Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर
२०२२ सायंकाळी ६.१०
****
· आर्थिक मागास प्रवर्गाची उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये असताना अडीच लाख रुपयांवरील
उत्पन्न आयकरपात्र का-चेन्नई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल.
· सीमाभागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तर बेळगाव,
कारवार निपाणीसह मराठी भाषिक गावं राज्यात सामील करून घेणार-उपमुख्यमंत्र्यांचा निर्धार.
· साहित्यिक-विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना एमजीएम अभिमत विद्यापीठाकडून डी.लिट जाहीर.
· राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांचा उपांत्य
फेरीत प्रवेश.
आणि
· खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पासाठी फिक्की वॉटर पुरस्कारानं औरंगाबाद महापालिका सन्मानित.
****
देशात वार्षिक आठ लाख रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचा आर्थिक मागास प्रवर्गात
समावेश होत असताना अडीच लाख रुपयांहून अधिक उत्पन्नावर आयकर का भरावा लागतो, असा सवाल
चेन्नई उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठानं केला आहे. न्यायमूर्ती आर. महादेवन आणि
न्यायमूर्ती सत्यनारायण प्रसाद यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारला याबाबत नोटीस बजावत
उत्तर मागितलं आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाव्यतिरिक्त, खंडपीठाने वित्त
मंत्रालयाला देखील याचं उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी चार
आठवड्यांनी होणार आहे.
****
नव्या इथेनॉल अनुदान योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं आणखी ९५ इथेनॉल प्रकल्पांना
तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे देशातल्या वार्षिक इथिनॉल उत्पादन क्षमतेत सुमारे ४००
कोटी लिटरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. इथेनॉल बनवणाऱ्या या प्रकल्पांपैकी ६८ प्रकल्प
धान्यावर आधारित, २० प्रकल्प मळीवर आधारित तर उर्वरित ७ प्रकल्प धान्यासह मळीवर आधारित
असतील, अशी माहिती अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण विभागानं दिली. हे प्रकल्प १२ हजार
कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करुन रोजगाराच्या हजारो संधी ग्रामीण भागात निर्माण
करतील. गेल्या एप्रिल महिन्यात या योजनेला मान्यता मिळाली असून २४३ प्रकल्पांना तत्त्वतः
मंजुरी मिळाली आहे.
****
सीमाभागातलं एकही गाव राज्याबाहेर जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी दिली आहे. ते आज शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेतल्यावर बोलत होते. जत तालुक्यातल्या
गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले
–
पाण्यावाचून
कुठलंही गाव इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही. आणि एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर
जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे त्या भागातील ज्या काही समस्या, प्रश्न
आहेत, काही सोडवलेत, काही प्रलंबित आहेत ते लवकर युद्ध पातळीवर सोडवले जातील आणि कुणावरही
अशी वेळ येणार नाही. आणि हा जो काही जुना वाद आहे, तो न्यायालयात प्रलंबित आहे. आणि
न्यायालयीन लढाई तर सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु त्याबरोबर हा विषय जो आहे,
सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जत तालुक्यातल्या ग्रामपंचायतींचा हा ठराव
दहा वर्ष जुना असल्याचं सांगितलं. कोणतंही गाव राज्यातून बाहेर जाणार नाही, उलट बेळगाव,
कारवार, निपाणीसह मराठी भाषिक गावंच राज्यात सामील करून घेणार असल्याचा निर्धार फडणवीस
यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
२०१२
साली त्यांनी ठराव केला होता, आत्ता कोणीही अशी मागणी केलेली नाही, २०१२ ची मागणी आहे.
एकही गाव महाराष्ट्रातलं कुठेही जाणार नाहीये. पण आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयात
लढून आमचे जे बेळगाव, कारवार, निपाणीसहीत हे आमचे गावं आहेत, ते सगळे आम्ही पुन्हा
मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नागपूर इथं गोवारी हुतात्मा स्मारकाला
भेट देऊन अभिवादन केलं. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आजच्याच दिवशी
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर गोवारी बांधवांनी
मोर्चा आणला होता, या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधव हुतात्मा झाले होते.
****
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असुन त्यामागं
कोणताही घातपात किंवा तिची हत्या झाली नसल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं
आपल्या तपास अहवालात केला आहे. २८ वर्षीय दिशानं सुशांतसोबत काही काळ काम केलं होतं.
