Tuesday, 4 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 04.07.2023, रोजीचे सकाळी : 07.10, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 July 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

·      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

·      शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा अजित पवार यांचा दावा, प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरे यांची नियुक्ती

·      पक्षविरोधी कारवाया प्रकरणी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची शरद पवार यांची घोषणा, मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊ जणांविरोधात अपात्रतेची याचिका

·      एनआयएचे मुंबई आणि पुण्यात छापे, दहशतवादी संघटनेच्या कारवायांना प्रोत्सहन देणाऱ्या चौघांना अटक

·      राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

आणि

·      पंढरपूर तालुक्यात गोपाळपूर इथं गोपाळकाल्यानं आषाढी यात्रेची सांगता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिजन - २०४७ संबंधी काल नवी दिल्ली इथं संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेतली. ही बैठक फलदायी ठरणार असून, या बैठकीत विविध राजकीय धोरणासंबंधित समस्यांवर मतं मांडण्यात आल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. २०४७ चं लक्ष्य ठेवून विकास कार्य साधण्यासाठी, भारताच्या पायाभूत सुविधा आणि पुढील वाटचाल तसंच राष्ट्रीय विकासाची नीती कशा पद्धतीनं आखायची, या मुद्द्यांवर या बैठकीत भर देण्यात आल्याचं, केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी यासंबंधी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी नागपूर इथं त्यांचं आगमन होणार आहे. उद्या त्या गडचिरोली इथं गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. नागपूरच्या कोराडी इथल्या भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. परवा सहा तारखेला नागपूर इथं विशेष असुरक्षित आदिवासी समुहाच्या सदस्यांशी राजभवनात त्या संवाद साधतील आणि मुंबई इथं शासनातर्फे आयोजित नागरी स्वागत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच असून, आपल्या सोबत पक्ष आणि पक्षाचं चिन्ह असल्याचा दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला याहे. मुंबईत काल वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण सरकारमधे सामील होत असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते पदासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याबद्दल त्यांनी टीका केली. विरोधी पक्ष नेता आणि पक्ष प्रतोद या दोन्ही पदांवर एकाच व्यक्तीला राहता येत नाही, विरोधात असलेल्या पक्षांपैकी सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाच्या नेत्याला, विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचा अधिकार फक्त सदनाच्या अध्यक्षांचा असल्याचं ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र ठरवण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे पाठवली असल्याची माहिती, पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसरकारमधे सामील होण्याचा निर्णय घेतला असून, पक्षात संघटनात्मक फेरबदल करण्यात आल्याची माहिती, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून जयंत पाटील यांना मुक्त केलं असून, सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचं त्यांनी जाहीर केलं. पक्षातल्या इतर नेमणुका करण्याचे अधिकार तटकरे यांना बहाल केले आहेत, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, विधानसभा तसंच संसदेकडे केली असल्याचं, जाहीर केलं जात आहे, मात्र असा कोणताही निर्णय पक्षाला घेता येत नसल्याचं, पटेल यांनी स्पष्ट केलं. पक्षांतर्गत वाद नसावेत, अशी आपली भूमिका असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बहुसंख्य सदस्यांची भावना लक्षात घ्यावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

पक्षातल्या इतर पदांवरच्या नेमणुका प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे यांनी जाहीर केल्या. महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या प्रमुखपदी रुपाली चाकणकर, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. पक्ष प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी आणि आनंद परांजपे यांची नेमणूक झाली आहे. पक्ष प्रतोदपदी अनिल पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. नवीन नियुक्त्यांची माहिती विधानसभा अध्यक्षांना कळवली असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.

