Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : 21 मार्च
२०२३ दुपारी १.०० वा.
****
काँग्रेस
नेते राहुल गांधी यांनी लोकशाहीवर केलेलं वक्तव्य आणि अदानी समुहाच्या मुद्यावर
सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग सातव्या
दिवशी बाधित झालं.
लोकसभेत
आज कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांच्यासह इतर विरोधी पक्ष
सदस्यांनी अदानी समुहाच्या मुद्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची
मागणी करत हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिरला यांनी
कामकाज सुरळीत चालु देण्याचं केलं, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, लोकसभेचं कामकाज
दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेतही
आजचं कामकाज सुरु होताच अदानी समुहाच्या मुद्यावर विरोधकांनी दिलेला स्थगन
प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी
राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी लाऊन धरली. दोन्ही बाजुंच्या
घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
****
राज्यातल्या
सर्व महापालिका क्षेत्रातल्या उद्यानांमध्ये शौचालय, वीज आणि पाणी पुरवठा, सुरक्षा
व्यवस्था यासारख्या सोयी सुविधा एकत्रितरित्या पुरवण्यासाठी नगर विकास विभागाकडून
निर्देश दिले जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत
दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगर क्षेत्रातले गोठे बाहेर
हलवण्याची कारवाई पावसाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण केली जाईल असं मंत्री उदय सामंत
यांनी सांगितलं
गोठे
हलवण्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी
लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी प्रयत्न करू. तोपर्यंत कचरा प्रक्रिया प्रकल्प
सुरू केले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे
ढकलण्यात आली असून, आता पुढच्या मंगळवारी २८ मार्चला सुनावणी होणार आहे. स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य संख्येतली वाढ आणि ती पुन्हा पूर्ववत
करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून
काढून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय, आदी मुद्यांवर अनेक याचिका न्यायालयात
प्रलंबित आहेत. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्यानं निवडणुका
दीर्घ काळ रखडल्या आहेत.
****
राष्ट्रीय
कृषी आणि सहकारी विपणन महासंघ - नाफेडनं जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय भरड धान्य
वर्ष २०२३ ला चालना द्यावी, आणि त्यात सहभागी व्हावं असे निर्देश केंद्रीय कृषी
मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिले आहेत. भरडधान्य विषयक उपक्रमांत सहभागी होत
त्यांना साहाय्य करण्यासाठी कृषी मंत्रालय आणि नाफेड यांच्यात सामंजस्य करार झाला
आहे. त्याद्वारे भरडधान्याशी संबंधित स्टार्टअपच्या विपणाची व्याप्ती वाढवणं,
नाफेड बाजार किरकोळ विक्री दुकानांमधे भरडधान्य कॉर्नर सुरू करणं असे उपक्रम
राबवले जाणार आहेत.
****
केंद्रीय
तसंच अन्य विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी
घेतल्या जाणाऱ्या पदव्युत्तर सीयुईटी
अर्थात सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश
कुमार यांनी एका ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. या परीक्षेला बसण्यासाठी
आवश्यक असलेली पात्रता, परीक्षेचं स्वरूप आणि वेळापत्रक तसंच परीक्षेसंबंधीची अन्य
माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं, कुमार
यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
नवी
दिल्लीत इंदिरा गांधी क्रीडा संकुलात
सुरु असलेल्या महिला जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या लवलिना बोरगोहेन आणि
साक्षी चौधरीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लवलिनानं ७५ किलो वजनी गटात
मेक्सिकोच्या वेनेसा ऑर्टिजचा, तर साक्षीने 52 किलो गटात कझाकिस्तानच्या झाझिराचा
पराभव केला.
****
मुंबई,
नवी मुंबई, रायगड, पालघर, ठाणे परिसरात आज अवकाळी पाऊस होत आहे. मुंबई उपनगरात
सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. नवी मुंबईत सकाळी जवळपास दोन तास मुसळधार पाऊस
झाला. रायगड जिल्ह्यात अलिबागमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पालघर जिल्ह्यात पालघर, बोईसर, धनानीनगर भागांत
विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातही पहाटेपासून अवकाळी पाऊस पडत आहे.
या अवकाळी पावसामुळे राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसह
द्राक्ष, संत्रा, आंबा बागायतदारांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.
दरम्यान,
राज्यात उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं
राहीलं. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला
आहे.
****
No comments:
Post a Comment