Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2021
Time 7.10AM to 7.20AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३
जुलै
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे.
तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत
करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
कोकण, पश्चिम तसंच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सोसाट्याचा वारा, आणि विजांच्या
कडकडाटासह जोरदार पाऊस; चिपळूण, महाडला पुरानं वेढलं, पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्यांनीही
धोक्याची पातळी ओलांडली.
·
रायगड जिल्ह्यात महाड नजिक तळई गावात ३२ घरांवर कोसळलेल्या दरडीखाली ७५ जण अडकले
असल्याची भीती, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक घटनास्थळी रवाना.
·
राज्यातल्या पूर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, बचाव आणि मदत कार्यात राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचं
पंतप्रधानांचं आश्वासन.
·
मराठवाड्यात नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस,
विविध घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू.
·
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल.
·
राज्यात सात हजार ३०२ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर ३०२
बाधित.
आणि
·
३२ व्या ऑलिंपिक स्पर्धेला आजपासून टोकियोत सुरूवात.
****
राज्यात कालही सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. कोकण, पश्चिम तसंच उत्तर महाराष्ट्र
आणि विदर्भात काल सोसाट्याचा वारा, आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. चिपळूण,
महाडला पुरानं वेढलं असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे
ठाणे जिल्ह्यात बदलापूरसह कल्याण तालुक्यातली अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूरसह
पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्यानं अनेक भागांत पूरस्थिती
निर्माण झाली. विदर्भातही काल अतिवृष्टीची नोंद झाली.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये बुधवारी रात्री अतिवृष्टी झाल्यानं जनजीवन
विस्कळीत झालं आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुरानं शहरातल्या अनेक भागात पाणी
साचलं असून, अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत.
कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीनं अनेक ठिकाणी
दरडी कोसळल्या आणि काही भागांत रस्ते पाण्याखाली गेल्यानं दोन्ही प्रकारची वाहतूक ठप्प
झाली. लोणावळा-खंडाळा घाट विभागांत तीनशे मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्यानं पुणे-मुंबई
लोहमार्गावर मंकी हिल ते पळसदरी दरम्यान लोहमार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.
काही भागांत लोहमार्गाच्या वीज खांबांचं नुकसान झाल्यानं रेल्वे वाहतूक ठप्प झाली.
सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातल्या देवरुखकरवाडी इथं झालेल्या भूस्खलनात पाच
घरांचं नुकसान झालं. आतापर्यंत २७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून, दोन जण मातीच्या
ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. संततधार पाऊस आणि अंधार, जमीन खचण्याचा धोका यामुळे
रात्री मदतकार्य थांबवण्यात आलं. जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या
पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्यात महाड नजिकच्या तळई गावात दरड कोसळून ३२ घरांचं नुकसान झालं.
या घरात राहणारे ७५ जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सतत कोसळत असलेला
पाऊस, अंधार आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे मदत पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अनेक
अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल - एनडीआरएफचं पथक घटनास्थळी रवाना करण्यात
आलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातले ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा आणि वेदगंगा
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातले अनेक मार्ग बंद झाले असून, काही मार्गांवरची
वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली आहे.
वर्धा जिल्ह्यात परवापासून सर्वदूर पावसानं हजेरी लावली. समुद्रपूर तालुक्यातला
पोथरा प्रकल्प भरुन वाहू लागला, तर लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले आहेत. यवतमाळ
जिल्ह्याच्या पुसद आणि उमरखेड उपविभागात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं
पुसद, उमरखेड आणि महागाव तालुक्याला चांगलाच तडाखा दिला. पैनगंगा नदीला पूर आला असून
पैनगंगा अभयारण्य परिसरातल्या ४० गावांचा संपर्क तुटला आहे.
नाशिक जिल्ह्यातलं गंगापूर धरण ५० टक्के तर दारणा धरण ७५ टक्के भरलं आहे. इगतपुरी,
त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांत जोरदार पाऊस झाला तर इतर तालुक्यांमध्ये
मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला.
जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल जोरदार पाऊस
झाल्यानं धरणाचे सर्व ४१ दरवाजे काल उघडण्यात आले.
****
पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचाव कार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या
तूकड्याही उतरल्या असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं या जिल्ह्यांतली अद्ययावत
माहिती घेत आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसंच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून
बचाव कार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यातल्या पूर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्यातही काल चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना, राज्य
शासनामार्फत सुरु असलेल्या बचाव कार्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र
सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं.
****
मराठवाड्यात नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात पावसानं सर्वदूर
हजेरी लावली. विभागात पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार पाऊस होत असून, जिल्ह्यातल्या ११२
जलसाठ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नांदेड शहरालगतच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी
प्रकल्पाचे सहा दरवाजे काल उघडण्यात आले असून, त्यातून दोन हजार ४८४ घनमीटर प्रतिसेकंद
वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून
वाहत आहे. किनवट तालुक्यात पैनगंगा नदीला पूर आला आहे. बटाळा ते रेणापूर आणि कोळगाव
ते नांदा गावची वाहतूक विस्कळीत झाली असून, रावणगाव, पाळज आदी गावात नदीचं पाणी शिरलं
आहे. मुखेड तालुक्यातल्या २५ वर्षीय तरुणाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू
झाला.
परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाल्यानं नदी-नाल्यांना पूर आला असून
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या गोदावरी, दुधना
या मुख्य नद्यांसह अन्य नद्याही दुथडी भरून वाहू लागल्यानं नदीकाठच्या दोन्ही बाजूंनी
असलेल्या पिकांचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची
माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. लोअर दुधना सिंचन प्रकल्पातून मोठ्या
प्रमाणावर दुधना नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं.
