Friday, 24 December 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      शेतकऱ्यांनी जैविक शेतीच्या दिशेने वळावं - केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचं आवाहन.

·      उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन.

·      जालना आणि हिंगोली जिल्ह्यातून २० लाखाचा गांजा जप्त; सहा जण ताब्यात.

आणि

·      फिरकी गोलंदाज हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती.

****

शेतकऱ्यांनी जैविक शेतीच्या दिशेने वळावं, असं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं देशातल्या सर्वात मोठ्या 'ॲग्रोव्हिजन' या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृषी क्षेत्रात खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचं तोमर यांनी यावेळी नमूद केलं. ‘समृद्ध शेतीसाठी नवे तंत्रज्ञान’ अशी या वर्षीच्या कृषी प्रदर्शनाची संकल्पना आहे. शंभर टक्के बायोइथेनॉल वर चालणाऱ्या वाहनांमुळे शेतकऱ्यांना ईथेनॉलचे पंप सुरू करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडेल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

****

राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात येणार आहे. काही शेतकऱ्यांना पुरवणी मागण्यात तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल. तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

****

उच्च दाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बीड जिल्ह्यातल्या आमदारांची बैठक घेणार असल्याचं, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या गावांचा प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेत समावेश करण्याबाबतचा तारांकित प्रश्न नमिता मुंदडा, प्रकाश सोळंके, बालाजी कल्याणकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.

****

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरुन पाठपुरावा सुरु असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत सांगितलं. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँककेडून दुर्लक्ष होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य तान्हाजी मुटकुळे, प्रशांत बंब, प्रकाश सोळंके यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावरुन पाठपुरावा सुरु असल्याची माहितीही सहकार मंत्री पाटील यांनी दिली.

****

महाविकास आघाडी सरकारने राज्यात चांगलं काम करुन दाखवावं, त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक सहकार्य निश्चित करत राहिल, असं आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे. धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आज ते बोलत होते. शिवस्मारक, महाराणा प्रताप स्मारक, हुतात्मा अब्दुल हमीद स्मारक, पर्यटन विभागाच्या माध्यमातून साकारलेला भव्य राजपथ, याचबरोबर देशाचे तिन्ही संरक्षण दलांचे पहिले प्रमुख जनरल बीपीन रावत मार्ग, तसंच दोंडाईचा संस्थानचे शेवटचे राजे श्रीमंत दौलतसिंहजी रावल यांच्या स्मारकांचं लोकार्पण राजनाथसिंह आणि आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आज करण्यात आलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, नियमितपणे मास्क वापरावा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घ्याव्यात, परदेशातून आलेल्या नागरिकांनी विलगीकरणात राहावं, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या मंठा इथं पोलिसांनी, एका ट्रकमध्ये नर्सरीच्या रोपांआडून वाहतूक केला जात असलेला १८ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. परभणी-मंठा मार्गावरील कर्णावळ फाट्यावर आज दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी गांजासह ट्रक आणि रोपं असा एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या येहळेगाव सोळंके इथं गांजाची विक्री करणाऱ्या ४ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलं. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या चौघांकडून १ लाख ९५ हजार रूपये किमतीचा साडेसहा किलो गांजा, १ लाख रूपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण ३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या १७ व्या वर्षी २५ मार्च १९९८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या हरभजनने १०३ कसोटी, २३६ एक दिवसीय आणि २८ टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व केलं. या काळात त्याने कसोटीत ४१७, एकदिवसीय सामन्यात २६९ आणि टी-२० मध्ये २५ बळी घेतले आहेत. इंडियन प्रीमीअर लीग - आयपीएलमध्ये हरभजनने १६३ सामन्यांत १५० बळी घेतले आहेत. मुंबई इंडियन्स संघानं हरभजनच्या नेतृत्त्वात २०११ साली चॅम्पियन लीग २०-२० चा किताब जिंकला होता. हरभजनने क्रिकेटसोबत मुझसे शादी करोगे, सेकेंड हॅड हसबेंड, या हिंदी तर भज्जी इन प्रॉब्लेम या पंजाबी चित्रपटासहर काही तमिळ चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...