Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 22 March
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
: २२
मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक
बातम्या
·
उत्पादन
वाढीमुळे कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर, दोन लाख पन्नास हजार
मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
·
राज्यात
नाफेडची हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता
·
स्थानिक
स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि विधान परिषदेच्या
१२ आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली
·
अंतिम
मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश
जारी, २८ आणि ३० एप्रिलला मतदान
·
केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, कार्यालय आणि निवासस्थानातल्या
सुरक्षा व्यवस्थेत वाढ
आणि
·
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
सविस्तर बातम्या
देशातल्या,
विशेषत: महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन
झाल्यामुळे भाव घसरल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं दोन लाख पन्नास हजार मेट्रिक
टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
नरेंद्र सिंह तोमर यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. सरकारनं राष्ट्रीय सहकारी ग्राहक
संघ आणि राष्ट्रीय कृषी आणि सहकारी विपणन महासंघ- नाफेडला या भागातून कांदा खरेदी करून,
देशातल्या इतर विक्री केंद्रांमध्ये वितरित करण्याचे निर्देश दिल्याचं तोमर यांनी सांगितलं.
आतापर्यंत तेरा हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राज्यातल्या
शेतकऱ्यांना हरभरा खरेदी केंद्रांमध्ये आणायचा असून, राज्यात भारतीय राष्ट्रीय कृषी
सहकारी विपणन महासंघ- नाफेडची खरेदी केंद्रं बंद आहेत, ती त्वरित सुरू करावीत, अशी
आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत केली. राज्यात
नाफेडनं हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
मी स्वतः नाफेडच्या प्रमुखांशी
चर्चा केली. मागच्या वर्षीपेक्षा जास्त केंद्र आपण सुरू केली आहेत. फक्त मागच्या वर्षी
दिलेल्या काही लोकांना याकरता केंद्र दिलेली नाहीत की मागच्या वर्षी त्यांच्या केंद्रावर
घोटाळे झालेत. आणि काही नवीन केंद्र दिली आहेत. तथापि आपण ही सूचना केलीत पुन्हा एकदा
मी त्यांच्याशी बोलेन आणि काही जर त्याच्यामध्ये राहिले असतील तर आपण ते सुरू करू.
****
आतापर्यंत
फक्त व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होतं, मात्र
येणाऱ्या काळात अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीही जात प्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य
करण्यात येणार असल्याची माहिती, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी
विधानसभेत दिली. जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्रासंदर्भातली कार्यवाही सोपी होण्यासाठी
नवीन प्रणाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेतल्या घरकुल घोटाळ्याची, तसंच घोटाळ्याला जबाबदार असलेल्यांची
विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
केली आहे. विधान परिषदेत याबाबत त्यांनी प्रश्न विचारला होता. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत
छत्रपती संभाजीनगर शहरात, सात हजार घरकुलासाठी परवानगी असताना, ४० हजार घरे बांधण्यासाठी
काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेची, पोलीस, सक्तवसुली संचालनालय-ईडी आणि महानगरपालिकेकडून
चौकशी करण्यात येत आहे. यामुळे शहरासाठीची ही घरकुल योजना परत जाण्याची शक्यता दानवे
यांनी व्यक्त केली.
****
राज्यातल्या
ऑटोरिक्षा चालक आणि मालकांच्या सर्व समस्या, मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी सर्व रिक्षा
संघटनांना विश्वासात घेऊन लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल, असं मंत्री दादा भुसे यांनी
काल विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य कपिल पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली
होती. राज्य शासनानं यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक
- मालक कल्याणकारी महामंडळाचं धोरण निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल,
असं भुसे यांनी सांगितलं.
