Monday, 24 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.05.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक२४ मे २०२ सकाळी ७.१० मि.

कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      बारावीच्या परीक्षा घेण्यासंदर्भातलं चित्र येत्या एक जूनपर्यंत स्पष्ट होणार; दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम.

·      राज्याच्या ३६ पैकी १५ जिल्ह्यांत कडक टाळेबंदी करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत.

·      बालकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यास, घरी कोणतीही औषधी न देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पालकांना सल्ला.

·      राज्यात २६ हजार ६७२ नवीन कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात १०२ जणांचा मृत्यू तर तीन हजार १९६ बाधित.

आणि

·      मान्सून तळकोकणात १० जून पर्यंत दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज.

****

इयत्ता बारावीच्या परीक्षा घेण्यासंदर्भातलं चित्र येत्या एक जूनपर्यंत स्पष्ट होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, काल केंद्रीय शिक्षण मंडळ -सी.बी.एस.ई. सह विविध राज्यांच्या शिक्षण मंडळांची बैठक झाली. बारावी तसंच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा झाली. विविध राज्यांकडून उद्या मंगळवारपर्यंत याबाबत सूचना आणि मतं मागवण्यात आली आहेत. ती विचारात घेऊन येत्या एक जूनपर्यंत याबाबत माहिती दिली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्यासह, विविध राज्यांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीनंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही, याची ग्वाही दिली. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि हित लक्षात घेऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून, येत्या दोन-तीन दिवसात बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल, असं गायकवाड यांनी सांगितलं.

दरम्यान, दहावीची परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं. दहावीची लेखी परिक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेणं शक्य नाही, त्यासाठीचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलं जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

राज्याच्या ३६ पैकी १५ जिल्ह्यांत कडक टाळेबंदी करण्याचे संकेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, बीड सोबतच विदर्भात यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, गडचिरोली यासह, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, सोलापूर, तर कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा, यात समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांत कोविडबाधितांची संख्या आणि होणारे मृत्यू वाढत असल्यानं, कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी कडक टाळेबंदी आवश्यक आहे. मुंबईसह राज्याच्या काही भागात कोरोनाग्रस्तांची संख्या घटत असून, ही समाधानाची बाब आहे, त्यामुळे कोविड संसर्ग साखळी तोडण्यात मुंबईचं अनुकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

****

बालकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यास पालकांनी त्यांना घरी कोणतीही औषधी दे नये, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असण्याच्या पार्श्वभूमीवर, लहान मुलांकरता स्थापन केलेल्या कृती दलाशी, मुख्यमंत्र्यांनी काल ऑनलाईन संवाद साधला. राज्यभरातले बालरोग तज्ज्ञ या संवादात सहभागी झाले होते. बालकांना या लाटेत कोरोना विषाणूची बाधा झाल्यास, पालकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. लहान मुलांवर उपचारादरम्यान, अनावश्यक औषधांचा भडिमार करु नये, या साथीबाबत बालरोग तज्ज्ञांनी पालकांना मार्गदर्शन करावं, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची सर्वतोपरी तयारी करण्यात येत असून, कोणत्याही संसाधनांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी काम सुरू असल्याचं ते म्हणाले.

या बैठकीत बालरोग तज्ञ कृती दलानं राज्यातल्या सहा हजार बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. मुलांमध्ये संसर्ग कसा ओळखावा, सीटी स्कॅन सरसकट मुलांमध्ये करू नये, सहव्याधी असलेल्या मुलांवर उपचार कसे करावेत, याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

****

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या पी.पी.ई.कीटमध्ये सुधारणा करुन, निहालसिंग आदर्श या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानं, ‘हवेशीर पी.पी.ई. कीट-कोव्ह टेक व्हेंटीलेशन’, बनवण्यात यश मिळवलं आहे. मुंबईच्या के.जे.सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात, द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत असलेल्या निहालसिंग याने तयार केलेल्या या पी.पी.ई. कीटला, पट्ट्याच्या स्वरुपात जोडता येणाऱ्या एका उपकरणाद्वारे हवा खेळती राहिल्यानं, अस्वस्थता जाणवत नाही, त्यासोबतच विविध बुरशी आणि अन्य संसर्गापासूनही बचाव होतो.

****

भारतीय नौदलाचं आय. एन. एस. त्रिखंड हे जहाज ४० मेट्रीक टन प्राणवायू घेऊन, कतारहून काल मुंबईत दाखल झालं. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला आतापर्यंत, १७० मेट्रीक टन वैद्यकीय साहित्य पुरवलं आहे. त्यात चाचणी उपकरणं, पी.पी.ई.कीट, रुग्णालयातल्या खाटा आणि ऑक्सीजन कॉन्संटेटर्सचा समावेश आहे.

