Wednesday, 23 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.11.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 November 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.

****

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातलं एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यानं, तिथल्या ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. या ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी, या गावांनी हा करार २०१२ सालीच केला होता, असं सांगितलं. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन महत्वाचे निर्णय घेतले, त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं हे विधान आल्याचं, फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सरकारचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा विचार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली.

****

पीक विम्याची रक्कम शेतकर्यांना अद्याप मिळाला नसून, केंद्राची मदत घेऊन विमा कंपन्यांना रक्कम लवकरात लवकर देण्यास भाग पाडावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकर्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेणं आवश्यक असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी वेळ द्यावा, तसंच आगामी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, आदी मागण्याही पवार यांनी यावेळी केल्या. शेतकर्यांना न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देऊ नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

****

भारताच्या औषधी उत्पादनांच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत असून, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान या उत्पादनांच्या निर्यातीनं नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. २०१३ मधल्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा औषध उत्पादनांच्या निर्यातीत १३८ टक्के वाढ झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगात औषधी क्षेत्रात प्रमुख निर्यातदार म्हणून उदयाला येत असल्याचं, त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. 

****

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, सगळ्याच पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचाराच्या रिंगणात उतरत आहेत. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या १२ सदस्यांना भाजपानं पक्षातून काढून टाकलं आहे.

दरम्यान, गुजरातच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुजरात निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाची पगारी सुट्टी देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली आहे. गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी एक डिसेंबरला मतदान होणार आहे.

****

महापालिकेच्या मिळकतीमध्ये अभ्यासिका, वाचनालय, व्यायाम शाळा अशा प्रकारचे सेवाभावी उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना मिळकतीचे भाडे दर कमी करण्यात येतील, अशी माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे . नाशिक महापालिकेच्या विविध प्रश्नासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या सर्वच महापालिकांसाठी अशा प्रकारचे उपयुक्त निर्णय घेण्यासाठी शासनाच्या नियमावलीत बदल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करण्यासाठी आज हिंगोली रेल्वे स्थानकावर हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समिती, व्यापारी आणि पत्रकार बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. आंदोलक रेल्वे रुळावर बसले असून, जोपर्यंत हिंगोली -मुंबई रेल्वे सुरू होत नाही तोपर्यंत रुळावरून उठणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आंदोलकांनी अमरावती - तिरुपती एक्स्प्रेस रोखली असून, काही जण रेल्वेवर चढून बसले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन रेल्वे प्रशासनाला सादर केलं.

****

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज पहाटे तीन पूर्णांक सहा रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हा मध्यम स्वरूपाचा भूकंपाचा धक्का होता. यामुळे अद्याप कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर इथं जागतिक वारसा सप्ताहानिमित्त उद्या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. या माध्यमातून तेर इथल्या ऐतिहासिक पुरातन वास्तु, संस्कृतीकडे लक्ष वेधलं जाईल, असं पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज बप्पा नळे यांनी सांगितलं.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज चार सामने होणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता मोरोक्को आणि क्रोएशिया, संध्याकाळी साडे सहा वाजता जर्मनी आणि जपान, रात्री साडे नऊ वाजता स्पेन आणि कोस्टारिका, तर रात्र साडे बारा वाजता कॅनडा आणि बेल्जियम यांच्यात सामना होणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...