Wednesday, 12 January 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

·      कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सैन्यदल सज्ज - थलसेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे.

·      कोविडग्रस्तांना रुग्णालयातून सुटी देण्यासंदर्भात नवे निकष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी.

·      पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवार बसवणाऱ्या औरंगाबादच्या तरुणाला अटक.

आणि

·      राजमाता जिजाऊ तसंच स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी.

****

सीमेवरच्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय सेना सज्ज असल्याचं थलसेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. उत्तर सीमेवर भारतीय सैन्यानं मोठी सज्जता केली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून पूर्व तसंच उत्तर सीमेवर सकारात्मक विकास झाला आहे, उत्तरी सीमेवर पायाभूत विकासाकडे अधिक लक्ष दिलं जात असल्याचं जनरल नरवणे यांनी सांगितलं. भारताचं चीनसोबत बोलणं सुरू आहेच, पण सीमेवर चीनकडून झालेल्या कारवायांचंही भारतानं सडेतोड उत्तर दिलं असल्याचं नरवणे यांनी नमूद केलं.

****

कोविडग्रस्तांना रुग्णालयातून सुटी देण्यासंदर्भात नवे निकष केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केले आहेत. कोविडची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना सात दिवसांच्या उपचारादरम्यान सलग तीन दिवस ताप नसेल, तर कोविड चाचणी न करता रुग्णालयातून सुटी देता येईल. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मध्यम स्वरुपाची लक्षणं असलेल्या रुग्णांना सलग तीन दिवस जर कृत्रीम प्राणवायू न देता, शरीरातली प्राणवायूची पातळी समाधानकारक असेल, आणि अन्य व्याधी जर नियंत्रणात असतील, तर कोविड चाचणी न करता, रुग्णालयातून सुटी देता येईल.

गंभीर रुग्णांना मात्र उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुटी देता येईल, असं अग्रवाल यांनी सांगितलं.

****

भूजल पातळीतली घट थांबवण्यासाठी बंदिस्त जलवाहिनीद्वारे शेतीला पाणीपुरवठा आवश्यक असून, यासाठी पाणी पुरवठा आणि कृषी विभागामार्फत जनजागृती होण्याची गरज पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. मंत्रालयात आज झालेल्या अटल भूजल योजनेच्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या दुसऱ्या बैठकीत ते बोलत होते. ठिबक सिंचन योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी अनुदान निधी उपलब्ध करून दिला तर लाभार्थींची संख्या वाढेल. यामुळे पाणी उपसा कमी होण्यास मदत होईल असं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या औरंगाबाद इथल्या उमेदवाराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम सोनवणे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने बसवलेल्या डमी उमेदवाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ डिसेंबर रोजी पुण्यात ही परीक्षा झाली होती.

****

राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिजाऊंना अभिवादन करताना, त्यांच्या कर्तृत्वाला अनुसरून राज्याच्या विकासाला गती देणं, हेच त्यांना अभिवादन ठरेल, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी विनम्र अभिवादन करून राष्ट्रीय युवक दिनाच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

बुलडाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा इथंही अनेकांनी जिजाऊंच्या स्मृतींना अभिवादन केलं

****

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोविड - 19 दिशानिर्देश आणि लसीकरण चित्ररथाचं जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ खेळाडूंच्या मातांचा, औरंगाबाद इथं क्रीडा भारतीच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज गौरव करण्यात आला.

****

उस्मानाबाद इथं स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवजयंती समारोह समितीच्या वतीने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीनं नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते जिजाऊ चौक येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. रक्तदान शिबिर, मुला-मुलींनी स्वसंरक्षणासाठी लाठ्या काठ्यांचे प्रात्यक्षिकांचं सादरीकरणही करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील आष्टूर ग्राम पंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्षहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

 

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथल्या लिटल किंग इंग्लिश शाळेत ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान जिजाऊ-सावित्री महोत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान झालेल्या क्रीडा प्रकारांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आज गौरव करण्यात आला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. विवेकानंदांनी देशासाठी पाहिलेली स्वप्नं साकार करण्यासाठी आपण एकत्र काम करत राहू’ अशा शब्दात पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंदांचं स्मरण केलं.

****

क्रिकेट

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात केपटाऊन इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात ६३ धावांनी पिछाडीवर आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, दक्षिण आफ्रिका संघाच्या सहा बाद १६० धावा झाल्या होत्या. भारतानं पहिल्या डावात २२३ धावा केल्या आहेत.

****

१५ व्या इंडिया एनर्जी समिटमध्ये यंदा महाराष्ट्राची ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ या पुरस्काराकरिता प्रथम क्रमांक आणि ‘गुणवत्ता सुधार’ या वर्गवारीत महावितरणची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून हे पुरस्कार देण्यात आले.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...