****

धुळे जिल्हा रुग्णालयातल्या परिचारीका रुग्णसेवा देत असतांनाच, अधिपरिचारिका प्रतिभा घोडके यांच्या संकल्पनेतून, माणुसकीच्या भावनेतून गरजू महिलांसाठी ‘फूड बँक’ सुरू केली आहे. या फूड बँकेत सर्व परिचारिका आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, डॉक्टर यांनी सढळ हाताने मदत केल्यामुळे, विविध प्रकारचे धान्य, किराणा साहित्य गोळा करण्यात येते. याविषयी प्रतिभा घोडके यांनी आकाशवाणीला दिलेली ही माहिती –

ह्या कोविड काळामधे बऱ्याच लोकांचं हातावरचं काम गेलेलं आहे. त्यांच्या घरातली बऱ्याच लोकांची चूल पेटलेली नव्हती. आणि ही सगळी दशा बघून मनाला कुठेतरी असं खंत वाटत होती की, यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि बऱ्याच लोकांपर्यंत जसं जसं ही फूट बँकची माहिती जाते तसं तसं अन्न संकलन फूड बँकेमधे होत आहे. आणि आम्ही ते करत आहोत. आणि हे संकलन जे झालेलं आहे, यात चहा झालं, साखर झालं, डाळीसाळी झाल्या, पुन्हा तेल झालं ज्या घरात गरजेपुरत्या वस्तू असतात, ह्या आमच्याकडे संकलन झालं आणि त्याच्या आम्ही कीट तयार केल्या आणि जवळजवळ १००-१२५ कीट आतापर्यंत गरीब जनतेमधे वाटलेल्या आहेत. आणि यंग फाऊंडेशनतर्फे त्यांनी आम्हाला सॅनिटरी पॅड दिले होते वाटण्यासाठी तर ते देखील आम्ही त्या महिलांपर्यंत ते पोहोचवलेले आहेत.

****

राज्यात काल २६ हजार ६७२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५५ लाख ७९ हजार ८९७ झाली आहे. काल ५९४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, हजार ६२० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५ शतांश टक्के झाला आहे. काल २९ हजार १७७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५१ लाख ४० हजार २७२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ४८ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल तीन हजार १९६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०२ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २४, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी २३, उस्मानाबाद १२, परभणी आठ, नांदेड सात, जालना चार, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ९६२ रुग्ण आढळले. परभणी ५४०, जालना ४१७, उस्मानाबाद ३९२, औरंगाबाद ३७७, लातूर ३२४, नांदेड १०३ तर हिंगोली जिल्ह्यात ८१ रुग्ण आढळून आले.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड इथं येत्या पाच जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे निमंत्रक आमदार विनायक मेटे यांनी, काल बीड इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारच जबाबदार असल्याची टीका मेटे यांनी केली. समाजानं मूक मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई लढली, मात्र अद्यापही हाती काहीच न पडल्यानं, आता मराठा क्रांती संघर्ष मोर्चा - लढा आरक्षणाचा, हे आंदोलन सुरू केलं आहे. याचाच पहिला भाग म्हणून बीड इथं मोर्चा काढला जाणार आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोर्चात शंभर टक्के खबरदारी घेण्यात येणार असल्याचं, मेटे यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठीच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोक्रा अंतर्गत, संपूर्ण राज्यात वैयक्तिक लाभ श्रेणीत उस्मानाबाद तालुक्यानं, दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्यातल्या १५ जिल्ह्यातल्या तालुक्यांचा सामावेश असलेल्या या प्रकल्पातून, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं, बदलत्या हवामानाला जुळवुन घेत शेती आणि पुरक व्यावसाय किफायतशिर करण्यासाठी, या प्रकल्पातून वैयक्तिक आणि सामुदायिक घटकांना लाभ दिला जातो. या प्रकल्पात उस्मानाबाद तालुक्यातल्या एकूण ४८ गावांचा समावेश आहे.

****

सातारा जिल्ह्यात कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरात, काल सकाळी नऊ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता, तीन पूर्णांक तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे कोणतीही कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. गेल्या दोन महिन्यांमध्ये कोयना धरण परिसरात बसलेला हा भूकंपाचा तिसरा धक्का आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही काल देवरूख परिसर आणि संगमेश्वर तालुक्यात साडवली, कडवई परिसरात भूकंपाचेक्के जाणवले.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड प्रादुर्भावाच्या परिस्थितीत ब्रेक द चेन नियमावलीची अंमलबजावणी करतांना, ऑटो रिक्षा चालकांना दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान दिलं जात आहे. त्यानुसार चालकांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा होणार आहे. परवाधारक अॅटोरिक्षा चालकांनी आपल्या मोबाईल किंवा सी एस सी केंदावरून आपली वैयक्तिक माहिती, परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवावी असं आवाहन, नांदेड उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

कोरोनाविषाणू संसर्गाची तिसरी लाट ही लहान मुलांना बाधीत करणारी असेल असं भाकित व्यक्त केलं जात आहे. ही लाट येण्यापूर्वी लहान मुलांच्या पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे, या विषयी नांदेड शहरातले नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉ. अशोक मोरे यांनी दिलेली ही माहिती –

