Friday, 24 December 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.12.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आज राष्ट्रीय ग्राहक दिन. १९८६ साली तत्कालीन राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी दिली, तेव्हा पासून हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या कायद्यानुसार ग्राहकाला सहा हक्क मिळाले आहेत.

****

जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात मुमनहाल गावात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. गस्त घालणाऱ्या सैनिकांवर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरु झाली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून, सर्व राज्यांचा कोविड विरोधातल्या तयारीचा तसंच राज्यांच्या आरोग्य सचिवांकडून लसीकरणाबाबतच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रतिबंध, चाचणी, सर्वेक्षण, वैद्यकीय नियोजन, कोविड सुरक्षित वर्तणूक आणि लसीकरण या पंच-सूत्रीवर भर द्यावा, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्यात वाढलेली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आणि ओमायक्रॉनचा वाढत असलेला संसर्ग, या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्य कृती दलाशी चर्चा करणार असून, त्यानंतर नवी नियमावली जाहीर होणार आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीच्या कारागृहातून गेल्या शनिवारी पाच कैद्यांनी पलायन केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ.काळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत, शाळा आणि अंगणवाड्यांना पिण्याचं शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातल्या एक हजार ५१६ शाळांमध्ये शाश्वत पाणीपुरवठ्याच्या नळजोडण्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे आता शाळेत येताना पाणी आणण्याची गरज नसल्यानं, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...