आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ जुलै
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात अनेक भागात निर्माण झालेली पूर परिस्थिती पाहता बचावकार्यासाठी
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल - एनडीआरएफची १४ पथकं तैनात करण्यात आली आहेत. यापैकी चार
पथकं चिपळूण, तर तीन पथकं महाड इथं दाखल झाली आहेत.
****
रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या
घटना घडत आहेत. मुंबई - गोवा महामार्गावर अनेक वाहनं अडकून पडली असून, हा महामार्ग
आजही वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.
सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातल्या देवरुखकरवाडी आणि पाटण तालुक्यातल्या
आंबेघर गावात घरांवर दरड कोसळली आहे. देवरुखकरवाडी इथलं मदतकार्य सकाळी पुन्हा सुरू
झालं असून, मातीखाली दबलेल्या दोन जणांचा शोध घेण्यात येत आहे.
मुंबईच्या उपनगरात पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत असून, शहर भागात पावसाचं
प्रमाण कमी झालं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे.
****
आज राष्ट्रीय प्रसारण दिवस आहे. १९२७ साली याच दिवशी भारतीय प्रसारण कंपनी
या खासगी कंपनीच्या बॉम्बे स्टेशनवरून, देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण करण्यात आलं होतं.
नंतर आठ जून १९३६ रोजी भारतीय प्रसारण सेवेचं ऑल इंडिया रेडिओ मध्ये रूपांतर झालं होतं.
****
जम्मू काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यातल्या सोपोर इथं आज पहाटे सुरक्षा
बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. या ठिकाणाहून
शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
****
देशातल्या विशिष्ट दर्जाच्या पोलाद निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्रीय
मंत्रिमंडळानं उत्पादन निगडीत प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. यासाठी पाच वर्षांच्या
कालावधीत सहा हजार ३२२ कोटी रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
****
कोविड संकटामुळे स्थगित करण्यात आलेली खासदार स्थानिक विकास योजना पुन्हा
सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं काल सरकारनं स्पष्ट केलं. ही योजना गेल्या
वर्षी एप्रिल महिन्यात थांबवण्यात आली होती. या योजनेतून वाचवण्यात आलेला निधी आरोग्य
यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी तसंच नागरिकांच्या मोफत लसीकरणासाठी वापरण्यात येत असल्याचं
मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी काल राज्यसभेत सांगितलं.
****
No comments:
Post a Comment