Monday, 24 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २०२१ आणि २०२२ साठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून प्रदान केले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या घोडज इथल्या, कामेश्वर जगन्नाथ वाघमारे, नागपूरच्या श्रीनभ अग्रवाल, मुंबईच्या जिया राय आणि नाशिकच्या स्वयं पाटील यांचा समावेश आहे. गौरव पदक, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्या बालकांशी संवाद साधला.

****

आज राष्ट्रीय बालिका दिन आहे. देशातल्या मुलींना सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर मुलींचे हक्क तसंच शिक्षण, आरोग्य आणि पोषणासंबंधी जागरूकता वाढवणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुलींना सशक्त बनवण्यासाठी त्यांना शिक्षण, समान संधी आणि योग्य पोषण उपलब्ध करण्याचा आपण सर्वांनी संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी ट्विट संदेशाद्वारे केलं आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्याचा हा दिवस असल्याचं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राज्यात बहुतांश शाळांचे १०वी तसंच १२वीचे वर्ग आजपासून सुरू झाले. जालना जिल्ह्यात पहिली ते बारावी, औरंगाबाद आणि बीडमध्ये फक्त १०वी आणि १२वी तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु झाले. कोविडच्या स्थानिक परिस्थितीनुसार शाळांचे वर्ग सुरू करायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १६२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २७ लाख ५६ हजार ३६४ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १६२ कोटी २६ लाख सात हजार ५१६ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८१ लाख ८० हजार १६५ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे. 

दरम्यान, देशात काल नव्या तीन लाख सहा हजार ६४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ९५ लाख ४३ हजार ३२८ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ८९ हजार ८४८ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. काल दोन लाख ४३ हजार ४९५ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ६८ लाख चार हजार १४५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, २२ लाख ४९ हजार ३३५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

****

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेलं लष्कराचं संचलन नियोजित सकाळी दहा वाजेऐवजी सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. ही कवायत रायसिना हिल परिसरातून राजपथावरून लाल किल्ल्याच्या दिशेने जाईल. संचलनामध्ये लष्कराकडून सहा, नौदल आणि हवाई दलातील प्रत्येकी एक, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या चार तुकड्या सहभागी होतील. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मंत्रालये आणि विभागाचे २१ चित्ररथ सहभागी होतील.

****

महाराष्ट्राची राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट वॉरंट ऑफिसर पृथ्वी पाटील हिला राष्ट्रीय पातळीवरच्या बेस्ट कॅडेटचा पुरस्कार मिळाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तिची निवड झालेली आहे. महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रनची ती छात्र आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे.

****

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सोयी सुविधा अधिक भक्कम करून नागरीकांना चांगल्या उपचार सेवा उपलब्ध करून देऊ, असा विश्वास, जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. काल विष्णुपुरी इथं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, २०० विद्यार्थी क्षमतेच्या वसतीगृहाचं भूमीपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात कर्करोग उपचार केंद्र, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, दंतचिकित्सा महाविद्यालय आणि इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर योग्य ती पावले उचलली जातील असं चव्हाण यांनी सांगितलं.

****

राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड मध्ये आज पाच अंश सेल्सिअस आणि नाशिक शहरात सहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या हंगामातली ही सर्वात नीचांकी नोंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वत रागांमध्ये असणाऱ्या डाब आणि वालंबा परिसरात यंदा दुसऱ्यांदा दवबिंदु गोठल्याची घटना समोर आली आहे. सपाटी भागात असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रात आज आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद शहर आणि परिसरातही तापमानाच घट झाली आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...