Saturday, 2 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 02.03.2024, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 02 March 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याच्या स्वप्नाला, महाराष्ट्र एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या रूपाने सहकार्य करेल - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      विधीमंडळाचं हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित, आगामी अधिवेशन १० जून पासून मुंबईत

·      राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

आणि

·      उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

****

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला, महाराष्ट्र एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेच्या रूपाने सहकार्य करेल, अशी ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधानसभेत काल राज्यातल्या कायदा सुव्यवस्था, उद्योग उभारणी, परदेशी गुंतवणूक, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी अनेक विषयांवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसह राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांतून शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत, एकूण ३५ हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सरकारने पुन्हा कार्यान्वित केल्याचं सांगत, ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विधीमंडळात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, हे अधिवेशन यशस्वी झाल्याचं नमूद केल. राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरच्या एकत्रित चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. राज्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्रानं पहिलं स्थान कायम राखलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

****

विधानसभेत काल विरोधकांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. या अर्थसंकल्पावरच्या चर्चेला अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. त्यांच्या उत्तरानं समाधानी नसलेल्या विरोधकांनी, या हंगामी अर्थसंकल्पात सामान्यांना न्याय मिळाला नसल्याचं कारण देत सभात्याग केला. त्यानंतर लेखानुदान प्रस्ताव मंजूर झाला.

****

यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्यातल्या जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका, विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वैनगंगा आणि नळगंगा प्रकल्प हा मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून, या प्रकल्पासाठी भरघोस निधी उपलध करून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

राज्याच्या विकासाचं हित न साधता सत्ताधाऱ्यांनी राजकारण करण्यासाठी या अधिवेशनाचा वापर केल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

****

राज्य विधीमंडळाचं हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं. आगामी अधिवेशन १० जून पासून मुंबईत होणार आहे.

त्यापूर्वी महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयकाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. या विधेयकामध्ये मुंबई वगळून राज्यातल्या अन्य महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितींमध्ये, चार किंवा पाच सदस्य प्रभाग रचना करण्याची तरतूद आहे. सहकार आणि कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयकालाही दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. यासह एकूण नऊ विधेयकं संमत झाली, तर सहा विधेयक सयुंक्त समितीकडे पाठवण्यात आली. 

****

राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना, सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला. एक नोव्हेंबर २००५ रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू राहील. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी सुधारीत निवृत्तीवेतनाचा विकल्प दिल्यास, त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतकं निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसंच निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के इतकं कुटुंब निवृत्तीवेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. २००५ मध्ये भरतीची जाहिरात निघाली मात्र, भरती प्रक्रीया पूर्ण झाली नसल्यानं, कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांना जूनी निवृत्तवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला, आव्हान दिलेल्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयात येत्या सात मार्च रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर, काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती केल्यानंतर, न्यायालयानं हे आदेश दिले. 

****

राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणं घटनाबाह्य असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीलाही त्यांनी आव्हान दिलं आहे.

****

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान, राजकीय पक्षांनी नियम आणि संकेतांचं पालन केलं पाहिजे, आचारसंहितेचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगानं दिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व लक्षात घेतानाच, प्रचार मोहिमा जबाबदारीनं पार पाडल्या जाणंही गरजेचं आहे, असंही आयोगानं म्हटलं आहे.

****

राज्यात उद्या तीन मार्च रोजी, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत नागरिकांनी आपल्या शून्य ते ५ वर्ष वयोगटातल्या बालकांचं लसीकरण करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत सुमारे दोन लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचं नियोजन आहे. यासाठी ६८९ पोलिओ बूथ उभारण्यात आल्याच महापालिकेच्या पत्रकात म्हटल आहे.

धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात एकूण एक हजार ३४१ लसीकरण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात तीन लाख ९९ हजार ६९८ बालकांना पोलिओ डोस दिला जाणार असून, दोन हजार ७६७ केंद्र तयार करण्यात आले आहेत.

लातूर शहरात एकूण २१५ पोलिओ लसीकरण केंद्रांसह, तीन फिरत्या पथकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

****

राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत जाहीर करणार असल्याचं, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिक्षकांना निवडणूकीची कामं दिली जातात, मात्र परीक्षेचं कामकाज आणि उत्तरपत्रिका तपासणीवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं गोसावी यांनी सांगितलं आहे.

****

वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुका लढल्या, तरी लोकसभेच्या किमान सहा जागा आपण निवडून आणू शकतो, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीत लोकसभेसाठी १५ टक्के इतर मागासवर्ग - ओबीसीचे उमेदवार, किमान तीन अल्पसंख्याक उमेदवार असायला हवेत, यासाठी आपण आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अमरावती इथं मृद आणि जलसंधारण विभागाच्या पेपरफूटी प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांसह ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. २१ फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेत हा गैरप्रकार समोर आला होता. दरम्यान, ही परीक्षा रद्द करुन नव्यानं परीक्षा घेण्यात यावी तसंच पेपरफुटी प्रकरणी चौकशीची मागणी करत युवक काँग्रेसच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा करण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं ३९ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी, एकाला काल बीड स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. त्याच्याकडून नऊ लाख रुपये हस्तगत करण्यात आले. शहरातल्या राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची सुमारे ३९ लाख १६ हजार १६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग करुन चोरटे रोकड घेऊन फरार झाले होते.

****

लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने काल उदगीर इथ महासंस्कृती महोत्सवाचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याप्रसंगी 'मराठी बाणा' कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमापूर्वी स्थानिक कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर केले.

****

परभणी जिल्ह्यात लक्ष्मणनगर, गौंडगाव, आणि धारासूर डेपो गाळमिश्रित वाळू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीनं अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन वाळू खरेदी करता येणार असून याचा जास्तीत-जास्त जनतेनं लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

परभणी इथं येत्या पाच मार्च रोजी, जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या परिषदेच्या माध्यमातून, उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यवसाय यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.  

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...