Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 July
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·
ज्येष्ठ नेते अजित पवार
यांचा राज्यसरकारला पाठिंबा; उपमुख्यमंत्रिपदाची
शपथ; राष्ट्रवादीच्या आठ आमदारांचाही राज्यमंत्रिमंडळात समावेश
· विकासाचा मुद्दा लक्षात घेऊन हा
निर्णय घेतल्याचं
अजित पवार यांच्याकडून स्पष्ट; सर्व आमदारांच्या पाठिंब्याचा
दावा
·
अजित पवार यांच्या
सहकार्याने कामकाज अधिक गतिमान होऊन राज्याला लाभ-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
·
राष्ट्रवादीकडून विधानसभाध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी
जीतेंद्र आव्हाड यांची शिफारस
·
सिंदखेडराजा बस
दुर्घटनेतल्या मृतांवर काल बुलडाणा इथं सामुहिक अंत्यसंस्कार
·
समृद्धी महामार्गावर कोपरगाव इथं कार अपघातात नांदेडचे तीन जण
ठार
आणि
· औरंगाबाद इथं काल मुसळधार पाऊस-दोघांचा मृत्यू
****
राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. अजित
पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस मधला एक मोठा गट काल सत्ताधारी भाजप
- शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला. त्यानंतर अजित पावर यांनी काल मुंबईत राजभवनात झालेल्या
समारंभात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी पवार यांच्यासह इतर
आठ जणांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,
धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश
आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते.
कालच्या या राजकीय घडामोडीविषयी अधिक माहिती देत आहेत, आमचे प्रतिनिधी जीवन भावसार,
‘‘विधानसभेच्या
पंचवार्षिक कालावधित साधारणपणे एक किंवा दोन शपथविधींची सवय झालेल्या राजभवनाला आणि
महाराष्ट्राच्या जनतेला चौथ्या शपथविधीचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, पहिल्यांदाच
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. विधानसभेच्या एकाच
कार्यकाळात तीन वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आणि विरोधीपक्ष नेते पद भुषवण्याचा
अनोखा विक्रम याद्वारे अजित पवार यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.’’
·
जीवन भावसार.
****
या शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना, अजित पवार यांनी,
३० जूनला आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, आपल्याला राष्ट्रवादीच्या सर्व
आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला सक्षमपणे प्रगतीपथापर
नेत आहेत, विकासाचा मुद्दा लक्षात घेऊनच या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही
घेतला, असं ते म्हणाले. यापुढची निवडणूक आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात
लढू असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,
‘‘देशाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब,यांच्या नेतृत्वाखाली गेली नऊ वर्ष जो काही कारभार चाललेला
आहे. त्या कारभाराच्या निमित्तानं जर आपण बघितलं तर अतिशय मजबुतीनं देशाला पुढे नेण्याचा
प्रयत्न हे मोदी साहेब करत आहेत. आणि असा प्रयत्न करत असतांना डेव्हलपमेंट हा एकमेव
विचार करून त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. काही जण आता वेगवेगळी टीका टीपण्णी
करणार आम्हाला टीका टीपण्णीला उत्तर देण्याचं कारण नाही, आपण कामाशी मतलब ठेवत असतो.
महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करणं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्रीय निधी महाराष्ट्राला
कसा मिळेल तो त्या ठिकाणी पाहणे आणि महाराष्ट्राची जनता समाधानी कशी राहील. याच्यामध्ये
सगळा घटक आला. त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला.’’
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल
पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित होते. भुजबळ यांनी यावेळी पंतप्रधान मोदी सरकारच्या
कामाचं कौतुक केलं.
****
मोठं कर्तृत्व करण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षीय
राजकारणात दुय्यम भूमिका दिल्यावर अशा घटना घडल्याचं आपण याआधी महाराष्ट्रात पाहिलं
आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर म्हटलं आहे. आमचं सरकार याआधी डबल इंजीनचं होतं, त्याला आता तिसरं इंजीन जोडलं
गेलं आहे, त्यामुळे कामं अतिशय वेगानं होतील आणि त्याचा फायदा राज्याच्या जनतेलाच होईल,
असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
‘‘अजितदादा
यांनी नेहमी विकासाचं राजकारण केलं आहे. खरं म्हणजे कर्तूत्ववान कार्यकर्त्याला जेंव्हा
दुय्यम स्थान दिलं जातं. त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडत असतात. हे आता डबल इंजिनचं
सरकार जे आहे त्याला आता ट्रीपल इंजिन जोडलेलं आहे. आणि आता राज्याचा विकास जो आहे.
हा बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. या महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचा फायदा मिळेल
एव्हढचं मी या प्रसंगी सांगतो.’’