तिसऱ्या लाटेमधे प्रेडीक्शन आहे का जास्तीत जास्त ॲफेक्ट होणार जी होणार आहेत ही लहान मुले होणार आहेत. तर सर्वात पहिल्यांदा घरातली जी मोठी माणसं आहेत, अठरा वर्षाच्या समोरची त्या सर्वांनी जी लस मिळेल ती लस घेऊन स्वतःच व्हॅक्सिनेशन करणे. जेणेकरून आपण आपल्या मुलांना इन्फेक्ट करणार नाही कोविडपासून. जी आई बाळांना दूध पाजते, ती देखील कोविडचं व्हॅक्सिन घेऊ शकते. मुलांनी बीसीजी, एमएमआय, फ्ल्यू ही व्हॅक्सिन घ्यावी. प्रुव्ह झालंय हे पार्शली प्रोटेक्ट करायला लागलेत आपल्या बाळांना कोविडपासून. आपल्या घरातल्या मोठ्या माणसांचं व्हॅक्सिनेशन आणि मुलांचं राहिलेलं व्हॅक्सिनेशन हे फार महत्वाचं आहे तिसरी लाट येण्याच्या अगोदर.

****

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कथित कंत्राटी आरोग्य कामगारांना शासकीय सेवा भरती प्रक्रियेत सामावून घेण्याची मागणी, कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकनं केली आहे. याबाबतचं निवेदन आमदार संजय शिरसाठ, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह खासदार इम्तियाज जलील यांना देण्यात आलं. औरंगाबादसह आसपासच्या आठ जिल्ह्यांत कोरोना काळात जीव धोक्यात घालून असे कामगार सेवा बजावत असल्यानं, त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता या निवेदनात मांडण्यात आली आहे.

****

परभणी शहरातल्या तिन्ही कोवीड केंद्रांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व्यवस्था बघणाऱ्या कोरोना योद्धांचा, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला. आमदार पाटील यांच्या पुढाकारातून याठिकाणी गेल्या एक मे पासून, सकाळ - संध्याकाळ भोजन व्यवस्थेचं काम केलं जात आहे.

दरम्यान, परभणी इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानतर्फे पोटभर जेवण ही संकल्पना राबवण्यात येत आहे. काल या संघटनेच्या वतीनं औरंगाबाद इथं घाटी रुग्णालय परिसरात, २०० गरजू लोकांना भोजन आणि पाणी पुरवण्यात आलं.

****

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे माजी संगीत विभाग प्रमुख, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित यशवंत क्षीरसागर, यांचं शनिवारी वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. त्यांनी औरंगाबादसह पुणे तसंच सांगली आकाशवाणी केंद्रातही काम केलं होतं. गायनासोबतच संगीत विषयक लिखाण आणि मराठवाडा परफॉर्मिंग आर्ट सेंटरच्या माध्यमातून, त्यांनी संगीत प्रचार-प्रसाराचं कार्य केलं. आकाशवाणीत रूजू होण्यापूर्वी ते सातारा जिल्ह्यात फलटण इथं शिक्षक होते. पंडीत जसराज यांच्याकडून त्यांनी काही काळ गाण्याचं शिक्षण घेतलं होतं.

****

लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक उद्धवराव सूर्यवंशी यांचं काल निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. स्वातंत्र्य लढ्यातल्या योगदानानंतर त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे यांच्यासह ग्रामविकास चळवळीत काम केलं होतं.

****

बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात किट्टी आडगाव इथं काल सकाळी शॉर्टसर्किटमुळं घराला आग लागून, आई आणि मुलीचा मृत्यू झाला. घरातल्या विद्युत उपकरणातील विद्युत प्रवाह घराच्या पत्र्यामध्ये उतरला आणि त्याला स्पर्श होऊन मुलगी पत्र्याला चिकटली, आणि तिला सोडवण्याचा प्रयत्न केला असता आईलाही विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत घराला आग लागून दोघींचाही होरपळून मृत्यू झाला.

****

हिंगोली जिल्ह्यातले शिवसेनेचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते तथा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट प्रल्हादराव उमरेकर-वाबळे, यांचं काल पहाटे निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर उमरा वाबळे या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

****

अंदमान निकोबार द्विपसमूहात दाखल झालेला मान्सून बंगालच्या खाडीत वायव्य दिशेनं पुढे सरकला आहे. केरळमध्ये पूर्वमोसमी पाऊस सुरु आहे. मान्सून दाखल होईपर्यंत तो सुरु राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मान्सून तळकोकणात १० जून पर्यंत पोहोचेल, त्यानंतर तो संपूर्ण राज्यात सक्रीय होईल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना ‘यास’चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड- संत्रागाछी - नांदेड एक्स्प्रेसची उद्या २४ मे आणि परतीची २६ मे रोजीची फेरी रद्द केली आहे.

****

No comments: