रुग्ण खाटांचं जम्बो कोविड सुश्रुषा केंद्र सुरू करावं, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 06.40 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 August 2025 Time 6.40 AM to 6.50 AM Language Marathi आकाशवाणी ...