Tuesday, 21 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक : 21.03.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ मार्च २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

देशात पदवीधर उमेदवारांच्या बेरोजगारीच्या दरात घट होत असल्याचं दिसून आलं आहे. श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत ही माहिती दिली. नवीनतम उपलब्ध वार्षिक नियतकालिक श्रमिक सर्वेक्षण अहवालानुसार, पदवीधर व्यक्तींचा बेरोजगारीचा दर २०२०-२१ मध्ये १५ टक्क्यांहून अधिक आणि २०२१-२२ मध्ये १४ टक्क्यांहून अधिक होता. नोकरीचा शोध, समुपदेशन आणि व्यवसायिक मार्गदर्शन यासारख्या रोजगाराशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी सरकार राष्ट्रीय करिअर सेवा प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

***

देशाच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत नागरी संस्था अर्थात सी -20 कार्यगटाच्या पहिल्या बैठकीला काल नागपूर इथं सुरुवात झाली. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यावेळी उपस्थित होते.

***

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रामचंद्र संदिकर यांचं काल लातूर इथं निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे संस्थापक, माजी नगरसेवक, ज्येष्ठ पत्रकार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या इच्छेनुसार लातूर इथल्या एम आय टी संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचं देहदान करण्यात आलं.

***

नवी दिल्लीत इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महिला जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या लवलिना बोरगोहेन आणि साक्षी चौधरीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लवलिनानं ७५ किलो वजनी गटात मेक्सिकोच्या वेनेसा ऑर्टिजचा, तर साक्षीनं ५२ किलो गटात कझाकिस्तानच्या झाझिरा उराकबायेवाचा पराभव केला.

***

मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसरात आज अवकाळी पाऊस होत आहे. मुंबई उपनगरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. नवी मुंबईत सकाळी जवळपास दोन तास मुसळधार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात अलिबागमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पालघर जिल्ह्यात पालघर, बोईसर, धनानीनगर भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

//************//


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...