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनीही या शपथविधीचं स्वागत केलं असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आपण
आणि अजित पवार राज्याला प्रगल्भ सरकार देऊ, अशी प्रतिक्रिया
त्यांनी दिली आहे. राज्यात जे घडलं ते महाराष्ट्राच्या हिताचं असून, याद्वारे राज्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहू असंही फडणवीस यांनी
म्हटलं आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अजित पवार
यांच्या या धाडसी निर्णयाचं स्वागत करत असल्याचं म्हटलं आहे.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सायंकाळी
पत्रकार परिषद घेत, येत्या सहा जुलैला आपली भूमिका स्पष्ट करू असं सांगितलं. राष्ट्रवादी
काँग्रेसवर दोन दिवसांपूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधान मोदी यांनी केले होते,
त्यातून आमच्या काही सहकाऱ्यांची त्यांनी मुक्तता केली, अशी उपहासात्मक टीका शरद पवार
यांनी केली. ते म्हणाले...
‘‘राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
या भ्रष्टाचारात सहभागी आहे. असा जो आरोप केला मला आनंद आहे की, मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना शपथ दिली. याचा अर्थ यासंबंधी त्यांनी केलेले
आरोप हे वास्तव नव्हते. या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्या वरती त्यांनी आरोप
केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्यामुळे प्रधानमंत्र्याचा आभारी आहे.’’
या सगळ्या घडामोडीनंतरही महाविकास आघाडी एकत्र आहे, येत्या निवडणुकीत
राष्ट्रवादी काँग्रेसची नवी टीम आपल्याला दिसेल, आपण काँग्रेस आणि उद्धव
ठाकरे यांच्या पक्षासोबत एकत्र काम करत राहणार आहोत असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ते शरद पवार यांच्यासोबत
असल्याचं ट्विट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड
यांची नियुक्ती केली असून, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभाध्यक्षांकडे शिफारस
केली आहे. अजित पवार यांच्यासह सरकारला पाठिंबा देणाऱ्यांविरोधात कारवाईचे संकेत पाटील
यांनी दिले असून, याबाबत योग्य आणि आवश्यक पावलं टाकणार असल्याचं त्यानीं म्हटलं आहे.
****
राज्याच्या राजकारणात हा कोणताही भूकंप नाही, अनपेक्षित
काहीही घडलेलं नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत
यांनी दिली आहे. लवकरच एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, त्यामुळे शिंदे
यांचं सरकार अल्पमतात येऊ नये, म्हणून भाजपची ही खेळी असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राला
लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळतील, असं भाकितही राऊत यांनी केलं.
****
काँग्रेस पक्षानेही अजित पवार
यांच्या निर्णयावर टीका केली आहे. माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत बोलतांना,
जे भाजपसोबत गेले
आहेत, त्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरं जावं, त्यांना योग्य
जागा कळेल, अशी टीका केली.
तर जनसमर्थन घटत असल्यानं भाजपनं तोडाफोडीचं
राजकारण केल्याची टीका, काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष जास्त ताकदीनं आणि जनतेच्या विश्वासावर आगामी निवडणुकीत सहभागी होईल असं ते म्हणाले.
****
सोलापूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या के के
एक्सप्रेस या रेल्वेगाडीच्या इंजिनमध्ये सोलापूर जवळील मलिक पेठ इथं काल शॉर्टसर्किट झाल्यानं भीषण आग लागली.
काल सकाळी ही घटना घडली.
आग लागल्याचं लक्षात येताच रेल्वे चालकानं तत्काळ गाडी थांबवून आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
****
प्रसिद्ध संगीतकार गोविंद उर्फ बाळ चावरे यांचं मुंबईत राहत्या
घरी वार्धक्याने निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी संगीत दिलेली अनेक गाणी प्रसिद्ध
आहेत. आकाशवाणीच्या भाव सरगम आणि दूरदर्शनवरच्या शब्दांच्या पलिकडले या कार्यक्रमांतून
त्यांची अनेक गाणी रसिकांपर्यंत पोहोचली.
****
बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री
झालेल्या बस दुर्घटनेतल्या मृत २५ जणांवर काल दुपारी बुलडाणा
इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उपस्थित अनेक मान्यवरांनी, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. अपघातातल्या फक्त चार मृतदेहांची ओळख पटली होती, मात्र २१ मृतदेहांची ओळख पटलेली नव्हती,
त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांनी सहमती दिल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे एकत्रितरित्या
अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
****
समृद्धी महामार्गावर कोपरगाव जवळ झालेल्या कारच्या अपघातात तीन
जणांचा मृत्यू झाला. नांदेडचे मोहम्मद जावीद अख्तर मोहम्मद सलिमोद्दीन हे कुटुंबासह
मुंबईकडे जात असताना, त्यांची कार नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या दुभाजकाला धडकून
हा अपघात झाला. यात त्यांच्यासह पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला.
