Thursday, 21 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 21.09.2023 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 21 September 2023

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २१ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.

****

मातृशक्तीवरचा विश्वास देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत व्यक्त केला. संसदेच्या विशेष अधिवेशन सत्राच्या चौथ्या दिवसाचं कामकाज आज सुरू आहे. महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक- नारी शक्ती वंदनला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सदनातल्या सर्व सदस्याचं यावेळी आभारही मानलं. या विधेयकावर सध्या राज्यसभेमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक वरिष्ठ सभागृहात मांडलं. लोकसभेत आज यशस्वी चांद्रयान तीन मोहिम आणि आदित्य एल वन या सौर मोहिमेवर चर्चा झाली. अंतरिक्षातील भारताच्या अन्य मोहिमांच्या यशाचीही यावेळी चर्चा झाली.यामध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्यात आलं. दरम्यान, संसद परिसरात आलेल्या महिलांनी महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक- नारी शक्ती वंदनबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इसरो, १४ दिवसानंतर चांद्रयान ३ च्या लँडर आणि रोव्हर यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे. चंद्रावर सूर्यास्त झाल्यावर हे लँडर आणि रोव्हर नीद्रा अवस्थेत ठेवण्यात आलं होतं. उद्या चंद्रावर दिवस उजाडेल तेव्हा लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान वरच्या सौर पॅनेल बॅटरी पुनरुज्जीवित करून वैज्ञानिक उपकरणं पुन्हा सुरू करणार आहेत.

****

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं नीट पदव्युत्तर समुपदेशन २०२३ साठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी कट-ऑफ टक्केवारी कमी केली आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीनं काल जारी केलेल्या अधिसूचनेत ही घोषणा केली. नीट पदव्युत्तर २०२३ च्या परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार आता पदव्युत्तर वैद्यकीय समुपदेशन फेरीत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील.

****

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण मिळणं गरजेचं असल्याचं मत संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं आहे. यापूर्वी दिलेली आरक्षणं ही न्यायालयात रद्द ठरली आहेत. यामागं मुख्य कारण हा समाज सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध करण्यात सरकारला आलेल्या अडचणी असल्याचं ते म्हणाले. या अडचणी दूर करणं हे आरक्षण मिळण्यातलं मुख्य काम आहे. त्यामुळं सर्वप्रथम हा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागेल, असं त्यांनी नमुद केलं. सरकारनं मराठा, धनगर, इतर मागास वर्ग यांच्या आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावेत. या वर्गाला केवळ झुलवत ठेवू नये. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण दिलं जावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. घटना दुरुस्तीशिवाय हे अशक्य आहे, असं ते म्हणाले. एकाही सरकारला ‘कॅबिनेट’ची बैठक रायगडावर घ्यावी, असं का वाटत नाही? असा प्रश्नही संभाजीराजेंनी यावेळी विचारला.

****

गणेशोत्सवाच्या मंगल पर्वात आज घरोघरी महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होणार आहे. गौरींच्या स्वागतासाठी गृहलक्ष्मींची लगबग सुरू आहे. गौरींच्या स्थापनेसाठी आवश्यक पूजा साहित्य, मखर, कपडे, अलंकार तसंच अन्य खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. गौरी पूजनासाठी निरनिराळी फळं, भाज्या, तसंच फुलांच्या बाजारपेठाही सजल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रसिद्ध गुलमंडी परिसरात केवडा, कमळ आणि सोनचाफ्यासह, विविध प्रकारची फुलं आणि हारांच्या खरेदी विक्रीसाठी व्यावसायिक आणि ग्राहक गर्दी करत आहेत.

****

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन २०२१-२२ मध्ये नाशिक विभाग अंतर्गत धुळे जिल्ह्यातल्या बोराडी ग्राम पंचायतीला  प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. ग्राम स्वच्छता, स्वच्छ पिण्याचं पाणी, मल जल निस्सारण, सामाजिक उपक्रम, जनजागृती, नाविन्य कल्पना, आदींवर आधारित गुणदान पद्धतीनं या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

****

` माझी माती माझा देश ` अभियाना अंतंर्गत आज वाशीम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर इथं अमृत कलश यात्रा काढण्यात आली.  सहभागी नागरिकांनी कलशातल्या मातीला नमन करुन देशासाठी लढणाऱ्या वीरांना वंदन केलं. मंगरुळपीर इथं चौकाचौकात अमृत कलश यात्रेचं यावेळी स्वागत करण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...