Thursday, 8 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावादासंदर्भात मुख्यमंत्रीआणि उपमुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

·      संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन दोन्ही राज्यांच्या सदस्यांमध्ये खडाजंगी

·      भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात शून्य पूर्णांक ३५ दशांश टक्क्यांनी वाढ

·      स्थानिक सिंचन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मृद आणि जलसंधारण विभागाला निर्देश

·      गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी

·      महापुरुषांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ जालना शहरात मोर्चा

·      औरंगाबादमधल्या २४ व्या राज्य क्रीडा महोत्सवाचा समारोप. यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद

आणि

·      बांगलादेशाविरुद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव, मालिकाही गमावली

****

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावादासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली.  यावादात लक्ष घालण्याची त्यांनी यावेळी गृहमंत्र्यांकडे मागणी केली. सीमाप्रश्नावर अलीकडच्या काळात घडलेली संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडण्यात आली.

दरम्यान, या प्रश्नी आज गृहमंत्री शाह राज्यातील सर्वपक्षीय खासदारांशी चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे.

****

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२ वाजता शून्यकाळानं कामकाजाला सुरुवात झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. त्यांना काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या सदस्यांनी साथ दिली. याचवेळी कर्नाटक मधील सदस्यांनी गोंधळ करत त्यांच्या भाषणात अडथळे आणले. त्यामुळे दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यासंदर्भात कोणती नोंद केली जात नसल्याचं सांगितलं.

भारताला जी-२० देशांचं प्रतिनिधित्व मिळणं ही अभिमानास्पद बाब  असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. जी-२० शिखर संमेलन आणि जी-२० देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची बैठक भारतात यशस्वीपणे पार पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

****

राज्यसभेत नवनियुक्त सभापती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत झाला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक पक्षांच्या सदस्यांनी धनखड यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांना उत्तर देताना धनखड यांनी, आपल्याला दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संसदेच्या या वरिष्ठ सभागृहाने लोकशाही मूल्य अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा देश करत असल्याचं धनखड यांनी नमूद केलं.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन अधिक उपयोगी व्हावं यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. या अधिवेशनात युवा सदस्यांना चर्चेत भाग घेण्याची संधी द्यावी असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाला प्रगतीच्या नव्या शिखरापर्यंत नेण्यासाठीच्या उद्देशानं या अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी सांगितलं.

****

बॉम्बे हायकोर्टचं नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय असं नामकरण करण्याची मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी काल लोकसभेत केली. नियम ३७७ अंतर्गत ही सूचना मांडताना शेट्टी यांनी घटनेच्या सहाव्या भागाच्या पाचव्या अध्यायात अनुच्छेद २१४ मध्ये दुरुस्ती सुचवली आहे. "प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय" या वाक्यात "प्रत्येक राज्यात राज्याचा नावावर एक उच्च न्यायालय" अशी दुरुस्ती करावी असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

****

नोटबंदीच्या निर्णयाबाबत न्यायालय मूकप्रेक्षक होऊ शकत नाही, ही बाब आर्थिक धोरणाची असली तरी न्यायालयाला निर्णयाचं पुनरावलोकन करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं सहा वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटबंदी निर्णयाविरोधात ५८ याचिका दाखल आहेत. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस.ए.नजीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर काल सुनावणी झाली. नोटबंदी निर्णयाची योग्यता नव्हे, तर हा निर्णय घेण्यासंबंधीची प्रक्रिया तपासली जाऊ शकते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नव्हती, असं रिझर्व्ह बँकेचे वकील जयदीप गुप्ता यांनी कालच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगितलं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात शून्य पूर्णांक ३५ दशांश टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल रेपो दरासह इतर दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दरात ही सलग पाचवी वाढ असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २०२३ वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात ६ पूर्णांक ८ दशांश टक्क्याची वाढ अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मृद आणि जलसंधारण विभागानं पाणलोट विकासाची अधिकाधिक कामं हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  ते काल जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागाचं बळकटीकरण आणि आर्थिक तरतुदीस सर्वतोपरी पाठबळ देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानातूनही मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे हे अभियान पुन्हा गतिमान करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत अप्रत्यक्षरीत्या सुमारे १७ लाख २४ हजार ९३३ हेक्टर सिंचन क्षमता स्थापित झाल्याची माहितीही बैठकीत सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

****

ऊसतोड कामगार महिलांचं गर्भाशय काढण्याच्या घटनांबाबतचा संशोधनपर अहवाल तयार करण्याच्या तसंच ऊसतोडीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांना आरोग्य, स्वच्छता आणि मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉकटर नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार महिलांचं गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणी संदर्भातल्या आढावा बैठकीत काल त्या बोलत होत्या.

****

गुजरात तसंच हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. उत्तरप्रदेशात मैनपुरी लोकसभा मतदार संघ तसंच पाच राज्यांतल्या सहा विधानसभा जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणीही आज केली जाणार आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होइल.