सुशांतचा मृतदेह सापडण्याआधी पाच दिवस तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळं सीबीआयनं सुशांतच्या
मृत्यू प्रकरणासह दिशाच्या मृत्यूचाही तपास केला आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन स्वयंअर्थसहायित विद्यापीठानं समाजसेवक, साहित्यिक
आणि विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर मानद वाङ्गमय पंडित डी.लिट पदवी जाहीर केली
आहे. विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा रविवार २७ नोव्हेंबरला होणार आहे. कुलसचिव
डॉ.आशिष गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमजीएम हे मराठवाड्यातील पहिले
स्वयंअर्थसहायित विद्यापीठ २०१९ पासून कार्यन्वित झालं असून २०२० ते २०२२ या शैक्षणिक
वर्षादरम्यान विविध शाखेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यामध्ये १०९ पदवी, २९१ पदव्युत्तर पदवी आणि प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांचा
समावेश आहे.
****
उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या
पुरुष आणि महिला दोन्ही संघानी डावानं विजय मिळवण्याची परंपरा कायम राखत स्पर्धेच्या
उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत महाराष्ट्राला पुरुषांमध्ये कोल्हापूर
विरुध्द तर महिलांमध्ये दिल्ली विरुध्द लढा द्यावा लागणार आहे. आज झालेल्या पुरुषांच्या
उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं ओडिशावर १६-८ असा एक डाव ८ गुणांनी विजय मिळवला
तर महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं केरळचा १०-७ असा एक डाव ३ गुणांनी
पराभव केला.
****
औरंगाबाद महानगरपालिकेला खाम नदी पुनर्जीवन आणि सांड पाणी व्यवस्थापनासाठी केलेल्या
कामगिरीबद्दल फिक्की वॉटर पुरस्कारानं आज नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आलं. महानगरपालिका
आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अभिजित चौधरी ह्यांनी
हा पुरस्कार स्वीकारला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, नमामि गंगेचे महासंचालक
जी अशोक कुमार, फिक्की वॉटर मिशनच्या अध्यक्ष नैना लाल किदवई आणि इतर मान्यवर यावेळी
उपस्थित होते.
****
हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करण्यासाठी आज हिंगोली रेल्वे स्थानकावर हिंगोली
जिल्हा रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं आंदोलन करण्यात
आलं. हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू होत नाही तोपर्यंत रुळावरून उठणार नसल्याचा पवित्रा
आंदोलकांनी घेतला होता. या मागणीसाठी आंदोलकांनी अमरावती - तिरुपती एक्स्प्रेस रोखून
धरली होती. आपल्या मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी रेल्वे प्रशासनाला सादर केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट जवळ ट्रक आणि कारच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.
आळंदीहून कर्नाटकातल्या इंडी गावाकडे निघालेल्या चारचाकीची येणाऱ्या ट्रकशी धडक झाल्याने
हा अपघात झाला. या अपघातात एका चिमुकल्यास दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती
पोलिस उपअधीक्षक राजेंद्र गौर यांनी दिली.
****
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील रेशन दुकानांवर ई-पोझ मशिनचे सर्वर डाऊन असल्यानं
गर्दी दिसून येत आहे. मशीन चालू बंद होत असल्यानं रेशन दुकानदारांना मनस्ताप सहन करावा
लागत आहे. प्रशासनानं ही समस्या लवकर सोडवली नाही तर महासंघ तीव्र आंदोलन करुन ई-पोज
मशिन पुढील महिन्यात सरकारकडे जमा करेल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
****
शेतातील विहीर ही शेतकऱ्यांची खरी श्रीमंती असून ती टिकवून ठेवावी, तसंच जास्त
पाणी लागणारी पिकं घेण्यापेक्षा कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या नगदी पिकांची
लागवड करून समृद्धी साधावी, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
नांदेड, जिल्ह्यात ७५ ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनेतून लाभ
देण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींचं आज जल पूजन करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत
होत्या. शेतकऱ्यांनी पाण्याचं संरक्षण, संवर्धन आणि जपवणूक करावी, असं आवाहन त्यांनी
केलं.
****
जागतिक वारसा स्थळ सप्ताहानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात तेर इथं उद्या हेरिटेज
वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. तेर इथल्या ऐतिहासिक पुरातन वास्तू, आणि सांस्कृतिक वारशाकडे
लक्ष वेधण्यासाठी पुरातत्व विभाग आणि पर्यटन जनजागृती संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या
संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संत गोरोबा काका मंदिर, पाण्यात तरंगणाऱ्या
विटा, उत्खननात आढळलेला बौध्द स्तूप, त्रिविक्रम मंदिर, वस्तू संग्रहालय अशा विविध
स्थळांचा समावेश या हेरिटेज वॉकमधे करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment