Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 July 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथील जरी झाले
असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका - तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड
-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय
मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** यंत्रणांनी पूर परिस्थीतीमध्ये
सतर्क राहाण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश
** पावसामुळे प्रामुख्यानं
परभणी, नांदेड जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत
** कोरोना विषाणू संसर्गाचे
बीडमध्ये १६० तर जालन्यामध्ये सात नवे रुग्ण, औरंगाबादमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू
आणि
** मुंबईचे माजी पोलीस आयुक्त
परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
****
गेल्या चोवीस तासांत अतीवृष्टीमुळे
विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागानं पुढील तीन दिवस
कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती
व्यवस्थापन यंत्रणा तसंच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश
दिले आहेत. त्याच प्रमाणं नद्यांच्या पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं या भागात राहणाऱ्या
नागरिकांनी सतर्क राहाण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
मुंबईतल्या कसारा इगतपुरी
दरम्यान दरडी कोसळल्यानं त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आज मुंबई - जालना
जनशताब्दी, मुंबई- हैदराबाद, मुंबई -भुवनेश्वर, नांदेड- मुंबई आणि मुंबई -नांदेड या
रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचं रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात
मुसळधार पावसामुळे परभणी ते जिंतूर या महामार्गावर करपरा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे
या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली असून करवली या गावाचा संपर्क तुटला आहे. जिंतूर
ते पाचलेगाव दरम्यान उलटी नदीस पूर आल्यानं या मार्गावरची वाहतूकही ठप्प झाली आहे.
वरुड ते आकोली दरम्यान एका नाल्यावरचा कोल्हापूर बंधारा पुराच्या पाण्यानं वाहून गेल्यानं
बंधारा लगतच्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं त्यामुळे खरीप पिकांचं अतोनात नुकसान
झालं आहे. दरम्यान, जिंतूर शहरातल्या सखल भागात सुद्धा पाणी शिरलं आहे. वरुड नृसिंह
मंदिराच्या पायरी पर्यंत पाणी साचलं, तसंच सटवाई मंदिर परिसरातील दुकानांत पाणी शिरल्यानं
अनेक दुकानदाराचं नुकसान झालं आहे. उस्मानाबाद
जिल्ह्यात आतापर्यंत ३३५ पूर्णांक आठ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक
३७७ मिलिमीटर पाऊस भूम तालुक्यात तर सर्वात कमी वाशी तालुक्यात २८९ मिलामिटर पावसाची
नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात ८० पैकी
२४ महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. किनवट तालुक्यातील जलधारा इथं सर्वाधिक
२०७ पूर्णांक ५० शतांश मिलीमीटर पाऊस झाला आहे. ईसलापूर १७५, शिवणी १७४, बोधडी १४९
तर किनवट इथं १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भोकर, हिमायतनगर, माहूर, बिलोली,
हदगाव, लोहा हे तालूके आधिक प्रभावी झाले आहेत. या भागात नदीनाल्यांना पूर आल्यानं
अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. शेकडो हेक्टर शेतजमीनीवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत
तसंच घरांची पडझड झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना जिल्ह्यात काही भागात
आज सकाळी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये
५० पूर्णांक ९० शतांश मिलीमीटर पाऊस झाला असून, जिल्ह्यातल्या १२ महसूल मंडळांमध्ये
अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ६०३ पूर्णांक १० शतांश
मिलीमीटर असून, आजपर्यंत ४५३ पूर्णांक ८० शतांश मिलीमीटर पाऊस झाला आहे.
****
बीड जिल्ह्यात आज १६० नवे
कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. यामध्ये आष्टी ५५, बीड ३१, पाटोदा १४, केज १३, शिरुर
१२, गेवराई ११, धारुर १०, वडवणी सात अंबाजोगाई माजलगाव प्रत्येकी तीन, आणि परळी इथल्या
एका रुग्णाचा समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात
सात नवीन कोरोना विषाणूबाधीत रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात या संसर्गाच्या एकूण रुग्णांची
संख्या आता ६१ हजार ३७२ झाली आहे. संसर्गमुक्त झालेल्या सात रुग्णांना आज सुटी देण्यात
आली. आतापर्यंत जिल्ह्यातले ६० हजार १४० रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत तर सध्या ५६ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन
कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत
तीन हजार ७८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या
एक लाख ४७ हजार ८२ झाली असून एक लाख ४३ हजार ३२९ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाची
तिसरी लाट येण्याचा धोका कायम असल्याचं सांगून ही लाट थोपवण्यासाठी सतत जागरूक राहून
मास्कचा वापर, परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणं आदी कोविड नियमांचं पालन करणं आवश्यक
असल्याचं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज मुंबईत दहिसर
विधानसभा क्षेत्रातल्या ४५ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करताना बोलत होते.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त
परमबीर सिंह यांच्या विरोधात मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सहा पोलीस आणि दोन इतर, अशा आठ जणांचा
समावेश आहे. श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह, पोलिस उपायुक्त
अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे,
संजय पाटील तसंच इतर सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या गुन्ह्यातल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारनं मागील
आठवड्यात परमबीर सिंह यांच्या विरोधातल्या तक्रारींचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला
करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्यावर
पैसे घेणं आणि पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप
केला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व
बाजारपेठा सकाळी सात ते रात्री सात आणि शनिवार, रविवारी पूर्णपणे सुरु ठेवण्याची परवानगी
द्यावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघानं केली आहे. जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या
अतिशय कमी असल्याचं नमुद करताना कोरोना संक्रमण परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं संघटनेनं
म्हटलं आहे. डेल्टा प्लस कोरोनाचा कोणताही रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळला नसल्यानं
निर्बंधाद्वारे व्यापारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांना
वेठीस धरू नये, असंही महासंघानं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पशुपालन
दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाच्या पशूसंवर्धन विषयक पायाभूत सुविधा विकास
निधी उपयुक्त असून जिल्ह्यातल्या इच्छूक व्यावसायिक, उद्योजक आणि संस्थांनी या योजनेचा
लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.
****
परभणी इथल्या पाथरी तालुक्यातील
रेणूका साखर कारखाना कार्यान्वित करावा आणि त्याद्वारे ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा,
या मागणीसाठी आज कारखाना शेतकरी संघर्ष बचाव समितीतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून
निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी या कारखान्याच्या जमीनी बळकवण्या संदर्भात
काहींनी सुरु केलेल्या हालचाली निषेधार्ह असुन शेतकरी हितासाठी कारखाना सुरु करावा,
असंही आंदोलनकर्ते यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या
शिक्षण सभापतीपदी वसमत तालुक्यातल्या बाबुळगाव गटातले महादेवआप्पा एकलारे यांची निवड
झाली आहे. त्यांना २९ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी कैलास साळुंके यांना २१ मते मिळाली
आहेत. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्य सभागृहात सध्या ५० सदस्य आहेत. यावेळी उपविभागीय
अधिकारी अतुल चोरमारे हे पीठासीन अधिकारी होते.
//**********//
No comments:
Post a Comment