****

दिल्ली महानगर पालिकेत आम आदमी पार्टीनं एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयाबद्दल काल औरंगाबाद इथं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भडकल गेट इथल्या संपर्क कार्यालयासमोर जल्लोष  केला. उस्मानाबाद इथंही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटून आनंद साजरा केला.

****

राज्याच्या सीमावर्ती भागातील गावांची नाराजी कमी करण्यासाठी किमान त्या परिसरातील विकास कामांवरील स्थगिती राज्य सरकारनं तातडीनं मागे घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सांगली, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, नांदेड जिल्ह्यातील काही गावांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची परवानगी मागितल्याचे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल १९२ कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी दिली होती, यातील काही कामे निविदा स्तरावर तर काही कामे अंदाजपत्रक स्तरावर असताना राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकारने या कामांना स्थगिती दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला, ही स्थगिती तातडीने मागे घ्यावी असं चव्हाण म्हणाले.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महापुरुषांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ काल जालना इथं मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी पक्षाच्यावतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्यपालांच्या संबंधित वक्तव्याच्या विरोधात जालना शहरातून सर्व पक्षीय निषेध फेरीही काढण्यात आली. राज्यपालांना पदावरून हटवत नाही तोपर्यंत हा लढा  सुरू राहणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ.संजय लाखे पाटील यांनी यावेळी सांगितलं. आमदार राजेश टोपे, आमदार कैलाश गोरंट्याल यांच्यासह लोकप्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

****

औरंगाबाद इथं मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या दोन बसवर केशरी रंगाचा फवारा उडवून घोषणाबाजी करण्यात आली. काल पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. कर्नाटकच्या बस पोलिस बंदोबस्तात त्यांच्या हद्दीपर्यंत सोडल्या जात आहेत. शहरात कर्नाटक बँकेच्या शाखेलाही पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान, सांगली तसंच कोल्हापूर मार्गे कनार्टकात जाणाऱ्या एसटी बसेस अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

****

नाशिक इथं स्वराज्य संघटनेच्या वतीनं शहरातील कर्नाटक बँकेच्या फलकाला काळा रंग फासण्यात आला. कर्नाटक सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल सांगली जिल्ह्यातून कर्नाटक हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र मिरज पोलिसांनी त्यांना सीमेवरच अडवलं, यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

****

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर जे एफ पाटील यांचं काल कोल्हापूर इथं उपचारादरम्यान निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. पाटील यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात दीर्घकाळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. अनेक सामाजिक संस्थांमध्ये तसंच सरकारच्या विविध मंडळांवर सदस्य म्हणून ते कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे सदस्य, भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांना काम पाहिलं. डी वाय पाटील विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

****

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या २४ व्या राज्य क्रीडा महोत्सवाचा काल समारोप झाला. या स्पर्धेत यजमान विद्यापीठ संघाने व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, खो-खो आणि कबड्डी या चारही गटात सुवर्णपदक मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. गेल्या २४ वर्षांत यजमान संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यजमान विद्यापीठ पुरुष संघ २६० गुणांसह पहिल्या क्रमांकावर तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पुरुष संघ २२० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटातलं विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जिंकलं. यजमान विद्यापीठ संघाने मुलींच्या गटात कबड्डी तसंच खोखो स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली तसंच ऑलंपिकपटू सुमंगला शर्मा, क्रीडा राजदूत तथा बास्केटबॉलपटू नवेली देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समारोप सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला जनरल चॅम्पियनशीप प्रदान करण्यात आली.

****

बांगलादेशाविरुद्ध काल दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव झाला. या पराभवासोबतच भारतानं ही तीन सामन्यांची मालिकाही गमावली आहे. काल बांगलादेशानं दिलेलं २७२ धावांचं आव्हान गाठताना भारताचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद होत गेले. अखेरच्या काही षटकांत फलंदाजीला आलेल्या कर्णधार रोहित शर्माने २८ चेंडूत पाच षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ५१ धावा करून, भारताचा विजय दृष्टिपथात आणला, पण तळाच्या अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न मिळाल्यानं, भारतीय संघ निर्धारित ५० षटकांत २६६ धावाच करू शकला. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना येत्या १० तारखेला होणार आहे.

****

कतार इथे सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आता उद्या शुक्रवारपासून उपान्त्यपूर्व फेरींचे सामने सुरु होणार आहेत. क्रोएशिया, नेदरलँड, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील, अर्जेंटिना आणि मोरक्को हे आठ देश उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.

****

कोलंबियात काल झालेल्या जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानू हिने रौप्यपदक पटकावलं आहे. मीराबाईने एकूण दोनशे किलो वजन उचललं. मीराबाईने यापूर्वी २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य तर २०१८ आणि २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. २०१७ मध्ये जागतिक भारोत्तोलन स्पर्धेतही ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर २०२० मध्ये जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईने कांस्यपदक पटकावलं आहे.

****

औरंगाबाद इथं शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या उपस्थितीत मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात ध्वज संकलन निधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वीर पत्नी आणि हुतात्मा  कुटुबिंयांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 23 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 23 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...