****
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. आधी सकाळी ऊन पडलं असतांनाच, दुपारी वातावरण बदललं, आणि पावसाला सुरवात झाली.
या पावसामुळे शहरात दोन जणांचा मृत्यू झाला. पडेगाव भागातल्या कासंबरी दर्गा परिसरात
अचानकपणे ओढ्याला आलेल्या लोंढ्यात आलिया पठाण ही सात वर्षीय मुलगी वाहून गेली. तर
शहरातल्या जिल्हा परिषद मैदानाजवळच्या नाल्यातही एक मृतदेह आढळून आला. त्याची ओळख अद्याप
पटली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, या पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचलं होतं. वाळूज
औद्योगिक वसाहतीतल्या पांढरपूर - वळदगाव इथल्या खाम नदीला पूर आला असून, अनेक कामगार
नदीच्या काठावर अडकले होते. महानगरपालिकेच्या पथकांनी अनेक ठिकाणी पंपामार्फत पाणी
काढलं.
दौलताबाद,
चापानेर, गंगापूर, ममदापूर
इथं देखील काल मुसळधार पाऊस झाला. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा जोर जास्त
होता. शिंगोली, उपळा, तेर, किणी, गडपाटी, आळणीसह बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातही काल मुसळधार पाऊस झाला. बीड शहरासह अंबाजोगाई
तालुक्याय हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
****
नवं शिक्षण धोरण हे मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचं ठरणार आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय
अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं काल सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत झालेल्या एक दिवसीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद घेण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रांतिक भाषेत शिक्षण उपलब्ध करून आपल्या भाषेत
शिक्षण समजून घेणं महत्त्वाचं आहे, असं कराड यावेळी म्हणाले. शिक्षण क्षेत्राप्रमाणेच
आगामी काळात सिंचन, दळणवळण, आरोग्य या विषयांवरही परिषद घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
****
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुल्यातल्या जांबसमर्थ इथल्या समर्थ राम मंदीरातल्या विविध विकासकामांचं लोकार्पण काल करण्यात आलं. समर्थ रामदासांचे वंशज
भूषण महारुद्र स्वामी यांच्या हस्ते मंदीर सुरक्षेसाठी
दरवाजे आणि सी सी टी व्ही कॅमेरे, सौर ऊर्जा संच आदींचं लोकार्पण करण्यात आलं. या मंदिराचा अमूल्य
ठेवा जतन करण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू, अशी ग्वाही भूषण
महारुद्र स्वामी यांनी यावेळी दिली.
****
लातूर इथं काल लोकनेते विलासराव
देशमुख उद्यानात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचं उद्घाटन, महापालिका आयुक्त बाबासाहेब
मनोहरे यांच्या हस्ते झालं. शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळावा, त्यांचं
सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक हित जपण्याच्या
संकल्पनेतून, महापालिकेनं हे विरंगुळा केंद्र सुरू केलं आहे. या ठिकाणी वृत्तपत्रं,
पुस्तकं यासह बुद्धिबळ-कॅरम, वजन
मोजणी यंत्र अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
****
पुण्याहून भोरमार्गे रायगड जिल्ह्यातल्या महाडकडे
जाणारा वरंध घाटरस्ता आगामी संपूर्ण पावसाळाभर बस, ट्रक यासारख्या अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे
राज्य परिवहन मार्ग-एस.टी बस आणि
अन्य मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने कोकणाकडे जावं लागणार आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून अपघात होत असल्यानं
रायगड प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
****
चंद्रपूर इथल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोर क्षेत्रात
पर्यटकांसाठी सफारी बंद करण्यात आली असून, बफर झोन क्षेत्रात मान्सून पर्यटन सुरू करण्यात
आलं आहे. ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी ३० सप्टेंबर पर्यंत बंद असेल, परंतू बफर झोन क्षेत्रात चौदा दरवाजे मान्सून पर्यटनासाठी खुले
झाले आहेत.
****
ए टी पी वर्ल्ड टूर अर्थात जागतिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी
गटाचं विजेतेपद भारताच्या युकी भांबरीनं पटकावलं
आहे. दक्षिण आफ्रिकेचा लॉइस हॅरिस या जोडीदाराच्या
साथीनं त्यानं ही कामगिरी केली. स्पेनमध्ये मलोक्रा इथं खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात या जोडीनं नेदरलँडच्या
रॉबिन हेस आणि ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ओसवॉल या जोडीचा सहा - तीन, सहा - चार असा पराभव
केला.
****
No comments:
Post a Comment