****
दरम्यान,
भुसे यांच्याविरुद्ध खासदार संजय राऊत यांनी गिरणा अॅग्रो नावानं १७८ कोटी २५ लाख रुपयांचं
भागभांडवल जमा केलं, मात्र प्रत्यक्षात कमी दाखवल्याच्या केलेल्या आरोपाचे काल विधिमंडळाच्या
अधिवेशनात पडसाद उमटले. राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले होते. या
आरोपांवर स्पष्टीकरण देताना भुसे यांनी, कोणत्याही यंत्रणेनं या आरोपांची चौकशी करावी,
आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडून देण्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी राऊत यांच्या
विरुद्ध जोरदार टीका केली.
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी काल पुढे ढकलण्यात
आली असून, आता पुढच्या मंगळवारी, येत्या २८ मार्चला यावर सुनावणी होणार आहे. स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य संख्येतली वाढ आणि ती पुन्हा पूर्ववत करण्याचा
राज्य सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून काढून घेण्याचा
राज्य सरकारचा निर्णय, आदी मुद्यांवर अनेक याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाने
‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्यानं निवडणुकाही
प्रलंबित आहेत.
विधान
परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयातली सुनावणीही पुढे ढकलण्यात
आली आहे. याप्रकरणी उत्तर दाखल करण्यास राज्य सरकारने वेळ वाढवून मागितला असल्याचं
न्यायालयानं तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. संबंधित विभागाशी चर्चा करुन पुढच्या सुनावणीपर्यंत
राज्य सरकारला उत्तर सादर करायचं आहे.
****
अंतिम
मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका
घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं दिले आहेत. प्राधिकरणाचे सचिव डॉ.
पी एल खंडागळे यांनी काल यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलं. जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक २८ एप्रिलला, तर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक २८ किंवा ३० एप्रिलला घेता येणार आहेत. येत्या
२७ मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून, तीन एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र
दाखल करता येतील. मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे.
****
धाराशीव
जिल्ह्यातल्या २०२० च्या खरीप पीक विम्याबाबत दाखल अवमान याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत
सर्वोच्च न्यायालयानं, शेतकऱ्यांबाबत अनुकूल भूमिका दर्शवत, बजाज इन्शुअरन्स जनरल अलायन्स
कंपनीच्या अध्यक्षांना, अवमानाची नोटीस काढून पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश
दिले आहेत. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. उच्च न्यायालयानं धाराशिव
जिल्ह्यातल्या तीन लाख सत्तावन्न हजार दोनशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना, सहा आठवड्यात
नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते, या निर्णयाला विमा कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात
आव्हान दिल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयानंही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.
मात्र यानंतरही विमा कंपनी आवश्यक तेवढी रक्कम देत नसल्यानं सर्वोच्च न्यायालयात अवमान
याचिका दाखल करण्यात आली होती, यावर न्यायालयानं काल हे आदेश दिले. याप्रकरणी पुढची
सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.
****
बालविवाह
ही दुर्दैवी बाब असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी म्हटलं आहे.
त्या काल विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलत होत्या. बालविवाह रोखण्यासाठी विवाहाशी
संबंधित संस्थांनी दायित्व स्वीकारावं तसंच शासनानं याबाबत कडक कायदा करण्याची मागणी
मिसाळ यांनी केली. त्या म्हणाल्या,
ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आम्ही आता महिला धोरण मध्ये असेल किंवा
आता आम्ही महिलांच्या चर्चेमध्ये पण या विषयामध्ये आग्रही मागणी केलेली आहे, की बालविवाह
रोखण्यासाठी जे विवाहाच्या संबंधित ज्या संस्था असतात, जे कार्यालय असतं, या सगळ्यांनी
याच्यामध्ये संबंधित राहून त्याचं दायित्व स्वीकारुन असे बालविवाह असतील तर ते रोखण्यास
मदत केली पाहिजे आणि सरकारने याच्याबाबतचा कडक कायदा केला पाहीजे.
