Wednesday, 23 November 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.11.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 November 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ नोव्हेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      औरंगाबाद, नांदेड - वाघाळा, लातूर, परभणी सह राज्यातल्या २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्यानं प्रभाग रचना करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश

·      नोकऱ्यांमधे नव्यानं भर्ती झालेल्या ७१ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान

·      शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी लढा देण्याचा काँग्रेस पक्षाचा इशारा

·      राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

·      पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा संदेश मिळाल्यानं राज्यातली पोलिस यंत्रणा सतर्क

·      मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यात आज पंचाहत्तर विहिरींचं जलपूजन

·      उस्मानाबादमध्ये सुरू असलेल्या पंचावन्नाव्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

आणि

·      न्यूझीलंडविरुद्धची टी ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं एक शून्यनं जिंकली

 

सविस्तर बातम्या

औरंगाबाद, नांदेड - वाघाळा, लातूर, परभणी सह राज्यातल्या २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्यानं प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागानं सर्व महानगरपालिकांना दिले आहेत. मुदत संपलेल्या आणि नजीकच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या आणि रचना निश्चित करुन प्रभाग रचनेचं प्रारुप तयार करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास विभागानं महानगर पालिका आयुक्तांना दिले आहेत. अन्य महापालिकांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी -चिंचवड, सोलापूर. कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा भाईंदर या महापालिकांचा समावेश आहे.

****

नोकऱ्यांमधे नव्यानं भर्ती झालेल्या ७१ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रं प्रदान केली. देशभरातल्या ४५ ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पंतप्रधानांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्युलचं उद्धाटन केलं. नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देणारं हे मॉड्युल असून, त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची आचारसंहिता, कामाच्या जागी पाळण्याचे नियम, एकात्मता आणि मनुष्यबळ धोरणाची माहिती दिली आहे.

सरकारी नोकऱ्या देण्यासाठी सरकार मोहिम राबवत असून, विविध राज्यांमध्ये अनेक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. ही मोहीम भविष्यातही सुरू राहणार असल्यचं तप्रधानांनी यावेळी सांगितलं. युवाशक्तीची प्रतिभा आणि ऊर्जा वापरण्याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून, जगभरातले तज्ञ भारताच्या विकासाच्या वाटचालीबद्दल आशावादी असल्याचं, त्यांनी नमूद केलं.

****

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार असल्याचा इशारा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते काल शेगाव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या सगळ्या जिल्हा आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयांमध्ये पीक विमा मदत कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, पण त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपलं नाव, मोबाईल क्रमांक आणि पीकविमा भरल्याची पावती, या कक्षात जमा करावी, त्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष पाठपुरावा करेल, असं पटोले यांनी सांगितलं. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिली नाही, तर त्या कंपन्यांना महाराष्ट्रात काम करु दिलं जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, कथित आक्षेपार्ह विधानामुळे भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदावर राहण्याची पात्रता नाही, असंही पटोले यावेळी म्हणाले.

****

भारतीय जनता पक्षाचे कोट्यवधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात आणि शिवरायांचं इतिहासातलं महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे, शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले, केवळ एखाद्या विधानावरून त्यांना कोंडीत पकडू नये, असं आवाहनही बावनकुळे यांनी नमुद केलं.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात काल काँग्रेस पक्षानं औरंगाबादमध्ये आंदोलन केलं. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे आणि औरंगाबाद शहर कांग्रेस अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वात क्रांती चौकात राज्यपालांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

****

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाणार आहे. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात, या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे आभार मानले. महाराष्ट्रातले संत तसंच महापुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा घेत पुढील वाटचाल करणार असून, महाराष्ट्रात आम्हाला भारतातल्या समृद्ध विविधतेचं दर्शन झाल, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात दुग्ध क्षेत्रासाठी सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यात डेन्मार्क सरकारला सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे. डेन्मार्कच्या शिष्टमंडळानं काल विखे पाटील यांची मुंबईत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. दुग्ध व्यवसायात डेन्मार्क हा देश जगात अग्रेसर आहे, या देशाचं राज्यातल्या पशुपालकांना मार्गदर्शन लाभलं तर राज्यात दुग्ध व्यवसायाला सहाय्य होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदतच होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या केंद्राच्या माध्यमातून दुग्ध क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येईल, असं विखे पाटील यांनी सांगितलं.

****

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला होत असलेल्या विलंब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात येत्या पाच डिसेंबरपासून सलग सुनावणी होणार आहे. विक्रोळीतला गोदरेज कंपनीचा भूखंड वगळता उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या भूखंडासाठी राज्य सरकारनं आधी करार झाल्यानुसार पाचशे बहात्तर कोटी रुपये नुकसान भरपाई न देता दोनशे चौसष्ट कोटी रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला, त्याविरोधात गोदरेज कंपनीनं उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. प्रकल्पाचं महत्त्व लक्षात घेत या प्रकरणाची सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केली, त्याला कंपनीच्या वकिलांनीही सहमती दर्शवली, त्यानंतर खंडपीठानं पाच डिसेंबरपासून सलग सुनावणी घेण्याचं मान्य केलं.

****

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा संदेश मिळाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ध्वनिसंदेशात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलं आहे. २० नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण क्रमांकावर सात ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज तर २१ नोव्हेंबरला १२ ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज मिळाले आहेत. संदेश पाठवणारी व्यक्ती मानसिक आजारामुळे वर्षभरापासून बेरोजगार असल्याचं, तपासातून निष्पन्न झालं असून, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

****

शहरांमधली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सुधारता येऊ शकेल, ह्याबाबत नवीन उद्योजक म्हणजेच स्टार्ट अप्सकडून उपाय मागवण्यात आले आहेत. उत्कृष्ट उपाय योजना सादर करणाऱ्या स्टार्ट अपला केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाकडून वीस लाख रुपयांपर्यंत पारितोषिक मिळणार आहे. ट्रान्सपोर्ट फॉर ऑल ह्या स्पर्धेतून शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर, परवडणारी आणि कार्यक्षम कशी करता येईल, याबाबत नवीन तंत्रज्ञानयुक्त उपाय शोधण्यात येत आहे. देशभरातून या स्पर्धेत पंचेचाळीस शहरांनी सहभाग घेतला असून, त्यात औरंगाबादचाही समावेश आहे. महानगरपालीका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी, औरंगाबाद शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सुधारता येईल, याबाबत उपाय सुचवण्याचं आवाहन स्टार्ट अप्सना केलं आहे.

****

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यात आज पंचाहत्तर विहिरींचं जलपूजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात येत असून, नांदेड तालुक्यातल्या कासारखेडा इथल्या एका प्रातिनिधीक विहिरीचं जलपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. नांदेड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनांतून दोन वर्षात एकूण आठशे साठ विहिरींची कामं पूर्ण झाली आहेत.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा कालपासून सुरु झाल्या. तीन लाख १२ हजार विद्यार्थी परीक्षा देत असल्याची  माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.गणेश मंझा यांनी दिली. पदवी अभ्यासक्रमासाठी चार जिल्हयात २४४ परीक्षा केंद्र आहेत. परीक्षेसाठी ३२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

****

उस्मानाबाद इथं सुरू असलेल्या पंचावन्नाव्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तर प्रदेशचा २१-९ असा डावानं पराभव केला तर पुरुषांच्या संघानेही मध्यभारत संघाचा  २१-९ असा डावानं पराभव केला. आता उप-उपान्त्यपूर्व फेरीत राज्याच्या पुरुष संघाचा सामना गुजरात संघाशी तर महिला संघाचा सामना आंध्र प्रदेश संघाशी होणार आहे.

****


कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल फ्रान्सने ऑस्ट्रेलियाचा चार - एक असा, तर सोदी अरेबियानं अर्जेंटिनाचा दोन - एक असा पराभव केला. अन्य सामन्यात मेक्सिको आणि पोलंड तसंच डेन्मार्क आणि ट्यूनिशिया यांच्यातले सामने एकही गोल न झाल्यानं अनिर्णित राहीले. 

****

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली टी ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं एक शून्यने जिंकली आहे. मालिकेतला कालचा तिसरा सामना पावसामुळे पंचांनी अनिर्णित ठरवला. हा सामना पावसामुळे उशीरा सुरू झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजनेने चार षटकांत १७ धावा देत चार गडी बाद केले. अर्शदीप सिंहने चार षटकांत ३७ धावा देत चार बळी घेतले, तर हर्षल पटेलने एक बळी घेतला. १९ षटकं आणि चार चेंडूत न्यूझीलंडचा संघ १६० धावांत सर्वबाद झाला.

या आव्हानाचा सामना करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवातही अडखळत झाली. सलामीवीर इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव हे अनुक्रमे १०, ११, आणि तेरा धावा काढून बाद झाले. श्रेयस अय्यर शून्यावर तंबूत परतला. पावसामुळे नवव्या षटकानंतर खेळ थांबला तेव्हा कर्णधार हार्दिक पंड्या ३० तर दीपक हुडा नऊ धावांवर खेळत होते.

मालिकेतला पहिला सामनाही पावसामुळे होऊ शकला नव्हता. दुसरा सामना जिंकल्यानं, भारतीय संघ मालिकेत विजयी ठरला. मोहम्मद सिराज सामनावीर तर दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी करणारा सूर्यकुमार यादव मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान, शुक्रवारपासून दोन्ही संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे

****

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त औरंगाबाद इथं सोनेरी महालात काल संगीत महोत्सव घेण्यात आला. राज्य पुरातत्व विभाग, महागामी गुरूकुल आणि देवगिरी प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या महोत्सवाला ऐनोद्दीन वारसी यांच्या बासरी वादनाने सुरवात झाली. त्यानंतर महागामी गुरूकुलाच्या शिष्यांनी ओडिसी नृत्य सादर केलं. महोत्सवाचा समारोप प्राध्यापक अभिजीत अपस्तंभ यांच्या गायनाने झाला. शहरातली संगीतरसिकांचा या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातल्या बगडी इथल्या ग्रामस्थांनी रस्ता आणि पुलाच्या मागणीसाठी गोदावरी पात्रात उतरून आंदोलन केलं. गंगापूर तालुक्यातली अनेक गावं जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे पुनर्वसित झाली आहेत. या धरणाला सुमारे ५० वर्षे उलटून देखील धरणासाठी जमिनी घेतलेल्या गावातल्या लोकांना शासनाच्या वतीनं मुलभूत सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली .

****

हिंगोली जिल्ह्यात रुग्णवाहिका आणि मालवाहू हायवाच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी हिवरा शिवारात हा अपघात झाला. जखमी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मालवाहू हायवा टिपरची धडक बसली, यात रुग्णवाहिकेच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर जखमी व्यक्तीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आणि अन्य सहा जण गंभीर जखमी झाले.

****

कोविड काळात परभणी जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेली वैद्यकीय साधने, यंत्रसामुग्री आणि आरोग्य सुविधा तसंच मनुष्यबळाचा वापर नागरिकांच्या वैद्यकीय सुविधांसाठी होत आहे की नाही, याबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल आढावा घेतला. सोनपेठ, पाथरी आणि मानवत इथल्या ग्रामीण रुग्णालयांची त्यांनी तपासणी केली. वैद्यकीय यंत्रणेकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा इथं येत्या रविवारी सत्तावीस तारखेला महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात नाक-कान-डोळे, दंत तपासणीसह कर्करोग, हृदयरोग यासारख्या सर्व प्रकारच्या आजारांसाठीची नि:शुल्क तपासणी करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना औषधांसह वैद्यकीय साहित्यही पुरवण्यात येणार आहे, तसंच शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांच्या शस्त्रक्रियाही विनाशुल्क करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरीकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...