****

पक्षविरोधी कारवाया प्रकरणी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर केलं. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलेल्या शिफारशीनंतर पवार यांनी काल हा निर्णय घेत असल्याचं, ट्विट संदेशातून सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांविरोधात, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. शरद पवार यांनी काल सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना ही माहिती दिली. पक्ष फोडणाऱ्यांच्या कारस्थानाला आपलेच काही लोक बळी पडले असल्याची टीका, त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी पक्षाच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल पक्षाच्या तीन सदस्यांना, प्रदेश सरचिटणीस पदावरून, तसंच सदस्यत्वावरून बडतर्फ करण्यात आलं आहे. यात नरेंद्र राणे, शिवाजीराव गर्जे आणि अकोला इथल्या विजय देशमुख यांचा समावेश आहे. यांना पक्षाचं नाव तसंच चिन्ह न वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नऊ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारं खुली असून, काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, मात्र एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, अशी माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात असून, त्यांना फसवून तिथं नेल्याचं आमदारांनी सांगितलं, असं पाटील यांनी म्हटलं आहे. आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही, विधानसभा अध्यक्षांना नऊ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पत्र पाठवलं असून, विरोधी पक्षनेतेपदाबद्दल विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई इथं बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उद्या आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे.

****

लोकशाहीचा अधिकार जतन करणं गरजेचं असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं काल माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. जातीय विचारधारांना काही सहकारी बळी पडले, मात्र सामान्य माणूस बळी पडणार नाही, असं ते म्हणाले. राज्‍यातले लोक शांततेच्‍या मार्गाने धक्का देवून पुन्‍हा एकदा महाराष्ट्र सर्वसामान्‍यांसाठी काम करणाऱ्या लोकांच्‍या हातात सत्ता देईल, असा विश्‍‍वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, सातारा इथं पत्रकारांशी बोलताना, पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असं आपण म्हणणार नसल्याचं सांगितलं. माझे सहकारी मला सोडून गेले, असं ते म्हणाले. अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे, माझा आशीर्वाद घेऊन निर्णय घेतल्याचं सांगून काहीजण संभ्रम निर्माण करत आहेत, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

राष्ट्रीय तपास संस्था - एन आय ए नं काल गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्यानं दहशतवादी संघटनेच्या कारवायांना प्रोत्सहन देणाऱ्या चार आरोपींना अटक केली. हे आरोपी इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांना प्रोत्साहन देत असल्याची माहिती संस्थेला मिळाली होती. काल सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे इथं छापे टाकून पोलिसांनी या चौघांना अटक केली. तसंच त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इसिसशी संबंधित अनेक कागदपत्रं जप्त केली आहेत.

****

लैंगिक अत्याचाराच्या अल्पवयीन पीडिता, तसंच बळजबरी गर्भधारणेमुळे कुटुंबियांनी सोडून दिलेल्या बालिकांना, वैद्यकीय आणि इतर आवश्यक मदत देण्याचा निर्णय, महिला आणि बालविकास मंत्रालयानं घेतला आहे. मिशन वात्सल्य या प्रशासकीय स्थापनेच्या सहकार्यानं, बाल संगोपन संस्थांमध्ये अशा मुलींना १८ वर्षे वयापर्यंत आणि त्यानंतर वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत वाढीव मदत करता येणार आहे.

****

‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ कालपासून राज्यात सुरू करण्यात आला. मुंबईत महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत, या कार्यक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याचं, लढण्याचं प्रशिक्षण या उपक्रमातून दिलं जाणार असल्याचं, लोढा यांनी सांगितलं. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महिला अणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

****

पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत काल प्रातिनिधिक स्वरुपात पाच फिरती पशुवैद्यकीय पथकं कार्यान्वित करण्यात आली. विधानभवनाच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील, आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते, या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात सध्या ऐंशी फिरती पशुवैद्यकीय पथकं कार्यान्वित होत आहेत. केंद्र शासनाच्या पशुस्वास्थ आणि रोग नियंत्रण योजनेनुसार राज्यात ३२९ फिरत्या पशुवैद्यकीय पथकांची निर्मिती करण्यात येणार आहे.

****

श्री क्षेत्र पंढरपूर इथं काल गुरू पौर्णिमेच्या दिवशी गोपाळकाल्यानं आषाढी यात्रेची सांगता झाली. ‘गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला’, या जयघोषात गोपाळपूर इथं हा सोहळा पार पडला. गोपाळपूर इथल्या श्रीकृष्ण मंदिरात पूजा झाल्यानंतर, मंदिर समितीच्यावतीनं लाह्यांच्या काल्याच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं. गोपाळकाला केल्यानंतर मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरु केला.