****
भारत
सरकार युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालय आणि नेहरू युवा केंद्रातर्फे काल जालना इथल्या
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. महोत्सवातल्या
चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्पर्धांमध्ये १९ ते २९
वयोगटातल्या युवक-युवतींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी सांगितलेल्या पंचप्राण मुद्द्यांवर आधारित स्पर्धांनाही महोत्सवात प्रतिसाद मिळाला.
विजेत्या स्पर्धकांना जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र
देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी युवकांना जलशपथ देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
साडेतीन
मुहुर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढी पाडवा हा सण आज साजरा होत आहे. प्रगतीच्या संधी
शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि आणखी डौलानं उभारूया, अशा शब्दांत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवं
वर्ष आरोग्यदायी ठरावं, सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येणारं असावं,
अशी मनोकामनाही त्यांनी व्यक्त केली. जीवनातली यशाची गुढी आभाळात उंच जावो, अशा शब्दात
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा
दिल्या आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या आरोग्य
केंद्र- वेलनेस केंद्राचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या
हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
डॉ. भारती पवार, अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलिल आणि राज्याचे
सहकार मंत्री अतुल सावे यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
****
केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, त्यांच्या
नागपूरमधल्या जनसंपर्क कार्यालयात, काल धमकीचे तीन फोन आले. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय
आणि निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत तपास सुरु केला आहे. यापूर्वी १४ जानेवारी
२०२३ रोजी गडकरींना खंडणीसाठी धमकावण्यात आलं होतं. विशेष म्हणजे धमकी प्रकरणात जयेश
पुजारी या गुन्हेगाराचं नाव पुढे आलं असून, धमकी देणाऱ्यानं दहा कोटी रुपयांच्या खंडणीची
मागणी केली. जयेश पुजारी सध्या बेळगावच्या तुरुंगात आहे.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज चेन्नई इथं खेळला जाणार आहे.
दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक
- एकनं बरोबरीत आहेत.
****
महिलांच्या
प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत काल मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर चार
गडी आणि २१ चेंडू राखून विजय मिळवला. बंगळूरूनं प्रथम फलंदाजी करताना नऊ बाद १२५ धावा
केल्या. मुंबईनं १७ व्या षटकातच ही धावसंख्या पार केली.
अन्य
एका सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सचा पाच खेळाडू राखून पराभव केला. प्रथम
फलंदाजी करत युपी वॉरियर्सनं निर्धारित षटकात १३८ धावा केल्या, दिल्ली कॅपिटल्स संघाने
हे लक्ष्य अठराव्या षटकातच पूर्ण केलं. या विजयासोबतच दिल्लीच्या संघानं अंतिम सामन्यात
स्थान पक्क केलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी काल कन्नड तालुक्यात अवकाळी पावसानं
झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी, पूर्ण झालेल्या पंचनाम्यांची पाहणी करून उर्वरित
शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पिशोर, पळशी, रामनगर, साखरवेल, या गावांतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत
जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना धीर दिला. भारंबा तांडा इथल्या जिल्हा परिषद शाळेला आणि
बाजारसावंगी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रालाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली.
****
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई इथं उद्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात
आला आहे. अंबाजोगाई शहरातल्या खोलेश्वर महाविद्यालयात होणाऱ्या या मेळाव्याला जिल्ह्यातल्या
इच्छुक सुशिक्षित उमेदवारांनी उपस्थित रहावं, असं आवाहन बीड जिल्ह्याच्या कौशल्य विकास
रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या आयुक्तांनी केलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर परिमंडळातल्या थकबाकीदार ग्राहकांनी त्वरित वीज बिलाचा भरणा करण्याचं आवाहन
महावितरण कंपनीनं केली आहे. सध्या मंडळातल्या तीन लाख एकोणऐंशी हजार पाचशे शेहेचाळीस
ग्राहकांकडे सहाशे पन्नास कोटी रुपयांचं वीजबिल थकित आहे. त्यामुळे बिल वसुली किंवा
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणं, हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर असल्याचं
महामंडळानं म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment