Thursday, 22 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.07.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 July 2021

Time 7.10AM to 7.20AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात सर्वदूर पाऊस, मराठवाड्यात नांदेड, औरंगाबाद, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाची संततधार.

·      जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये आज जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज.

·      कोविडमुळे नगरपालिका, नगर पंचायतीतल्या मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना, ५० लाख रुपयांचा विमा देण्यासंदर्भात पाच ऑगस्ट पर्यंत निर्णय घेण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश.

·      दुसऱ्या लाटेत राज्यात एकाही कोविड बाधित रुग्णाचा प्राणवायू अभावी मृत्यू झाला नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण.

·      संकेतस्थळ बंद पडल्यानं अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा नोंदणी तूर्तास बंद.

आणि

·      राज्यात ८ हजार १५९ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात दोन मृत्यू तर ३७५ बाधित.

****

राज्यात काल सर्वदूर जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात नांदेड, औरंगाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काल पावसाची संततधार सुरू होती.

नांदेड जिल्ह्यात काल दिवसभऱ पावसाच्या सरी कोसळत होत्या. हा पाऊस पिकांबरोबरच जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी उपयुक्त असल्याचं शेती तज्ञांनी म्हटलं आहे. कांही भागात नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. नांदेड - किनवट रस्त्यावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती.

परभणी शहरासह पूर्णा, गंगाखेड, पालम, सोनपेठ, जिंतूर, मानवत, पाथरी आणि सेलू शहरासह तालुक्यात काल सर्वत्र पाऊस झाला. मानवत तालुक्यात जोरदार पावसानं नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. लोअर दूधना सिंचन प्रकल्पाच्या चार दरवाजातून चार हजार १६४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग दूधना नदीच्या पात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.

जालना जिल्ह्यातही भोकरदन, बदनापूर, अंबड आणि घनसावंगी तालुक्यात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही भागात शेतामध्ये पाणी साचलं तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आले.

हिंगोली जिल्ह्यातही काल पावसानं जोरदार हजेरी लावली. कळमनुरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे येलकी इथल्या ओढ्याला पूर आल्यामुळे बेलथर, कसबे धावंडा, गोटेवाडी, येलकी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता, आणि या गावांचा संपर्कही तुटला होता.

औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. पैठण तालुक्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं, काल ४८५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं. धरणाचा साठा ३५ पूर्णांक ५९ टक्के झाला आहे, अशी माहिती गोदावरी पाटबंधारे विभागानं दिली आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून, जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात भंडारदरा, पाचनई आणि कुमशेत या भागात काल संततधार सुरू होती. तर उर्वरित जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून, पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर आलं आहे. काही दिवस जिल्ह्याला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणात ३३ हजार ९१४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.

सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या अहिल्या पुलावरुन नदीत पडून दोन जणांचा मृत्यू झाला. दुचाकीवरुन हे दोघं पंढरपूरकडे जात असताना पुलावरील सुरक्षा कठड्याला धडकून हा अपघात झाला.

रायगड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांना पूर आले असून, सावित्री, काळ, कुंडलिका, अंबा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

****

हवामान खात्यानं आज पुणे, कोल्हापूर, रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबरोबरच मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदूर्ग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबईच्या क्षेत्रीय हवामान केंद्राचे प्रमुख जयंत सरकार यांनी व्यक्त केली आहे.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्यातल्या नगरपालिका, नगर पंचायतीतल्या मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांचा विमा देण्यासंदर्भात पाच ऑगस्ट पर्यंत निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करणारी याचिका राज्य नगर परिषद, नगर पंचायत, संवर्ग कर्मचारी संघटनेनं न्यायालयात दाखल केली आहे. यावर सुनावणी करतांना न्यायालयानं हे निर्देश दिले. सरकारनं यासंदर्भात निर्णय न घेतल्यास पाच ऑगस्टला राज्याच्या मुख्य सचिवांनी खंडपीठात व्यक्तीश: उपस्थित राहून आपली बाजू मांडावी, असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.

****

राज्यात लसीकरणाचा वेग वाढला की टप्प्याटप्प्यानं शिथिलिकरणाचा वेगही वाढवला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या सामान्य नागरिकांना, उपनगरी रेल्वेतून प्रवास करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, मुख्यमंत्री लवकरच या विषयी निर्णय घेतील, असंही ते म्हणाले. भारतीय औषध संशोधन परिषदेनं कोविड नियमांबद्दल अधिक मार्गदर्शन करावं, जेणेकरून कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण ठेवणं अधिक सोपं जाईल, असंही ते म्हणाले. ७० टक्क्यांच्यावर लसीकरण झालं, तरंच सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊन या संसर्गावर विजय मिळवता येईल, चौथ्या सेरो सर्वेक्षणात लहान मुलांना धोका कमी असल्याचा निष्कर्ष दिलासादायक बाब असल्याचं, टोपे म्हणाले.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारनं आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करावी, या मागणीच्या अनुषंगानं, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नवी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या, आणि याबाबत चर्चा केली. राज्यांना केवळ सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार देऊन उपयोग नाही, तर सोबतच आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथील करण्यात यावी, अशी महाविकास आघाडीची मागणी आहे. चव्हाण यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याशी काल चर्चा केली.

