Monday, 24 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या बालकांना २०२१ आणि २०२२ साठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, यावेळी ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून प्रदान केले जाणार आहेत. गौरवपदक, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या घोडज इथल्या, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे तसंच नागपूरच्या श्रीनभ अग्रवाल यांचा समावेश आहे.

****

आज राष्ट्रीय बालिका दिन आहे. देशातल्या मुलींना सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर मुलींचे हक्क तसंच शिक्षण, आरोग्य आणि पोषणासंबंधी जागरूकता वाढवणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमाचा भाग म्हणून, आज संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं 'उमंग रांगोळी उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात, सहभागी संघ महिला स्वातंत्र्य सैनिकांचं किंवा देशातल्या आदर्श महिलेचं नाव दिलेल्या मार्गावर आणि चौकांवर सुमारे एक किलोमीटर लांबीची रांगोळी काढून, सजावट करणार आहेत.

****

राज्यात बहुतांश शाळांचे १० वी तसंच १२वीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. कोविडच्या स्थानिक परिस्थितीनुसार शाळांचे वर्ग सुरू करायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय जगभरातली परिस्थिती पाहून आणि लहान मुलांबाबतच्या कृती दलाशी चर्चा करुन घेण्यात आला आहे, त्यामुळे पालकांनी पाल्यांना शाळेत जाण्याची परवानगी द्यावी, असं आवाहन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

****

गेल्या ७७ दिवसांपासून बंद असलेली औरंगाबाद स्मार्ट शहर बस सेवा कालपासून पुन्हा सुरू झाली. शहरातल्या विविध पाच मार्गांवर ही बससेवा सध्या सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांनी कोविडच्या सर्व नियमांचा अवलंब करून बस सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन स्मार्ट शहर बस विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज तिच्या निर्धारित वेळेपेक्षा तीन तास उशिरा म्हणजेच दुपारी साडेबारा वाजता सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...