जालना जिल्ह्यातल्या १५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात एक महिला
पुराच्या पाण्यात वाहून गेली. लातूर मध्ये रिक्षावर झाड कोसळल्यानं रिक्षाचालकाचा मृत्यू
झाला, तर हिंगोली जिल्ह्यातल्या खरवड इथं बंधाऱ्यात बुडून ३२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
झाला.
****
पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं
दिला आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची
शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह
पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून
हा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये परमबीर सिंह यांच्यासह,
पोलिस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोरके,
नंदकुमार गोपाळे, संजय पाटील तसंच इतर सुनील जैन आणि संजय पुनमिया यांचा समावेश आहे.
या गुन्ह्यातल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण
विभाग- सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई
उच्च न्यायालयानं काल फेटाळली. सीबीआयनं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या
पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो
रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
देशमुख यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यामधील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि
बदल्या, तसंच सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर राज्य सरकारनं आक्षेप घेत तो भाग
वगळण्याची विनंती न्यायालयाला केली होती. राज्य सरकारची यासंदर्भातील याचिकाही न्यायालयानं
फेटाळली आहे.
****
राज्यात काल सात हजार ३०२ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ४५ हजार ५०६ झाली आहे. काल १२० रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३१ हजार
३८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ९ शतांश टक्के झाला आहे. काल ७ हजार ७५६ रुग्ण
या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६० लाख १६ हजार ५०६ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ३४ दशांश टक्के झाला आहे.
सध्या राज्यभरात ९४ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३०२ कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश
आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १६० रुग्ण आढळले. उस्मानाबाद ६०,
लातूर ३०, औरंगाबाद २८, परभणी नऊ, जालना सात, नांदेड सहा तर हिंगोली जिल्ह्यात काल
कोविड संसर्ग झालेले दोन नवे रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठा सकाळी सात ते रात्री सात आणि शनिवार,
रविवारी पूर्णपणे सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघानं
एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या अतिशय कमी असल्याचं नमूद करताना
कोरोना विषाणू संक्रमण परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. डेल्टा
प्लस कोरोनाचा कोणताही रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात आढळला नसल्यानं निर्बंधाद्वारे व्यापारी
आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांच्या कुटुंबियांना वेठीस धरू नये, असंही
महासंघानं म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत काल ५२१
गरोदर मातांचं कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. जिल्ह्यातील ५८ ठिकाणी लसीकरणाचं
आयोजन करण्यात आलं होतं. बाळंतपणात उद्भवणारी गुंतागुंत टाळण्यासाठी जिल्ह्यातील गरोदर
मातांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती - व्हीजे एनटीच्या विविध
प्रश्नासंदर्भात मराठवाडा विभाग जनजागृती अभियानाची सुरुवात काल जालना इथून झाली. ओबीसींची
जनगणना, आरक्षण, स्थानिक स्वराज संस्थातील निवडणुकीतील आरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी
हे अभियान घेण्यात येत आहे. हे अभियान मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात घेतलं जाणार
असल्याची माहिती अभियान प्रमुख राजेश राठोड यांनी दिली. ते म्हणाले –
महाराष्ट्र राज्यातील ओबीसीचे प्रश्न, ओबीसीचं आरक्षण, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य
संस्थेतील निवडणुकीतील आरक्षण, ओबीसीची जनगणना करण्याबाबत केंद्र सरकारने घेतलेली भूमिका
या सर्व मुद्यांना घेऊन आम्ही संपूर्ण मराठवाडाभर ओबीसी आणि व्ही जे एन टी ची जनजागृती
करत आहोत. येणाऱ्या काळामधे जर ओबीसीचं राजकीय आरक्षण निवडणुकांमधे जर कायम राहिलं
नाही तर ओबीसी घटक, व्हीजेएनटी घटक या निवडणुकीमधे सहभाग घेणार नाहीत हे या ठिकाणी
आम्ही आपणांस सांगत आहोत.
****
३२ व्या ऑलंपिक स्पर्धेला आजपासून जपानमध्ये टोकियो इथं सुरूवात होत आहे. भारतीय
प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता या स्पर्धेचं उद्घाटन होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
गेल्यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. यंदाही या खेळावर कोरोना विषाणू
संसर्गाचं सावट आहे, त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत नेहमीचा झगमगाट असणार नाही.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १२७ भारतीय खेळाडुंच्या कामगिरीकडं सर्व भारतीयांच्या
नजरा खिळल्या आहेत. १८ क्रीडा प्रकारातल्या ८५ पदकांसाठी जगभरातल्या खेळाडुंमधे चुरस
असणार आहे.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीपदी वसमत तालुक्यातल्या बाबुळगाव गटातले
महादेवआप्पा एकलारे यांची निवड झाली आहे. त्यांना २९ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी कैलास
साळुंके यांना २१ मते मिळाली आहेत. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्य सभागृहात सध्या ५० सदस्य
आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे हे पीठासीन अधिकारी होते.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातला रेणुका साखर कारखाना कार्यान्वित करावा या
मागणीसाठी काल कारखाना शेतकरी संघर्ष बचाव समितीतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून
निदर्शनं करण्यात आली. या कारखान्याच्या जमिनी बळकवण्या संदर्भात काहींनी सुरु केलेल्या
हालचाली निषेधार्ह असून शेतकरी हितासाठी कारखाना सुरु करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात
आली.
****
No comments:
Post a Comment