Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 December 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
कोविड परिस्थितीमुळे राज्याची
अर्थव्यवस्था कोलमडली असून, आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी
देणार, असं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला होता.
शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली तर त्यांना शून्य टक्के व्याज दराने
कर्ज देणार असल्याचंही पवार म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव
तालुक्यात सर्व पात्र शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज वाटप केलं नाही, केवळ नऊ कोटी कर्ज
वाटप केलं असल्याचं सांगून आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी, वेळेवर कर्ज वाटप न करणाऱ्या
बँकांवर काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला. मात्र सेनगाव तालुक्यातून अशा प्रकारची
कुठलीही तक्रार आली नसल्याचं सरकार कडून सांगण्यात आलं.
पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव
इथं एक जानेवारी रोजी शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार असल्याचं, सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितलं. एक जानेवारी
२०२२ रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध करुन
दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लस न घेतलेल्यांना सार्वजनिक
वाहतुकींमध्ये मज्जाव करण्याच्या निर्णयाचं, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात समर्थन
केलं आहे. मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी काल या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र उच्च
न्यायालयात सादर केलं. लस न घेतलेल्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवासाची परवानगी
दिली, तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल, असं या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
तसंच अशा नागिरिकांना प्रवासाला मज्जाव केला तर घटनेनं नागरिकांना दिलेल्या कुठल्याही
अधिकाराचं उल्लंघन होत नाही, याबाबत तज्ञांशी चर्चा केल्यानंतरंच हा निर्णय घेतला आहे,
तसंच पूर्ण लसीकरण झालेल्यांना कोरोनाचा जास्त त्रास होत नाही, असं अभ्यासानंतर सिद्ध
झालं आहे, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.
****
देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक
लसीच्या १४० कोटी ३१ लाख ६३ हजार ६३ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या सहा
हजार ६५० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३७४ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. काल सात हजार ५१ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४२ लाख १५
हजार ९७७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ७७ हजार ५१६ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
भगवान येशु ख्रिस्तांचा जन्मदिवस
नाताळचा सण उद्या साजरा होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळचा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य, संपन्नता
घेवून येवो, अशी प्रार्थना करत असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं नाताळ
सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या
प्रार्थनेच्या वेळी क्षमतेच्या ५० टक्के नागरीकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर
गर्दीला आकर्षित करणारे कोणतेही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसंच मिरवणुकीस बंदी
घालण्यात आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
रविवारी २६ डिसेंबरला आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ८४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. या वर्षातल्या अखेरच्या भागासाठी, देशाच्या
विविध भागात समाजाच्या तळागाळात बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्यांबद्दल आपल्याला
माहिती मिळत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्याच्या
तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी, गोदावरी आणि पूर्णा नदीच्या दोन्ही बाजूस ५० मीटरच्या
आत काठालगत, वाळू, अवैध खनिजाचं उत्खनन, यंत्र सामुग्री आणि वाहन यासारखी सामुग्री
नदीपात्रात नेण्यास, प्रतिबंध केला आहे. वाळूच्या अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी हे
आदेश येत्या १८ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहेत.
****
उस्मानाबाद शहरातल्या लोक सेवा
समितीच्या वतीनं, माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त
दरवर्षी देण्यात येणारे, लोकसेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. रक्तदान सेवेबद्दल श्री
साई सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रोहित निंबाळकर यांना, गेवराईच्या
बालग्राम परिवार या संस्थेच्या माध्यमातून अनाथ बालकांची सेवा करणारे संतोष आणि प्रीती
गरजे यांच्यासह, अंत्यविधी सेवेत कार्यरत बाळासाहेब गोरे यांना, लोकसेवा पुरस्कार जाहीर
झाले आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी उद्या २५ डिसेंबरला हे पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment