Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 July 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जुलै २०२१ दुपारी १.०० वा.
****
पेगासस आणि
कृषी कायद्यातल्या सुधारणांसह विरोधकांनी विविध मुद्यांवरुन केलेल्या गदारोळामुळे आज
संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस,
तृणमुल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे यासह इतर विरोधी
पक्ष सदस्यांनी, घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या गोंधळातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी
प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र गदारोळ वाढतच गेल्यानं, कामकाज
एका तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह यांनी, अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक सादर केलं. मात्र त्यानंतरही विरोधकांचा
गोंधळ सुरुच राहिल्यानं, कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेतही
कामकाज सुरु होताच विरोधकांनी अनेक मुद्यांवरुन केलेल्या गदारोळामुळे सभापती एम व्यंकय्या
नायडू यांनी सदनाचं कामकाज आधी एका तासासाठी नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
****
राज्यात
अनेक भागात आज जोरदार पाऊस सुरु आहे.
अतिवृष्टीमुळे
रत्नागिरी जिल्ह्यात खेड आणि चिपळूण तालुक्यात परिस्थिती गंभीर बनली आहे. चिपळूणमध्ये
अनेक इमारतींना वाशिष्ठी नदीच्या पुरानं वेढा दिला आहे. रत्नागिरीतून तीन बोटी बचाव
कार्यासाठी पाठवण्यात आल्या असून, पुण्यातूनही राष्ट्रीय आपत्ती निवारण दल - एनडीआरएफच्या
दोन तुकड्या खेड आणि चिपळूणसाठी रवाना झाल्या आहेत. तटरक्षक दलाला हेलिकॉप्टरच्या मदतीसाठी
समन्वय साधण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
झाली आहे. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक बंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्याच्या
भोकर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. बटाळा ते रेणापूर
आणि कोळगाव ते नांदा गावची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रावणगाव, पाळज आदी गावात नदीचं
पाणी शिरलं आहे. भोकर तालुक्यातल्या पूर परिस्थितीवर नागरिकांनी पूराच्या पाण्यातून
वाहनं, गुरे नेण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे
यांनी केलं आहे.
परभणी जिल्ह्यात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतून जाणाऱ्या पिंगळगड नाल्यास मुसळधार पावसानं
मोठा पूर आला आहे. त्यामुळे विद्यापीठातून सायाळा आणि अन्य खेड्यापाड्यांचा जाणारा
रस्ता पूर्णतः ठप्प झाला आहे. लोअर दुधना सिंचन प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर दुधना
नदी पात्रात पाणी सोडलं जात आहे.
मुंबईत सलग
आज सहाव्या दिवशी पाऊस सुरु आहे. कर्जत, कसारा, बदलापूर या भागात मुसळधार पाऊस कोसळत
असून, कसारा इगतपुरी दरम्यान दरडी कोसळल्या आहेत. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला
आहे.
आज मुंबई-जालना
जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई- हैदराबाद, मुंबई-भुवनेश्वर, नांदेड- मुंबई आणि मुंबई-नांदेड
या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क
कार्यालयानं ही माहिती दिली.
नाशिक जिल्ह्यात
इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाड परिसरात जोरदार पाऊस झाला. रात्री झालेल्या
जोरदार पावसाने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. निफाड तालुक्यातल्या नांदूर
मधमेश्वर बंधाऱ्यातून तीन हजार १५५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा गोदावरीच्या पात्रात
विसर्ग करण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या
पुसद उपविभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उमरखेड पुसद दरम्यान लोनाडी नाल्याला
पूर आला आहे. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं दहागाव जवळ वाहतूक बंद पडली
आहे.
रायगडमध्ये
कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सावित्री आणि काळ नद्यांचे
पाणी महाडमध्ये घुसल्यानं महाड शहर पाण्याखाली गेलं आहे.
****
देशात आतापर्यंत
कोविड प्रतिबंधक लसीच्या ४१ कोटी ७८ लाख ५१ हजार १५१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात चार कोटी
एक लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे. काल राज्यभरात एक हजार ४८२ लसीकरण सत्रांच्या
माध्यमातून, एक लाख ८९ हजार ७३३ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.
****
देशात काल
नव्या ४१ हजार ३८३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५०७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी १२ लाख ५७ हजार ७२० झाली
असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख १८ हजार ९८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल
३८ हजार ६६० रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी चार लाख २९ हजार ३३९ रुग्ण कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख नऊ हजार ३९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
ऑलिम्पिक
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उद्या टोकियोमध्ये होत आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे
साडेचार वाजता हा बहुप्रतीक्षित सोहळा होणार आहे. मात्र, कोविडच्या साथीमुळे नेहमीच्या
भव्यतेचा यंदा अभाव असणार आहे.
****
No comments:
Post a Comment