****

राज्यातलं वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी, सरकार इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन आणि प्राधान्य देणार असल्याची माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ‘फिटवेल मोबिलीटी प्रायव्हेट लिमिटेड’च्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांसाठीच्या, इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर गाड्यांच्या वितरण सेवेचं, काल पिंपरी-चिंचवड इथं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही वर्षापासून पिंपरी-चिंचवड एमआयडीसी ॲटो हब म्हणून ओळखली जाते, आता इलेक्ट्रीक वाहनांचं विक्री हब म्हणून या शहराला नवीन ओळख मिळेल, असंही पवार म्हणाले.

****

अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा - सीईटीसाठी नाव नोंदणी बुधवारपासून सुरु झाली, मात्र पहिल्याच दिवशी वेबसाईट बंद पडल्यानं, ही नोंदणी तूर्तास बंद झाली आहे. परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ दिला जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

****

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधल्या जलयुक्त शिवार योजनेतल्या एक हजार कामांपैकी ९०० कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची शिफारस माजी सचिव विजय कुमार यांच्या समितीनं केली आहे. या समितीनं काल आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. जलयुक्त शिवार योजना अयशस्वी झाल्याचं नियंत्रक आणि महालेखापाल - कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं, त्यानंतर ही चौकशी समिती नेमण्यात आली होती.

****

ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळ जोडणी द्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी, जल जीवन मिशन अंतर्गत आजपासून सात ऑगस्टपर्यंत, राज्यात गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये गावपातळीवर नळ जोडणीचा कृती आराखडा तयार करण्यात येईल. यासाठी आजपासून संबंधितांना गाव कृती आराखडा बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर ग्रामस्तरावर एक ते तीन ऑगस्ट या कालावधीत, गाव कृती आराखडाच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करून संकलित करण्यात येईल, त्यानंतर पाच ते सात ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखडाची निर्मिती आणि पडताळणी केली जाईल. त्यानंतर येत्या स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये हा आराखडा मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात एकाही कोविड बाधित रुग्णाचा प्राणवायू अभावी मृत्यू झाला नसल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. देशात प्राणवायू अभावी एकाचाही मृत्यू झालेला नाही, असं केंद्र सरकारनं मंगळवारी संसदेत सांगितलं होतं. त्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात प्राणवायू अभावी मृत्यू झाला नसल्याचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

वॉर्डावॉर्डात आपण ऑक्सिजन सिस्टम नावाचा एक नवीन कन्सेप्ट तयार केला की ज्यामुळे खऱ्या अर्थाने कुठेही ऑक्सिजन वाया जाता कामा नये, कुठेही लिकेजमधे वाया जाता कामा नये. सतराशे मेट्रीक टन वर आपण आपण हा ऑक्सिजनचं व्यवस्थापन करू शकलो. ज्यामधे तीन-साडेतीनशे मेट्रीक टन ऑक्सिजन केंद्र सरकारने आपल्या आजूबाजूच्या राज्यातून उपलब्ध करून दिला. नासिकमधे एक घटना घडली ती ऑक्सिजनच्या लिकेजच्या कारणाने झालेली आहे. ऑक्सिजन कमी पडलं म्हणजे ऑक्सिजन त्या ठिकाणी उपलब्धच नाहीये अशी काही कारणं होती. त्यामुळे जे काही आम्ही ॲफिडेव्हिट केलेलं आहे कोर्टामधे त्याच्यात फार स्पष्ट लिहिलं आहे की, ऑक्सिजनमुळे मृत्यू झालेला नाही.

****

राज्यात काल ८ हजार १५९ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ३७ हजार ७५५ झाली आहे. काल १६५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३० हजार ९१८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ९ शतांश टक्के झाला आहे. काल ७ हजार ८३९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६० लाख आठ हजार ७५० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ३३ दशांश टक्के झाला आहे.

****

मराठवाड्यात काल ३७५ कोविड बाधितांची नोंद झाली, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले मराठवाड्यात सर्वाधिक २३८ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ५०, लातूर ३१, औरंगाबाद २६, नांदेड १४, जालना पाच, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी चार रुग्ण आढळले.

****

परभणी शहरासह जिल्हाभरात काल ‘ईद-उल-अजहा’ म्हणजेच ‘बकरी ईद’चा सण कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे साध्या पध्दतीनं साजरा करण्यात आला. ईदच्या नमाजचं घरांमध्येच पठण करण्यात आलं. देशातून या संसर्गाचं संकट नष्ट व्हावं यासाठी यावेळी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. शहरातल्या `शेक हँड` संस्थेतर्फे ईदनिमित्त गरजू महिलेला शिलाई यंत्र वितरित करण्यात आलं. औरगाबाद शहरासह जिल्ह्यातही ईदच्या नमाजचं पठण घरातच करण्यात आलं. सणाच्या पार्श्र्वभूमीवर संसर्ग प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातल्या छावणी ईदगाह परिसर आणि चौका - चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

****

टोकियो इथ उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेचं थेट प्रसारण आकाशवाणी, दूरदर्शन आणि डीडी स्पोर्ट या वाहिन्यांवरून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या डिजीटल व्यासपीठावरुनही हे प्रसारण होणार असून ऑलिंपिकमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा दररोज पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत हे प्रसारण करण्यात येणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 6 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...