****

अक्कलकोट इथं श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव काल मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पहाटेपासून मंदिर भाविकांना दर्शनाकरता खुलं करण्यात आलं होतं. शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या, तसंच शिर्डी इथंही साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी मोठी गर्दी  केली होती.

****

२०२३ हे वर्ष आपण जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून साजरं करत आहोत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं हे भरड धान्य वर्ष वेगळ्याच पद्धतीनं साजरं केलं आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या आपल्या जमिनीवर या तरुणानं शंभर क्विंटल बाजरीचं उत्पादन घेतलं आहे. ऐकू या याबाबतचा हा वृत्तांत,

‘‘शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणं बांधली जातात, तेव्हा कैक शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन धरणाच्या बुडीत क्षेत्रात जाते. हिवाळ्यानंतर हळुहळू पाणी साठा कमी होत जातो, आणि उन्हाळ्यात या जमिनी उघड्या पडतात. औरंगाबाद जिल्ह्यातले एक तरुण शेतकरी जगदीश कदम यांचीही शेतजमीन जायकवाडी धरणात गेली आहे. यंदा जायकवाडीचं पाणी ६० टक्क्यांपेक्षा कमी झालं, आणि जगदीश यांची शेतजमीन दिसायला लागली. जगदीश यांनी पाच एकर जमिनीची मशागत करून त्यापर बाजरीची पेरणी केली. खताचं योग्य नियोजन आणि तुषार सिंचन यामुळे बाजरीची वाढ चांगली झाली. अधून मधून झालेला अवकाळी पाऊसही या बाजरीसाठी लाभदायक ठरला. बाजरीच्या या वाणाची कणसं केसाळ आणि कुसळाची असल्यामुळे पक्ष्यांपासून तसंच जंगली जनावरांपासूनही पीक सुरक्षित राहिलं. मळणी केल्यानंतर सुमारे शंभर क्विंटल बाजरी हाती आली, शिवाय जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बऱ्यापैकी सुटल्याचं जगदीश सांगतात.’’

आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, औरंगाबाद

****

समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जिल्ह्यात कारचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. जालन्याच्या दिशेनं जाणाऱ्या या कारवरील नियंत्रण सुटल्यानं, ही कार महामार्गाच्या खाली कोसळून अपघात झाला. करमाड परिसरातल्या जयपूर शिवारात ही घटना घडली. अपघातातल्या जखमींवर औरंगाबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

लातूर जिल्ह्यात लातूर - चाकूर मार्गावर आष्टामोड चौक इथं झालेल्या दुचाकीच्या अपघातात बहीण भावाचा मृत्यू झाला. निकिता आणि अवधूत रक्ताटे हे दोघं काल दुपारच्या सुमारास लातूर इथून एका महाविद्यालयातून प्रवेश प्रकिया पूर्ण करुन घरी परतत असतांना, एका भरधाव वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला.

****

बीड जिल्ह्यात शिरुर कासार रस्त्यावर म्हसोबा फाट्याजवळ काल दुचाकीला चारचाकी गाडीनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. शहादेव डोंगर आणि अंकुश गव्हाणे अशी मृतांची नावं असून ते दोघेही कालिकादेवी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

****

औरंगाबाद शहरातल्या सिडको भागात राहत्या घरातून, गुन्हे शाखेचं पथक आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांनी काल छापा टाकून, दहा लाख चार हजार रूपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकानं या भागातले पंढरीनाथ मालोदे यांच्या घरावर छापा टाकला असता, त्याठिकाणी गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी आणि इतर प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा आढळून आला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

****

औरंगबाद शहरात प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्यांनी कचरा वर्गीकरणावर लक्ष द्यावं, अन्यथा संबंधित प्रभागाचे अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि जवान यांचं वेतन थांबवण्यात येईल, असा इशारा, महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. काल यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...