Saturday, 10 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी गायिका सुलोचना चव्हाण यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी रंगल्या रात्री चित्रपटासाठी पहिली लावणी गायली होती. त्यानंतर साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या पदरावरती जरतारीचा, सोळावं वरीस धोक्याचं, कसं काय पाटील बरं हाय का, मला हो म्हणतात लवंगी मिरचीसह असंख्य लावण्या मराठी माणसाच्या मनामनात घर करुन गेल्या. त्यांना पद्मश्री, लता मंगेशकर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी आदी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

***

आज मानवाधिकार दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला सार्वभौमिक मानवाधिकार घोषणा पत्रातील विचार आणि सिद्धातांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे. १९५० पासून मानवाधिकार दिवस साजरा केला जात असून या दिवसाचा यावर्षीचा विषय सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय असा आहे.

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं नागपूरचा विकास होणार असल्याचं भारतीय नता क्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. तसंच नागपूर इथं विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. देशातील सर्वाधिक लांबीच्या या महामार्गामुळं विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सध्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याचं लोकार्पण होणार आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

***

अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आज त्यांची राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट घेतली. लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ७ डिसेंबर पासून उपोषण सुरू केलं आहे. पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले कामं सुरू व्हावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

***

वस्तू आणि सेवा कर- जीएसटी विभागाला ३७ कोटी रुपयांची बनावट बिलं सादर करणाऱ्या नाशिक इथल्या अस्तित्व मेटलचे संचालक सुनील अमृतलाला तुलसानी याला अटक करण्यात आली आहे. तुलसानी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तुलसानी यानं प्रत्यक्षात खरेदी न करता ३७ कोटी रुपयांची बनावट बिलं सादर करुन सहा कोटी ७० लाख रुपयांची वजावट प्राप्त केली होती. विभागाच्या नाशिक येथील अन्वेषण विभागातील सह आयुक्त हरिश्चंद्र गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली आहे.

***

४२ वं मराठवाडा साहित्य संमेलन आज जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं होत आहे. संत रामदास कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातल्या महादंबा साहित्यनगरीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्धाटन झालं. सध्या उद्धव ठाकरे उद्धाटनपर भाषण करत आहेत.

***

भारत आणि बांग्लादेश क्रिकेट संघात सुरु असलेल्या तीन सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेतल्या आजच्या तिसऱ्या सामन्यात बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघानं १९ षटकात  १ गडी बाद ११६ धावा केल्या. यजमान बांग्लादेश संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतलेली आहे.

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ डिसेंबरला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा ९६ व्वा भाग असेल.

***

औरंगाबाद इथं पोलिसांनी काल नायलॉन मांजाचे २२ खोके जप्त केले. हा साठा सुमारे सात लाख अठ्ठयाण्णव हजार रुपयांचा आहे याप्रकरणी दुकानाचे मालक मनोहरलाल लाचवाणी आणि व्यवस्थापक मुश्ताक खान यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

***

राज्यात १५ डिसेंबरपर्यंत हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता पुणे वेध शाळेतर्फे वर्तवण्यात आली आहे.

//**********//

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...