Saturday, 2 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 02.03.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०२ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. देशात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयांहून अधिकचं हस्तांतरण करण्यात आलं असून, नवीन ९० लाख पात्र शेतकऱ्यांचा यात समावेश झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत किसान ई मित्र हे व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे. यावर मराठीसह इतर सात भाषा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

****

राज्यातल्या आयटीआय संस्थांमध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे, आणि आदिवासी समाजातून धर्मांतर करून अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी असल्याचं निदर्शनास आलं होतं. यासंदर्भातल्या अनियमततेचा अभ्यास करण्यासाठी स्थापन समितीचा अहवाल काल कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडला. ही बाब गंभीर असून, त्यासाठी योग्य त्या उपायोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

****

नाशिक इथं काल महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीनं आयोजित मिलेट महोत्सवाचं उद्घघाटन झालं. या महोत्सवात ३७ स्टॉल असून त्यात विविध भागातून तृणधान्य उत्पादक, बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सहभागी झाल्या आहे.

****

राज्यात काल मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी गारांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

बीड जिल्ह्यात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती विशेष महापोलिस निरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

****

महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये आज बंगळुरू इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना मुंबई इंडियन्सशी संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. काल, झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सनं गुजरात जायंट्सचा सहा गडी राखून पराभव केला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...