Friday, 21 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.06.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 21 June 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ जून २०२४ दुपारी १.०० वा.

****

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. स्वत:साठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त आज सकाळी देशभरात विविध ठिकाणी, शाळा - महाविद्यालयं तसंच शासकीय कार्यालयांमध्ये योग शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. योग हा समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग तयार करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. गेल्या दहा वर्षात योग हा आपल्या मर्यादित परिघातून बाहेर पडला असून, जगभरात योगाच्या लाभाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढत असल्याचं, त्यांनी नमूद केलं. तंदुरुस्ती, निकोप आरोग्य आणि निरामयतेसाठी योग आवश्यक असल्याचं सांगत योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

या भाषणानंतर पंतप्रधानांसह जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी योगाभ्यासात सहभागी झाले होते.

****

सैन्यदलात पायदळाच्या सैनिकांनी लडाख मध्ये तर नौदलानं आयएनएस विक्रांतवर योगासनं केली.

दिल्ली इथं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव तसंच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, मथुरेत संरक्षण मंत्री राजनाथसिंह, नागपूर इथं परिवहन मंत्री नितीन गडकरी, तर मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात, वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी योगाभ्यास प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.

मंत्रालयात घेण्यात आलेल्या योग शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्‍हभागी झाले होते. योग ही जीवनपद्धती सर्वांनी अंगिकारली तर नक्कीच सुदृढ नागरिक घडू शकतात, सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

छत्रपती संभाजीनगर इथंही विभागीय क्रीडा संकुलासह विविध उद्यानं, शाळा तसंच महाविद्यालयांमध्ये आज योगाभ्यास करण्यात आला. 

केंद्रीय संचार ब्यूरो आणि भारत योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातल्या बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल गार्डन इथं योग शिबिर घेण्यात आलं. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे, यावेळी उपस्थित होते.

मराठवाड्यात लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात, नांदेड इथं श्री गुरुग्रंथ साहिबजी भवनात, परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात, तर जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलावर सामुहिक योग आणि प्रात्यक्षिकं करण्यात आली.

****

ओबीसी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी बैठक बोलावली असून, यात वडीगोद्री इथलं पाच सदस्यांचं शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. 

दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. यावेळी उपोषणकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री यावेळी महणाले.

****

चालू खरीप हंगामामध्ये केवळ डीएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन कृषी विभागानं राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना केलं आहे. डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणं गरजेचं असून, डीएपी खतानंतर एसएसपी या खताची सर्वाधिक मागणी असल्याचं कृषी विभागानं सांगितलं.

****

संविधान बदलण्याच्या अफवा विरोधकांकडून पसरवण्यात येत असून, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे संविधान बदललं जाणार नाही, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तसंच महायुतीच्या वतीनं आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा समावेश झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळ तसंच अन्य महामंडळांचं मागासवर्गीयांचं कर्ज माफ करावं, अशी मागणीही आठवले यांनी यावेळी केली.

****

नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२४ मधल्या दुसऱ्या टप्प्यातल्या लेखी परीक्षांना उद्यापासून सुरुवात होत आहे. विद्यापीठाच्या विविध पदवी, पदव्युत्तर आणि विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा राज्यातल्या एकूण २०७ परीक्षा केंद्रांवर होणार आहेत.

****

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियानं बाग्लादेशचा २८ धावांनी पराभव केला. आजचा दुसरा सामना संध्याकाळी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे.

****s


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...