Thursday, 22 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.07.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ जुलै २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

मुंबईत सलग आज सहाव्या दिवशी पाऊस सुरु आहे. कर्जत, कसारा, बदलापूर या भागात मुसळधार पाऊस कोसळत असून, कसारा इगतपुरी दरम्यान दरडी कोसळल्या आहेत. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाड परिसरात जोरदार पाऊस झाला. रात्री झालेल्या जोरदार पावसाने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. निफाड तालुक्यातल्या नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून तीन हजार १५५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा गोदावरीच्या पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

उस्मानाबाद शहर आणि परिसरातही आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.  यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असून, खरीप हंगामातील सोयाबीन सह सर्वच पिकांना लाभ होणार आहे.

****

लोकसभेत आज देशांतर्गत जलवाहतूक आणि अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक, तर राज्यसभेत समुद्री सहायता विधेयक मांडलं जाणार आहे. राजकीय नेते आणि पत्रकारांवर ठेवलेल्या कथित पाळतीच्या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव राज्यसभेत निवेदन देणार आहेत.

****

इस्रायलच्या हेरगिरी करणाऱ्या पेगाससच्या माध्यमातून राजकीय नेते आणि पत्रकारांवर ठेवलेल्या कथित पाळतीच्या प्रकरणी, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वातली संसदीय स्थायी समिती, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. याची सुनावणी येत्या २८ तारखेला दुपारी चार वाजता होणार आहे.

****

फ्रांसमधल्या वायू सेना तळावरून थेट निघून काल संध्याकाळी आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल झाली. संयुक्त अरब अमिरातीच्या वायू दलानं या विमानांमध्ये फेरीदरम्यान इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती भारतीय वायुसेनेनं एका ट्वीटद्वारे दिली आहे.

****

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जाणाऱ्या, भंडारा-मोहाडी-तुमसर-बारपेटा-बालाघाट, या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या संदर्भात घोषणा करणारी अधिसूचना काल जारी करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 6 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...